Afternoon (1)

अशी असते माझी ‘दुपार’!!

उजाडलेली सकाळ प्रत्येकाची निराळी, काहींची फारच धावपळीची तर काहींची अगदीच निवांत. घरातील ‘ती’ नोकरी करणारी असेल, तर ती लवकर उठतेच व गृहिणी असली तरी शाळा, कॉलेज, ऑफीसला जाणा-या घरातील सदस्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी तिची सकाळ लवकरच उजाडते. अंघोळ, देवपूजा, ब्रेकफास्ट, चहासोबत वेळ असलाच तर न्यूजपेपर अशा सर्वसाधारण सवयींना सरावलेली सकाळ भुरर्कन सरते व दिवसाचा साधारण मध्य येतो.
हाताला घड्याळ किंवा वेळ दाखवणारा मोबाईल नव्हता तेव्हा माथ्यावर सूर्य आला की ‘दुपार’ हा हिशोब पक्का होता. झाडाच्या सावलीवरुन किती प्रहर झाले, याचा लावलेला अंदाज अचूक असायचा. कडक उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा ऋतू कुठलाही असो दिवसाला ‘दुपार’ असतेच! दुपार झाली, की शेतात काम करणारे शिदोरी उघडून जेवायला बसतात, ऑफीसवाले लंच ब्रेक घेतात, सकाळच्या शाळा सुटून मुलं घरी येतात, काही परस्पर क्लासला जातात, दुपारची शाळा भरते. घरोघरी माणसे जेवण वैगरे आटपून वामकुक्षी घेतात.

घराबाहेर असणा-यांपेक्षा गृहिणींची दुपार जरा निराळी असते. ढिगभर कामांचा पसारा आटोपल्यावर स्वत:ला वेळ देण्याची संधी मिळते याच भर दुपारी! थोड्या वामकुक्षीनंतर उरलेला वेळ मार्गी लावताना, मैत्रिणी पुढील उद्योगांत रमतात, हो ना?

१. ब्युटिपार्लरमध्ये दुपारचीच वेळ घेते किंवा घरगुती फेसपॅक, नवं क्रीम, नवं नेलपॉलिश असे प्रयोग करुन पाहाण्यात ती गढून जाते.

२. वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचन, मग अगदी रेसिपीच्या पुस्तकातून नवनव्या रेसिपीज शोधून काढणंही तिला आवडतं.

३. भरतकाम, विणकाम, शिवणकाम कुठलेही कलाकुसरीचे काम दुपारच्या शांततेत अगदी मनलावून करते.

४. तांदूळ, गहू, कडधान्ये निवडण्याचे काम किंवा जास्तीचा खाऊ शक्यतो दुपारीच बनतो.

५. तिने स्वत:साठी राखून ठेवलेल्या दुपारच्या वेळापत्रकात मुलांचा अभ्यासही असतो.

६. शेजारी रहाणारी खास मैत्रिण तर असतेच, मग दुपारभर रंगलेल्या गप्पांत वेळ झटझट निघून जाते.

७. तसेच, टिव्ही, रेडिओ हल्ली मोबाईलसुद्धा दुपारच्या फावल्या वेळात सोबत करतो.

दुपार घालविण्याची प्रत्येक मैत्रिणीची असते निराळी त-हा! घरातील कामांतून जरा विश्रांती घेता येते, छंद जोपासता येतात, हवं ते करण्याची मुभा देणारी दुपार तुम्ही कशी घालवता? सांगा खालील कमेन्ट्सद्वारे, तुमच्या कल्पक युक्त्या शेअर करा झी मराठी जागृतीसोबत!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares