banner

अंतराळी झेप घेई ‘भारतकन्या’!

स्त्री शिक्षणाची चळवळ उभारणा-या फुले दांपत्यामुळे भारतातील स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली गेली. कालपरत्वे मुलींनाही शिक्षण घेण्याचा हक्क आहे, हा विचार बहुतांश समाज घटकांनी स्वीकारला, पण अभियांत्रिकी, संशोधन अशा पुरुषांचे वर्चस्व असणा-या क्षेत्रांत महिलांचा प्रवेश होण्यासाठी भारताला आणखी वाट पाहावी लागली. संसारासाठी आवश्यक तितकी आकडेमोड शिकण्यापलीकडे, उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास तिने घेतला आणि नवनवीन क्षेत्रांत प्रवेश घेण्याचे धाडस केले. या तिच्या धाडसी निर्णयावर ती खरी उतरल्याची आदर्श उदाहरणे आहेत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ येथे कार्यरत असणा-या या ‘भारतकन्या’!

१. टेसी थॉमस –  अग्नी-४ व अग्नी-५ या प्रकल्पाचे नेतृत्व करणा-या भारताच्या ‘मिसाईल वूमन’ म्हणून ओळखल्या जाणा-या टेसी थॉमस! भारतीय क्षेपणास्त्र प्रकल्पातील पहिल्या महिला संशोधिका, यांच्या योगदानामुळे जागतिक स्तरावर भारत गौरवला गेला व क्षेपणास्त्र विभागातील यशस्वी देशांच्या गटांत सामील झाला. भारतास सन्मान प्राप्त करुन देणा-या ‘अग्निपुत्री’ टेसी थॉमस!

२. एन. वलरमती – घरातील चूल-मूल इतकेच सांभाळू शकते ‘ती’, या संभ्रमात असणा-या समाजाला खणखणीत उत्तर देत; इस्रोतील ‘रिसॅट-१’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी रडार सॅटेलाईट प्रकल्पाचे नेतृत्व करणा-या ‘एन.वलरमती’ या पहिल्या महिला संशोधक ठरल्या. देशाचा अभिमान असणा-या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी खंबीररित्या पेलणारी यशस्वीनी ‘एन.वलरमती’!

३. नंदिनी हरीनाथ – नंदिनी यांचा पहिल्या नोकरीच्या निमित्ताने इस्रोशी तब्बल २० वर्षांपासून बंध जोडलेला आहे. शिक्षक व इंजिनिअर्स अशी उच्चशिक्षित कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या नंदिनी यांनी विज्ञान विषयावरील प्रेमापोटी संशोधन क्षेत्राची निवड केली. ‘मार्स ऑरबिटर मिशन’ या प्रकल्पाच्या डेप्युटी डिरेक्टर राहिलेल्या नंदिनी यांनी उपग्रह लॉंच होण्याच्या दिवसांत कित्येक दिवस घरी न जाता, सलग काम करण्याचा मार्ग स्वीकारला. अपार मेहनत व कामाशी एकनिष्ठ असणारी इस्रोतील ‘ती’ नंदिनी हरिनाथ!

४. मिनल संपथ – इस्रोच्या ‘मार्स ऑरबिटल मिशन’ या प्रकल्पात सिस्टिम इंजिनिअर पदाचा कार्यभार सांभाळणा-या मिनल यांनी ५०० जणांच्या चमूचे नेतृत्व केले असून, सलग दोन वर्षे शनिवार, रविवार किंवा कुठलीही राष्ट्रीय सुट्टी न घेता दररोज १८ तास काम करुन भारताचे मार्स ऑरबिटल मिशन यशस्वीरित्या पूर्णत्वास नेले आहे. दिवस-रात्र एक करुन निवडलेल्या क्षेत्रात आनंदाने कार्य करणा-या, दिलेली जबाबदारी पार पाडताना काळ वेळेची बंधने न बाळगता अपार मेहनत घेणा-या ‘मिनल संपथ’ एक आदर्श ‘ती’!

५. अनुराधा टि.के. – अंतराळ क्षेत्रात वैज्ञानिक बनण्याचे अनुराधा यांच्या मनाने पक्के केले, वयाच्या ९व्या वर्षी! तो काळ नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा होता. शाळेपासूनच अनुराधा यांना ठोकळेबाज उत्तरांपेक्षा तर्कांनी सुटणा-या प्रश्नांत अधिक रस होता, याच बुद्धिमत्तेच्या जोरावर आज इस्रोतील वरिष्ठ महिला अधिकारी पदावर कार्यरत असणा-या व बालपणीचे स्वप्न मोठ्या जिद्दीने सत्त्यात उतरविणा-या निश्चयी ‘अनुराधा टि.के.’!

६. रितू करीधाल – इस्रोतील मार्स ऑरबिटल मिशनच्या कार्यकारी उप-संचालिका ‘रितू करीधाल’ यांच्या मनात चंद्राच्या दिवसागणिक कमी जास्त होणा-या आकारावरुन अंतराळ संशोधन या विषयातील उत्सुकता जागृत झाली. स्त्रीच्या जीवनातील घर, संसार, मुलं हा अविभाज्य भाग, त्यांच्या विज्ञानावरील प्रेमाआड न येता, उलट इस्रोतील मोठ्या पदावरील जबाबदारी सांभाळताना आवर्जून आपल्या दोन्ही मुलांसोबत गच्चीवर ता-यांचा अभ्यास करण्यात मजेत वेळ घालवतात. कुटुंब व काम अशा दोन्ही जबाबदा-यांचा समतोल साधणारे ‘स्त्री’ व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘रितू करीधाल’!

७. मौमिता दत्त – विद्यार्थीदशेत मौमिता यांच्या वाचनात चंद्रायन मोहिमेविषयीची माहिती आली व ‘या प्रकल्पाचा भाग होऊ शकलेले सारे किती भाग्यवान!’ अशा विचारातून या क्षेत्राविषयी वाटलेल्या आकर्षणाने त्यांची अंतराळ संशोधनाशी ओळख झाली. मार्स मिशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर ‘मौमिता’ या देशांतर्गत विकासासाठी कार्यरत असणा-या समूहाचे नेतृत्व करीत असून ‘मेक इन इंडिया’ योजनेस जोडल्या आहेत.

८. किर्ती फौजदार – अंतराळातील उपग्रहांवर नियंत्रण ठेवण्यासोबत, त्यामध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी किर्ती फौजदार मोठ्या उत्साहाने पार पाडतात. त्यांच्या कामाच्या वेळा अनियंत्रित असूनही, कधी दिवसा तर कधी अपरात्री अशा सततच्या बदलांचे दडपण न बाळगता, अंतराळ विश्व या आवडत्या क्षेत्राचा ‘किर्ती फौजदार’ मनसोक्त आनंद घेतात.

भारताच्या उच्चस्तरीय प्रकल्पांत सहभागी असणा-या या महिला ठरल्यात देशाचा अभिमान! सध्या सोळा हजारहून अधिक स्त्रिया इस्रोमध्ये कार्यशील असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढते आहे. या प्रगल्भ इच्छाशक्तीच्या जोरावर अंतराळास गवसणी घालणा-या ध्येयवेड्या स्त्रियांपुढे विश्वची व्हावे ठेंगणे!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares