over parenting (2)

अतिकाळजी करणा-या पालकांनो, इथे लक्ष द्या!

लहानग्यांच्या मनाचे रंग इतके क्षणार्धात पालटतात, की घरातील मोठ्या मंडळींना सतत त्यांच्यावर नजर खिळवून बसावं लागतं. हे छोटे वस्ताद केव्हा काय करतील, काही सांगता येत नाही. त्यांच्या खळखळून हसण्यातून केव्हा रडण्याचा सूर लागेल याचाही अंदाज बांधणे केवळ अशक्य. कधी चालता चालता घडपडतात, मोठ्ठालं भोकाड पसरतात, दिलेली कामं वाढवून ठेवतात. मग अशी वेळ येऊच नये म्हणून पालकही काळजीपोटी त्यांच्या सतत मागे मागे राहतात, हे करु नको, तिथे जाऊ नको, ते तुला जमायचं नाही, तू लहान आहेस, मोठ्यांमध्ये बोलायचं नाही. पालकांचा असं बोलण्यामागचा हेतू वळण लावण्याचा असला, तरी हळुहळू मुलांना हे बंधन वाटू लागतं.

पालकांच्या सततच्या टोकण्याने व अतिरिक्त काळजी करण्याने लहान मुलं स्वभावानं चिडचिडी व हट्टी बनत जातात. असे होऊ नये म्हणून, पालकांनी मनातली काळजी प्रत्यक्ष मुलांसमोर कितीदा व्यक्त करावी याबाबतीत थोडा विचार करावा. बारीकसारीक अडचणींतून त्यांना स्वत: मार्ग काढू द्यावेत. जसं की त्यांची एखादी वस्तू मिळत नसली, की मुलं हिरमुसून बसतात मग आई बाबा हातातली कामं सोडून, आधी ती वस्तू शोधून काढतात. यापेक्षा त्याचं त्यांना शोधण्यास सांगावं. अशानं पुढीलवेळी ते ती वस्तू जागेवर ठेवतील. छोट्या छोट्या गोष्टींवरुन रुसून बसण्याची सोप्पी पळवाट न निवडण्याची सवय त्यांना लागेल.

लहान मुलं चूकणार, ती काहितरी वेडंवाकडं वागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा, शिस्त लागावी म्हणून गंभीर चूकांमध्ये त्यांना दटावणं जितकं जरुरीचं आहे. तितकच त्यांच्या हातून चांगलं काही घडताच त्यांचं कौतुक करणही गरजेचं आहे. एखादं काम अर्ध चूक व अर्ध बरोबर असेल, तर प्रथम शाब्बासही आणि मग चूक सुधारण्याबाबत योग्य सल्ला देण्याची तयारी असली की झालं. ओरड्यातून मुलांच्या मनात भिती वाढते, तर शांतपणे समजावण्यातून विश्वास!

मायेपोटी त्यांना सगळ्या लहान सहान कामांत मदत करत रहाल, तर ते नव्या गोष्टी कधी शिकतील? जसं फिरायला जाताना कुठले कपडे घालावेत हे आईने कपाटातून काढून देण्यापेक्षा, त्यांचं त्यांना ठरवू द्या आणि तुम्ही फक्त गंमत पाहा. ज्याप्रमाणे, शाळेची बॅग भरणं, खेळणी आवरणं, कपडे जागेवर ठेवणं, अशी साधी साधी कामं त्यांच्यावर सोपवावीत. सुरुवातीला चूकतील, पण चुकातूंनच शिकतील. घरात नवी वस्तू खरेदी करताना, “छोटे आहेत त्यांना काय कळतंय” असं म्हणत त्यांना डावलू नये; तर त्यांचही मत घ्यावं. यातून पैशांच्या व्यवहारात आई बाबा कसे विचार करतात, कशी काटकसर करतात याचं ते निरीक्षण करतील. हळुहळू जबाबदा-यांची जाणीव होईल, त्यांच्यातील निर्णयक्षमता वाढीस लागेल.

मोठ्यांच्या कामात लुडबूड न करणारी छोटी मंडळी क्वचितच सापडतील. आईपाशी किचनमधली कामं करण्याचा हट्ट धरणा-या लहान मुलांना गॅस, सुरी, विळी असा साहित्याशी संबंध न येणारी काम द्यावीत कधीतरी, कदाचित तुमचं काम वाढेल थोडं; पण त्यांना नकळतपणे आईच्या कामांची जाणीवही होईल. जेवण बनवण्यासाठी लागणारे कष्ट पाहून, जेवण टाकणं, जेवणावर राग धरणं अशा स्वत:तील सवयींना ते स्वत: मोडून काढतील. औषधाचा लहान लहान डोस द्यावा, तसं संस्काराचं बाळकडूही  छोट्या छोट्या प्रसंगात त्यांची अतिरिक्त काळजी न करता देणं सोप्प जाईल.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares