Mom Technology Banner

आईला नवी टेक्नोलॉजी शिकायचीये!

झटपट, पटपट, लगेच, ताबडतोब, क्षणार्धात हे शब्द नव्या टेक्नोलॉजीसाठी समानअर्थी शब्द आहेत, असं म्हणायला हरकत नाही. कुठलेही अवघड काम कमी वेळात फत्ते करणा-या नव्या यंत्रांशी प्रत्येकाला दोस्ती करावीशी वाटते. त्यांचा किचकट वापर तरुणांच्या डोक्यात लगेच फिट बसतो. पण घरातील जुन्या पिढीला तितक्या सुरळीतपणे नव्या टेक्नोलॉजीशी जुळवून घेता येत नाही.

आई किंवा बाबा नोकरी करणारे असतील, तर त्यांच्या ऑफिसमध्ये कामाच्या पद्धतींत टेक्नोलॉजीचा  शिरकाव झाला. तर, ते तितके शिकून घेतात. गरजेपुरता का होईना, पण नोकरदार पालकांचा टेक्नोलॉजीशी थोडा संबंध येतो. बहुतांश घरात आजही पुरुष मंडळी ऑफिसला जातात व गृहिणी पूर्णवेळ घरासाठी देतात. अशी गृहिणी किंवा आई काही नेमक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरायला शिकते. फ्रिज, मिक्सर, ओव्हन, वॉशिंग मशीन, ज्युसर, टोस्टर व हल्ली वॉट्सअॅपमुळे थोडा मोबाईल ती वापरु लागलीये. यामध्ये, तिचं फावल्या वेळेत मनोरंजन करणारा स्मार्ट टिव्ही देखील आहे. पण त्याचेही संपूर्ण व्हिचर्स समजून घेण्याच्या भानगडीत ती पडत नाही. आणि कुणी तिला हौशेने समजावूनही सांगत नाही. लॅपटॉप, स्मार्ट वॉच, ब्लुटूथ, एमपीथ्री, पेनड्राईव्ह, कॅमेरा, ऑनलाईन बॅकिंगसारख्या सुविधा यांची तर बातच सोडा. त्यांच्या वाट्याला ती जात नाही. पण खरंच, तिला तंत्रज्ञान क्षेत्रात झालेला जादुई बदल जाणून घेण्याची इच्छा होत नसेल? “मला नाही बाई त्यातलं काही कळंत.” असं म्हणणारी आई “मात्र मला ते शिकून घ्यायचयं” असंही पुढे म्हणत असेल, पण मनातल्या मनात. तो आवाज खरंतर तिच्या बाळांनी ऐकायला हवा. न बोलता तिने आपले मन नेहमीच जाणलेय.

नव्या तंत्रज्ञानाविषयी तिने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले, की “तुला नाही कळणार गं ते”, “कितीदा तेच तेच सांगू?”, “लक्षात ठेवं ना जरा” अशी वैतागलेली उत्तरे तिच्या पदरी पडतात. जिने न कंटाळता आपले बोबडे बोल तासनतास ऐकले, शंभरदा मूळाक्षरे गिरवून घेतली, पाठे घोकून घेतले तिला तिच्या कलेने नवी टेक्नोलॉजी शिकवण्याचा तास भरवायलाच हवा.

आईच्या बालपणी ब-याचशा यंत्रांचा जन्म झालाच नसल्याने, तिच्यासाठी यंत्रांचे विश्व एखादी नवी भाषा शिकण्याइतकेच अवघड आहे. त्यामुळे, मोबाईल किंवा लॅपटॉप शिकवत असाल, तर अगदी साध्या शब्दांत, टप्प्याटप्प्याने त्यातील यंत्रणा समजावून सांगायला हवी. या गोष्टी शिकून घेतल्या, की ती स्वत:ची कामे सोप्पी करेलच व टेक्नोलॉजीचा विषय निघताच तिला अवघडल्यासारखे होणार नाही. उलट चारचौघात आणखी आत्मविश्वासाने वावरेल यात शंकाच नाही.

More Articles
Designed and Developed by SocioSquares