Kitchen (1)

असे बनवता येईल ‘किचन गार्डन’!

निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक अन्न पोटात जावे, म्हणून आहारात पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश तुम्ही आवर्जून करत असाल. मात्र, बाजारात मिळणा-या सर्व भाज्या नेहमी ताज्या असतीलच असं नाही. यासाठी, थोडा निराळा प्रयोग करत, छोट्या प्रमाणातील किचन गार्डन घरीच बनवलं तर? बागकामाची आवड असणारा सदस्य घरात असेल, तर नक्कीच लहानशा जागेतही तुमचं स्वत:चं ‘किचन गार्डन’ उभं राहिल. नोकरीचा व्याप किंवा घरातील कामांमुळे आलेला शीण दूर करण्यासाठी झाडांचा सहवास सहाय्यक ठरतो.

पण, हल्ली फ्लॅट सिस्टीममुळे मोठी मोकळी जागा त सोडाच, गॅलरीही मुश्कीलीने मिळते. नशीबाने बिल्डींगच्या आवारात झाडे लावण्याची किंवा बागकाम करण्याची मुभा तुम्हाला मिळत असेल, तर वेळ दवडू नका. लगेचच त्या जागेत ‘किचन गार्डन’ तयार करण्याचा घाट घाला. तुम्हा सोसायटीतील मैत्रिणींचा ग्रुप आळीपाळीने या झाडांची देखभाल करु शकतो, तसेच झाडाला आलेल्या फळभाज्यांची नंतर समसमान वाटणीही करता येईल. हा पर्याय उपलब्ध नसेल, तरी हरकत नाही. घराच्या खिडकीत किमान चार ते पाच कुंड्या राहतील इतकी जागा असेल, तरी पुरे! जागेची निवड करण्यापासून ते रोपांची निगराणी करण्यापर्यंत सा-याची सविस्तर माहिती देणारे पुढील मुद्दे!

  1. घराच्या खिडक्यांना लावलेल्या ग्रीलजवळील मोकळी जागा, किचन गार्डनसाठी निवडता येईल. दिवसांतून किमान ६ ते ७ तास भरपूर सूर्यप्रकाश झाडांना मिळायला हवा.
  2. मिरची, पुदिना, कोथिंबीर, वांगी किंवा टॉमेटोची लागवड करता येईल. भाज्यांच्या रोपांना लागणारे पाण्याचे प्रमाण इतर फुलझाडांपेक्षा निराळे असते. ते नीट समजून घ्यायला हवे.
  3. या भाज्यांचा आपण जेवणात समावेश करणार असल्याने, खताचे योग्य प्रमाण राखणे गरजेचे आहे.
  4. पक्षांपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी खिडक्यांना जाळी लावावी लागेल किंवा रोपांभोवती जाळीचे आवरण करता येईल.
  5. बदलत्या ऋतूनुसार भाज्यांची निवड करणे अधिक सोयीचे ठरेल. ज्यामुळे, वातावरणाला धरुन रोपाची वाढही नीटस होईल.
  6. विविध फळभाज्यांच्या बिया बाजारात विकत मिळतात किंवा घरीच अशा भाज्यांचा बिया सुकवूनही त्यांची लागवड करता येईल.

जागेच्या कमतरतेमुळे ‘किचन गार्डन’ तयार करण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, म्हणून आजचा हा लेख!! या किचन गार्डनमुळे फार पैशाची बचत होणार नाही कदाचित, पण स्वकष्टाने पिकविलेल्या भाज्यांचा आनंद नक्कीच मिळेल. सोबत मोजक्याच, पण अस्सल ताज्या भाज्यांचा आस्वादही अधूनमधून घेता येईल. चला तर मग, लागा ‘किचन गार्डन’ बनविण्याच्या तयारीला व तुमच्या प्रतिक्रिया किंवा शंका लिहा ब्लॉगखालील कमेन्टबॉक्समध्ये!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares