navra baiko banner

आजचे सावित्री सत्यवान!

नवरा बायकोचे नाते साजरे करणारा सण म्हणजे ‘वटपौर्णिमा’! पूर्वी गृहिणींची संख्या जास्त होती, त्यांच्याकडे वेळही होता. पुरुष नोकरी धंद्यात व्यस्त, तर स्त्रियांकडे ‘नवरा, संसार व मूल’ या त्रिकोणी जगाला सुखी ठेवण्यासाठी पूजा, व्रत वैकल्ये, उपवास अशी न संपणारी यादी होती.

शिक्षणाच्या जोरावर नोकरदार वर्गात स्त्रियांनी प्रवेश करताना त्यांच्यातील भक्तीभाव कमी झाला नाही. कारण, संसार व करियर यांमध्ये ताळमेळ साधण्याची कला तिला अचूक अवगत आहे. पाडव्याची सुट्टी असते, तशी वटपौर्णिमेची नाही. त्यामुळे, यादिवशी नोकरी करणा-या बायकांची जरा धावपळच होते, त्यात उपवासही असतो. अशावेळी, वटपौर्णिमेची पूजा करताना शॉर्टकर्ट वापरणं साहाजिकच ठरतं.

सध्या वडाची फांदी वापरुन घरीच आटोपशीर पूजा करणे आपण पसंत करतो. नवराही मोठ्या उत्साहाने बाजारातून चार-पाच सूबक पाने असलेली देखणी फांदी आणून देतो. नवरा बायकोवर कितीही विनोद रंगले, तरी सात जन्म हिचीच सोबत मिळावी हे त्याच्याही मनात असते!

पुरुषानेही वडाला फे-या घालाव्यात किंवा बायकोसाठी उपवास धरावा अशा समानतेची मागणी नाही. मात्र, सावित्रीने सत्यवानासाठी थेट यमलोक गाठले होते. आपल्याला तब्बल सात जन्माचं आगाऊ बुकींग करण्यासाठी, फक्त वडाचं झाडं शोधायचंय! यादिवशी जोडीने एक वडाचे झाड लावूया, तरच ख-या अर्थाने आधुनिक सावित्री सत्यवानाचे दर्शन होईल, ज्यांना यमही सहज शरण जाईल!

शुद्ध हवा व घनदाट सावली देणा-या वडात, ढगांतून पाणी खेचून आणण्याची ताकद असते म्हणे! वड हवेत आर्द्रता टिकवून ठेवतो व पर्यावरणाचा समतोल राखतो. ख-या अर्थाने आधारवड असणा-या वडाच्या फांद्यांची पूजा करणारी ट्रेंडी वटपौर्णिमा फ्रेंडली साजरी करु, आज जोडीने एक तरी ‘वड’ लावू!

More Articles
Designed and Developed by SocioSquares