fatake banner

आता मुलेच फटाके नको म्हणतील!

फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यामागील महत्त्वाचे कारण प्रत्येकाला ठाऊक आहे. वायू प्रदुषणात भर घालणारे हे फटाके आरोग्यासाठीही हानिकारक आहेत. हल्ली शाळांमधून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाते. तसेच, विविध उदाहरणांवर त्यांच्याशी चर्चा करुन आपणही निसर्ग जपणूकीचा धडा मुलांना देऊ शकतो. मात्र, यापलिकडे जाऊन जरा निराळ्या प्रकारे त्यांना फटाक्यांनी होणारे नुकसान समजावून सांगता आले, तर कदाचित पुढीलवेळी ते स्वत:हून फटाक्यांना नाही म्हणतील.

शॉपिंग

दिवाळीनिमित्त कपड्यांची शॉपिंग बहुदा सारेच करतात. पण, फटाक्यांऐवजी त्याच रकमेतून पुस्तके विकत घेतली तर? लहान मुलांची भरपूर गोष्टीची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. गंमत कोडी किंवा क्राफ्ट, बैठे खेळ असे पर्याय त्यांना दिल्यास ते खूष होतील. तसेच त्यांना मोबाईलचा जरा विसर पडल्याने तुम्हीही खूष व्हाल, हो ना?

नवी रोपं

त्यांची झाडांशी मैत्री करुन द्यायला हवी. फटाक्यांच्या रकमेतूनच दोन लहानशी रोपटी त्यांच्याकडून लावून घ्या. त्याचवेळी फटाक्यांमुळे वृक्षांची, निसर्गाची होणारी हानी सांगा. झाडांशी नाते जडले की ते स्वत:हून त्यांची अधिक काळजी घेतील आणि फुलझाडे कायमच लहानग्यांना आकर्षित करतात.

आजी आजोबांसोबत दिवाळी

फटाक्यांच्या पैशातून घरीच जास्तीचा फराळ बनवून तो वृद्धाश्रमातील आजी आजोबांना भेट म्हणून देता येईल. दिवाळीतील एक दिवस त्यांच्या समवेत घालवताना फटाक्यांच्या आवाजाने आजी आजोबांना होणारा त्रास त्यांना समजावून सांगितला, तर त्यांच्या हळव्या मनाला अधिक छान समजेल व वृद्धव्यक्तिंसोबत आनंदाचे क्षण घालविण्याचा नवा पायंडाही पडेल.

फटाक्यांचे कारखाने आणि त्यांना लागणारी आग, अशा कारखान्यांत काम करणा-या बालमजुरांचे जाणारे जीव, फटाक्यातील दारूचे दुष्परिणाम याविषयी त्यांना माहिती देता येईल. फटाके वाजवताना मज्जा येते, मात्र तेच तयार होण्यामागील प्रक्रिया मात्र भयंकर आहे. कदाचित पहिल्याच प्रयत्नात घरातील बच्चे कंपनी फटाक्यांवर बंदी घातली नाही, तरी ते कमी प्रमाणात वाजविण्यासाठी नक्कीच तयार होतील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares