RAB (1)

लग्नांतरही छंद जोपासावेत ‘हे’ असे!

नवी उमेद, नव्या आशा-आकांक्षा मनाशी बाळगून नवीन वर्षाचं स्वागत सगळ्यांनी केलं.

मैत्रिणींनो ! तुम्हीही काहीतरी ठरवंल असेलच ना ! नवीन वर्ष फक्त निमित्त मात्र ; पण काही सुरु करायची इच्छा असेल तर प्रत्येक क्षण हा नाविन्यपूर्ण असतो. पण हो, हे मात्र नक्की की, या वर्षात स्वतःच्या ठरलेल्या चौकटीतून बाहेर पडायचा निर्धार करा. ‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’ यामध्ये अडकून राहायच नाही हे मनाशी पक्कं करायला पाहिजे.

झी मराठीवरच्या मालिकांमधले स्त्री पात्र देखील याचंच द्योतक म्हणता येईल. कोणी स्वतःला ऑफिसच्या कामात झोकून दिलय तर गृहिणी आपल्या आवडीच्या कामात मन रमवत आहेत. छंद म्हणून असेल किंवा संसाराला हातभार लावण्याच्या हेतुने असेल; पण स्वतःच्या पायावर उभं राहायची धडपड मात्र सतत दिसून येते. हे झालं मालिकांमधल्या स्त्री भूमिकांबद्दल ; पण प्रत्यक्षात आपलाही रोल यापेक्षा वेगळा नाही.

बाजारात गेल्यावर दुकानाच्या काचेतली साडी खूप आवडते; पण विकत घेण्याआधीच महिन्याचं अख्खं बजेट डोळ्यासमोर येतं तसच छोट्यामोठ्या गोष्टींसाठी सुद्धा नव-याकडे पैसे मागायचे या सगळ्याची सवय का बरं लावून घ्यायची. सगळ्या भूमिका पेलण्याचे सामर्थ्य निसर्गाने स्त्रीला भरभरून दिलेल असताना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध हा प्रत्येक स्त्रीने घेतलाच पाहिजे.

एका विशिष्ट चौकटीबाहेर आपल्याला काही करता येणारच नाही हा विचारच मुळात चुकीचा आहे. आपण स्वतःहून ती चौकट मोडण्याचा कधी प्रयत्न केलेला नसतो म्हणून असे विचार मनात येतात त्यामुळे आधी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. आपली आवड कोणती आपला छंद कोणता याचा शोध प्रत्येकीने घ्यायला हवा. तुमची हीच आवड, छंद पुढे जाऊन तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकते त्यासाठी साधारण काय पर्याय असू शकतात ते पाहुयात :

पेपर क्विलिंग, हँण्डमेड गोष्टी, विणकाम, शिवणकाम अशा कला अवगत असतील तर तुम्ही त्यातून अर्थाजन करू शकता.

वेगवेगळी कौशल्य नव्याने आत्मसात करून नंतर घरगुती व्यवसाय सुरु करू शकता. उदा. ब्यूटी पार्लर स्किल्स तुमचा एखादा क्लब किंवा ग्रुप असेल तर सगळ्याजणी मिळून सणासुदीच्या पदार्थांची ऑर्डर घेऊ शकता. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये जशी विशिष्ट पदार्थाची स्पेशालिटी असते अगदी तशीच तुम्ही इनोव्हेट केलेल्या पदार्थाची स्पेशालिटी असेल. त्या सगळ्या पाककृती सविस्तर लिहून काढा. पुढे मागे स्वलिखित पाककृतीच्या पुस्तकाच्या विचार करायला हरकत नाही. अर्थात पाककृतीची खूप पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत पण त्या पुस्तकाची स्पेशालिटी ‘तुम्ही’ असाल.

गायन, नृत्य, नाटक इत्यादी छंद जोपासून तुम्ही वेगवेगळ्या स्थानिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. याच माध्यमांतून तुम्हाला आणखीन संधी उपलब्ध होऊ शकतात. शिकवण्याची आवड असेल तर आसपासच्या लहान मुलांचा अभ्यास घेऊ शकता. पुढे ट्युशन सुरु करायचा विचार करायला हरकत नाही.

तुमचे असे उपक्रम इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग करून घेता येऊ शकेल. स्वतःच्या आवडीचं काम करून मिळणारा आनंद फार वेगळा असतो आणि त्यातून मिळवलेल्या स्वकमाईच वर्णन शब्दांत करू शकत नाही. त्यामुळे वर नमूद केलेले आणि त्या व्यतिरिक्त अनेक पर्याय तुमच्यासमोर आहेत. आता गरज आहे ती फक्त तुमच्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची ! तर मग मैत्रिणींनो, करताय ना विचार तुमच्यातल्या कलागुणांचा आणि त्यातून साकारणाऱ्या तुमच्या स्वतःच्या व्यवसायाचा ! या प्रवासात तुम्हाला आमची देखील साथ असेल हे नक्की. तोपर्यंत झी मराठी जागृतीतर्फे तुम्हाला तुमच्या छंदाचा अर्थ उमगण्यासाठी आणि त्यातून अर्थ मिळवण्यासाठी शुभेच्छा !

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares