Woman Employees Banner

आजही महिला कामगार ‘दीन’च

आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या तोड़ीस तोड़ प्रगती करत आहे. असं कुठलंही क्षेत्र नाहीये जिथे स्त्री पोचली नाहीये. मग बँक असो, खाजगी कंपनी असो, ट्रेन, विमान चालवणं असो किंवा मग अंतराळ! तिथे सुद्धा आज स्त्री कार्यरत आहे. नोकरी करताना सर्व क्षेत्रे तिने व्यापली आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते आहे. तरी सुद्धा ब-याच ठिकाणी तिला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते.

कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना स्त्रीला ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्या आव्हाने सोप्पी नसतात. तिला स्वतःचे घर, कुटुंब यास प्रथम प्राधान्य द्यावे लागते. तिला कुटुंबातल्या अनेक जबाबदा-या एक गृहिणी, मुलगी, सून, आई, सासू या नात्याने पार पाड़ाव्या लागत असतात. कितीही कंटाळा आला तरी ती तिच्या जबाबदा-या कधीच झटकून मोकळी होऊ शकत नाही. कारण ती एक कुटुंबवत्सल स्त्री असल्याने साहजिकच या जबाबदा-या निभावताना तिचा बराच वेळ जात असतो. तसेच इतकं सगळं सांभाळून घर चालविण्यासाठी शिवाय तिला नोकरी सुद्धा करावी लागत असते. जरी ती पुरुषाच्या बरोबरीने कार्यक्षेत्रात ठामपणे उभी असली तरी तिचे आयुष्य हे पुरुषासारखे नक्कीच नसते.

अनेक ठिकाणी काम करताना तिला तिने केलेल्या कामाचा मोबदला हा पुरुष कामगाराप्रमाणे समान मिळत नाही. जर तिची तब्येत बरी नसेल तर तिला कुठल्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. अनेकदा गरोदरपणात सुद्धा तिला 8 ते 9 महिन्यांपर्यंतही काम करावे लागते. ब-याच ठिकाणी मिळणारे वेतन, पगार, भत्ते हे पुरुष कामगारांपेक्षा कमी असते. तसेच काही ठिकाणी काम करताना लैंगिक छळ व शोषण यांसारख्या समस्यांचाही तिला ब-याचदा सामना करावा लागतो. बाळंतपणानंतर दिली जाणारी किमान मातृत्व रजा सुद्धा तिला काही ठिकाणी पूर्ण मिळत नाही आणि काही कालावधीतच तिला कामावर रुजू व्हावं लागतं. या आणि अशा अनेक आव्हानांचा सामना करत असताना ब-याच जणींना त्यांचे अधिकार माहित नसल्याने जर याच्या विरोधात आवाज उठवला तर कदाचित आपली नोकरी जाईल या भीतीने ती हा छळ निमूटपणे सहन करत असते. कारण त्या नोकरीवरच तिचं घर चालत असतं.

एकीकडे आपण म्हणतो की आजची स्त्री कमजोर नाहीये तर ती सक्षम आहे आणि सर्व क्षेत्रात उत्तम आहे. ती जर अबला नारी नाहीये आणि सक्षम आहे हे आपण जाणतो तर असं म्हणायची वेळच आपल्यावर का यावी? कारण असं जेव्हा आपण सारखं म्हणत असतो तेव्हा आपल्या मनात आपण कुठे न कुठेतरी हे बसवलं आहे की ती अजूनही पूर्ण सक्षम नाहीये म्हणून सारखं सारखं तेच तेच म्हणून आपल्याला या गोष्टीची तिला जाणीव करून द्यावी लागते. काही ठिकाणी तिला अजिबातच मुभा दिली जात नाही. तर काही ठिकाणी ती फक्त स्त्री आहे म्हणून तिला अनेक गोष्टीत उगाच सवलत मिळते. हे सुद्धा तितकच चुकीचं आहे. कारण कामगार या नात्याने हा विषय आहे स्त्री-पुरुष समानतेचा. त्यामुळे तिला पुरुषाच्या बरोबरीने आणि पुरुषांप्रमाणेच समान अधिकार मिळायला हवेत. तरच यातले संतुलन राखता येईल.

हळूहळू बदलत्या काळाप्रमाणे ब-याच परिस्थितीत बदल होऊ लागला आहे. महिला आणि पुरुष कामगारांमधील ही समानतेची दरी मोठ्या प्रमाणात भरून निघत आहे. तरीही आजच्या घडीला कामगार दिनाच्या जेव्हा उल्लेख होतो तेव्हा महिला कामगार या अजूनही दीन ठरतात. त्यामुळे या मूलभूत प्रश्नाचे समूळ उच्चाटन होंणं आणि तो सोडवणं गरजेचं आहे.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares