sleepy (1)

दुष्परिणाम अपूर्ण झोपेचे!

बालपणीच्या शांत झोपेला कशाचाच तोड नाही. कुठल्याही ताणतणाचा मागमूस नसलेली अशी निश्चिंत झोप मोठेपणी दुर्लभ होते. शाळा, क्लासेस व कॉलेजनंतर आता दिवसातील जास्तीतजास्त तास नोकरीनिमित्त घराबाहेरच जातात. कामाचा ताण, वाढत्या जबाबदा-या, स्वप्नांचा माग काढण्यात वेळेचे नियोजन विस्कटते, अशावेळी अस्थिर मनाला ताळ्यावर आणण्यासाठी दिवसभरातून किमान आठ तासाची झोप आरोग्यासाठी गरजेची असते. मात्र, ‘कमीत कमी झोप व जास्तीच जास्त काम’ सध्याच्या अशा तांत्रिक जीवनशैलीमुळे  मुळातच झोपेसाठी कमी वेळ राखून ठेवला जातो. त्याला जोड म्हणून, स्मार्ट गॅजेट्सच्या अतिवापरामुळे निद्रानाशाचा आजार जडतो. झोपायचा प्रयत्न करुनही मनातील अस्थिरता नीट झोपू देत नाही. पुरेशी झोप चांगल्या बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असते.

अपु-या झोपेमुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होतो. स्वभाव चंचल होऊन मन एकाग्र करणे कठीण जाते. ह्दयविकार, उच्च रक्तदाबासारख्या समस्या बळावतात. मेंदूला आवश्यकतितका आराम न मिळ्यालाने त्याचेही संतुलन बिघडते व डोके दुखीपासून स्मृतीभ्रंशापर्यंत विविध आजारांचा सामना करावा लागतो. अशा, अशांततेचा मनावरही परिणाम होऊन चिडचिड, राग, हट्टीपणासारखे अवगुण वाढीस लागतात.

ब-याचदा आठवड्याभराच्या धावपळीनंतर विकेंड झोपून काढण्याचा पर्याय निवडला जातो. जो पुन्हा शरीरासाठी हानिकारक ठरतो. कारण, अचानक अतिरिक्त झोप घेतल्याने थकवा दूर होण्याऐवजी अधिक जाणवतो. शरीर जड झाल्यासारखे वाटते. असा आळसात विकेंड गेल्यावर नेमके कामाच्या दिवशी निरुत्साही वाटते.

‘इकडे आड, तिकडे विहीर’ कमी झोप हानिकारक व अती झोपही त्रासदायक. यासाठी, या महाभयंकर व आवश्यक अशा झोपेचे वेळापत्रक ठरवताना अचूक सुवर्णमध्य साधावा. सर्व यंत्रांना दूर सारुन, लवकर निजायला जावे आणि आठ तासाची पूर्ण झोप घ्यावी. सुरुवातीला प्रयत्न करुनही जमत नाहीसे वाटेल, पण स्वत:वर थोडी सक्ती करुन स्वत:ला ही सवय लावून घ्यावी. रात्रपाळी किंवा शिफ्टनुसार काम करणा-यांना या नियमाप्रमाणे वागणे थोडे जड जाते. त्यामुळे जमले तसे, बदलत्या नियोजनानुसार पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करावा. हा स्वास्थ्य जपणारा परिपूर्ण झोपेचा कानमंत्र आपल्या मित्रमंडळींपर्यंत नक्की पोहोचवा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares