nirmalya (1)

असे करा घरच्याघरी निर्माल्याचे खत!

रोजच्या देवपूजेत किंवा सणासुदीला सजावटीसाठी वापरल्या जाणा-या फुलांचे काय करायचे? ही फुले इतर घरगुती कच-यात टाकणे जिवावर येते. सार्वजनिक ठिकाणी असणा-या निर्माल्यकलशाचा पर्याय उपलब्ध असतो, तरी घरच्याघरी या फुलांचे खत बनवणे केव्हाही उत्तम! घर फार मोठे नसेल, घराला बाल्कनी नसेल तरी चिंता नाही. कंपोस्ट खताला फारशी जागा लागतही नाही.

घराच्या गॅलरीमध्ये १ फूट व्यास व १ फूट उंची असलेली कुंडी ठेवा. मातीची कुंडी निवडलीत, तर मस्तच तिला पुरेशी भोकं पाडावीत आणि प्लॅस्टिकची कुंडी निवडलीत तरी हरकत नाही, फक्त तिला सर्व बाजूंनी भरपूर भोकं पाडावीत. कारण, कंपोस्ट खत बनवताना कुंडीत छान हवा खेळती रहाणे महत्त्वाचे असते. आता, कुंडीला आतील बाजूने बारीक छिद्रे असलेली नायलॉनची जाळी लावावी. या जाळीमुळे, कुंडीत टाकलेले जिन्नस व नंतर तयार झालेले किटक कुंडीतून बाहेर येत नाहीत. जाळीलावून झाल्यावर सगळ्यात आधी कुंडीच्या तळाशी नारळ्याच्या शेंब्याचा जाड थर लावून घ्यावा. त्यावर माती व शेणखत यांचा थर पसरवावा. कंपोस्ट खत बनवताना यामध्ये सुकलेल्या फुलापानांसोबत, फळे, भाज्यांची आवरणे, देठं, बिया असे जिन्नसही घालावेत. म्हणजे, किचनमधील ओला कच-याची देखील योग्य विल्हेवाट लागते.

कपोस्टखतासाठी कुंडीत वरील जिन्नस टाकल्यानंतर पुन्हा वरुन माती टाकू नये. कुंडीवर झाकणही ठेवू नये. झाकण ठेवायचेच असल्यास एखादी जाळी ठेवल्यास हरकत नाही. तसेच, हे जिन्नस सतत वरखाली करु नयेत. फक्त त्यात जिन्नसांची भर घालत रहावी व दररोज थोडे पाणी घालावे. खत आपोआप तयार होत राहील. हे कंपोस्टखत तयार व्हायला साधारण चार महिन्यांचा अवधी लागेल. हे खत कुंडीतून काढण्याच्या वेळी किमान पाच सहा दिवस कुंडीत पाणी वा नवीन जिन्नस घालू नये. खत कुंडीतून बाहेर काढताना खालील थरांशी तयार झालेले कंपोस्टखत काढून घ्यावे. वरील न कुजलेले जिन्नस पुन्हा कुंडीत टाकावेत. हे चक्र असेच सुरु राहील.

पर्यावररक्षक होण्याच्या दिशेने एक पाऊल उचलण्याची संधी देतयं हे घरच्याघरी तयार होणारं कंपोस्ट खत! कदाचित काही मैत्रिणी पूर्वीपासून असे घरगुती कंपोस्टखत बनवत असतील, त्यांनी त्यांचा उपक्रम तसाच सुरु ठेवावा आणि आणखी मैत्रिणींना यामध्ये सामील करुन घ्यावं. तसेच, आजचा माहितीपर लेख share नक्की करा. कारण, अधिकधिक मैत्रिणींनी घरच्याघरी हे कंपोस्टखत तयार करायला हवे, निसर्गाचा समतोल सावरण्यासाठी झी मराठी जागृतीच्या प्रत्येक सखीनं खारीचा वाटा उचलायचा आहे.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares