Traveler banner

कुठलीही सोलो ट्रिप करण्याआधी ‘हे’ वाचा!

भटकंती प्रिय सदस्य एकत्र येऊन जी काही खलबतं रचतात, त्यालाच ‘प्रवास’ म्हणतो आपण. एकदा ठिकाण पक्क झालं, की प्रवासाचा मार्ग, गाडी, तिकीटं, आरक्षण, हॉटेल बुकींग्स, प्रथमोपचार, पोटोबासाठी खाऊ अशा जबाबदा-यांचे वाटप केले जाते. प्रवासात कुठे अडलो, रस्ता चुकलोच तरी आपल्या माणसांची सोबत असतेच. साधारण एकमेकाला सांभाळत, सावरत केलेली भटकंती व्यवस्थित पूर्णत्वास पोहोचणार यात शंकाच नाही. पण, याच्या अगदी विरुद्ध स्वतंत्र्य, कुणाच्याही सोबतीशिवाय अनोळखी शहर किंवा देश फिरण्याचे धाडस केलेयेत कधी? असा प्रवास नुसताच पूर्ण होणार नाही, तर असामान्य अनुभवांची पोतडी घेऊन घरी परताल यात दुमत नाहीच.

पुढील बाबी लक्षपूर्वक वाचा, या तुमच्या मनातली एकल्या प्रवासाविषयीची भिती दूर सारुन, तुम्हाला थोडं बिनधास्त व स्वबळावर प्रवास करण्याजोगं धीट बनवतील.

पूर्वाभ्यास – भेट देणार असाल त्या ठिकाणातील एटीएम्स, रहाण्याखाण्याच्या सोयी, दवाखाने, पोलिस स्टेशन, टुरिस्ट गाईड्स अशा सोयींविषयी माहिती असावी.

प्रवासाचा आराखडा – प्रवासातील दिवसांचे साधारण वेळापत्रक तयार करावे. कुठून कसे जाणार, गाड्यांच्या वेळा, जिथे रहाणार आहात तिथला पत्ता, संपर्क क्रमांक सोबत घेतलेल्या डायरीत लिहून ठेवावा व घरच्यांनाही ही माहिती द्यावी.

आरक्षण – काही महिने आधीच प्रवासाची तिकीटे आरक्षित करुन ठेवावी. हॉटेल बुकिंगही घरुनच पक्के करावे. शक्यतो स्टेशन किंवा विमानतळापासून जवळचे हॉटेल निवडावे. ज्यामुळे, धावपळ होत नाही. सतत वर्दळ असते, सोयी सुविधा लगेच उपलब्ध होऊ शकतात.

स्टे होम – काही कुटुंबे त्यांच्याच घरात प्रवाशांना भाड्याने जागा देतात, गाईड देखील पुरवतात. त्यालाच ‘स्टे होम’ म्हटले जाते. अशा घरगुती वातावरणात निश्चिंत वावरता येते.

अवघडलेली देहबोली – घरापासून दूर अनोळखी वातावरणात, माणसांत बावरुन जायला होत आणि एकट्याने प्रवास करताना हे अवघडलेपण चेह-यावर दाखवून चालत नाही. आत्मविश्वासाने वावरावे, व्यक्तिंशी संवाद साधताना चौकस राहावे पण, हालचाली संशयास्पद वाटणार नाहीत, इतकी सहजताही त्यात असायला हवी. तिथल्या बोलीभाषेतील दोन चार शब्द, वाक्य ठाऊक असल्यास उत्तम!

सार्वजनिक वाहतूक सेवा – शहरात फिरताना कॅब करण्यापेक्षा, सार्वजनिक वाहतूक सेवेचा पर्याय निवडावा. जेणेकरुन माणसांचा सहवास असतो. विश्वासू व्यक्ती पाहून पत्ता विचारता येतो.

 

भेट द्यावी अशी स्थळे – पाहाण्यासारख्या ठिकाणांची यादी तुम्ही केलीच असेल, त्याप्रमाणे हॉटेलपासून जवळची, दूरची असा त्यांचा क्रम लावावा. ज्यामुळे, वेळेचा अपव्यय होणार नाही. वेळे अभावी अचानक काही प्लॅन्स बदलू शकता. एकट्याने प्रवास करण्याचा हा फायदा आहे.

आरोग्य – अतिउत्साहात खाण्यापिण्यावरील ताळतंत्र सुटू देऊ नये. प्रवासात तुम्ही एकटेच आहात ह्याची जाणीव ठेवून, आरोग्य सांभाळावे. प्रथमोपचारासाठी थोड्या चिजवस्तू कायम सोबत ठेवाव्यात. स्वसंरक्षणासाठी पेपर स्प्रेही सोबत ठेवावा.

सफर कुठलीही असो, ती कायमच अविस्मरणीय असते. त्यातही एकला चलो रे म्हणत प्रवासाला निघालात तर स्वत:मधील जिद्द, धैर्य, निर्णयक्षमता प्रबळ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार व्हाल इतके नक्की!

More Articles
Designed and Developed by SocioSquares