Friends (1)

आम्ही उत्साही ‘मैत्रिणी’!

‘मैत्री’ या नात्याला खास बनविणा-या ‘मैत्रिणी’ म्हणजे प्रत्येकीच्या जीवनातील महत्तम घटक!  बालमैत्रिणींच्या आठवणी साधारण शाळेच्या दिवसांत घेऊन जातात, कारण शाळेतील दिवस म्हणजे धाडसाचे, स्पर्धात्मक चढाओढीचे आणि निरागस मैत्रीच्या कोवळ्या सरींमध्ये मनोसक्त भिजण्याचे! त्या बालवयावर एक निराळा उत्साह आरुढ असतो. शाळेने आयोजित केलेल्या प्रत्येक उपक्रमात आपले नाव असायलाच हवे या निश्चयाने चित्रकला, गायन, नृत्य किंवा स्पर्धा परीक्षा असं काहीही असो सा-यात नाव नोंदविणा-या काही मैत्रिणी असतात, तर काही नेमक्या विरुद्ध अगदी मितभाषी, शांत, शिक्षकांच्या नजरेस पडू नये यासाठी धडपडणा-या, अबोल! विविध स्वभावाच्या या मुली ‘आम्ही मैत्रिणी’ असा समूह करीत सुखाने नांदतात व ‘आपण कायम एकत्र राहायचं हं!’, असं म्हणणा-या हळूहळू मोठ्या होऊन कॉलेज, नोकरी, लग्न या गराड्यात व्यस्त होतात. आता, ‘शाळेतील मैत्रिणी’ संपर्कात असल्या, तरी बहुतांश वेळा भेटी तुरळक होत जातात, पण ‘मैत्रिणी’ तर हव्याच! मग, घराशेजारी किंवा परिसरात राहाणा-या मैत्रिणींचा छानसा ग्रुप तयार होतो.

तुमच्यापैकी बहुतेकजणींचा असा महिलांचा ग्रुप नक्की असेल, आणि नसला तरी काही हरकत नाही; चांगल्या कामास कधीच उशीर झालेला नसतो, त्यामुळे तुम्हीच पुढाकार घ्या आणि शाळेतील मैत्रिणींसोबत उपक्रम राबविण्याची पाहिलेली स्वप्ने आता नव्या मैत्रिणींच्या सोबतीने पूर्ण करा. सामाजिक कार्यास आपलाही हातभार लागावा अशी इच्छा असल्यास तुम्ही मैत्रिणी सुट्टीचा दिवस अनाथ आश्रमातील मुलांसोबत घालवू शकता, तुम्ही स्वत: त्यांच्यासाठी खाऊ बनवून नेऊ शकता किंवा एखाद्या वृद्धाश्रमाला नियमित भेट देण्याचे ठरवलेत, तर तुम्हा मैत्रिणींमुळे तेथील व्यक्तिंना आनंदाचे काही क्षण नक्की अनुभवता येतील. बिल्डिंगमध्ये दर सुट्टीच्या दिवशी विविध खेळांचे आयोजन केल्यास लहान थोर सर्वांचाच छान विरंगुळा होईल, तसेच तुम्हाला येत असलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रशिक्षण वर्ग राबवू शकता, यातून इतरांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

या कल्पना तुमच्या महिला मंडळास ‘उपक्रम राबविणा-या मैत्रिणी’ अशी ओळख नक्की मिळवून देतील, ग्रुपमधील गृहिणी असे कार्यक्रम राबविण्याची मुख्य जबाबदारी सांभाळू शकतात, तर नोकरी करणा-या महिला सुट्टीच्या दिवशी या उपक्रमांना वेळ देऊ शकतात. स्वयंपाक, मुलांची शाळा, नोकरी, घराचे व्यवस्थापन या दिनक्रमापलीकडे समाजभान देणारे कार्य करण्याची इच्छा असल्यास ‘मैत्रिणी’ नावाची ‘स्त्री शक्ती’ उत्तमोत्तम उपक्रमांची आखणी करुन यशस्वी देखील करु शकतात!

More Articles
Designed and Developed by SocioSquares