angry parents banner

असा दम द्याल, तर नावडते पालक व्हाल!

पाल्यावर योग्य संस्कार व्हावेत यासाठी पालकांची नेहमीच धडपड सुरु असते. चारचौघांत कसे वावरावे, आपल्यापेक्षा लहानांशी वा मोठ्यांशी कसे वागावे याविषयीच्या सूचना देत असतात. सर्वच चांगले गुण आपल्या मुलांमध्ये असावेत, म्हणून भरपूर प्रयत्न करुनही मुले कधीतरी चुकतात व इथे पालकांची खरी कसोटी लागते. तुम्हाला मुलांच्या वागण्याचा राग येत असला, तरी तुमच्या ओरडण्यात पुढील वाक्ये येऊ देऊ नका.

त्याच्या/तिच्याकडून शिक काहीतरी!
तुमच्या पाल्याचा वर्गमित्र किंवा शेजारचा मित्र अभ्यासात, खेळात त्याच्यापेक्षा वरचढ असला, तरी दोघांच्या यशाची तुलना करु नका. कदाचित तुमच्या मुलामध्ये काही छान गुण असतील, जे इतरांमध्ये नसतील. “ती बघ स्पर्धेत नेहमी पहिली आली”, “पहिल्या पाच क्रमांकात तो असतोच”, “त्याच्यासारखं सुंदर हस्ताक्षर तुझं नाही”, अशी वाक्ये त्यांचा आत्मविश्वास कमी करतात. सज्जनांचे चांगले गुण घ्यावेत, मात्र छोट्यांबाबत ही प्रक्रिया त्यांच्याच कलेने व्हायला हवी.

जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो!
काहीवेळा लहान मुलांना ओरडताना स्वत:चे उदाहरण दिले जाते. साधारणत: १० वर्षांनी बदलणारी जीवनशैली, आता पिढीगत बदलत जाताना दिसतेय. पालकांचा आणि पाल्याचा बालपणीचा काळ समान परिस्थितीतून जाणार नाही. त्यामुळे, थोडं त्यांच्या नजरेतून पाहिल्यास कदाचित समजावणं सोप्पं जाईल व स्वत:च्या बालवयाची तुलना न करता प्रश्न सुटतील.

तुझ्या सारखे मुलं नसलेले बरे!
बरेचदा आपण इतके रागवलेलो असतो की, काय बोलून गेलो याचे भानही रहात नाही. “तुझ्यासारखं मुलं नसलेले बरे!” या वाक्याने मुलांना पालकांचा राग येण्यासोबतच, ते स्वत:विषयी नकारात्मक विचार करतात. “आपण आई-बाबांना आवडत नाही”, “त्यांना मी नकोय” असे विचार करुन ते एकलकोंडे होऊ लागतात.

तू तुझ्या आई/बाबांसारखा वागतोस!
लहान मुलांच्या निरीक्षण शक्तीस तोड नाही, तिच त्यांच्या विचारांना आकार देते. लहान सहान निरीक्षणात गर्क असणा-या त्यांच्या नजरेतून आई बाबांचे वादही सुटत नाहीत. ‘कोण कोणास म्हणाले’, याचे अगदी चित्ररुप त्यांच्या मनात पक्के बसते. म्हणूनच, ओरडताना तू तुझ्या आई किंवा बाबांसारखा वागतोयेस असे बोलू नये. यामुळे, पालकांच्या वागण्याविषयीचे नकारात्मक विचार त्याच्या मनात पक्के होण्यास मदत होते.

मूल घरतल्यांचे म्हणणे नेहमीच मनलावून ऐकते. आई बाबांनी दिलेल्या शाब्बासकीने उत्साह संचारतो, तसाच त्यांचा ओरडा कोवळ्या मनावर थेट परिणामही करतो. म्हणूनच, तुमचा पारा कितीही चढलेला असला, तरी मुलांना ओरडताना वरील वाक्ये बोलू नका.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares