MAKAR (1)

आरास हलव्याच्या दागिन्यांची!      

आजचा महिलावर्ग नोकरी व घराकामात फार व्यग्र असूनही हाती उरेल तितक्या वेळात सणसोहळे साजरे करण्याचा उत्साह त्यांच्यात कायम आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रुढी परंपरांना आपलसं करत, तर कधी सोयीनुसार त्यात थोडेफार बदल करत आपापल्यापरीने सणाचा आनंद घेणे प्रत्येकीने सुरु ठेवले आहे. वेळ कमी मिळतोय म्हणून नाराज न होता, ‘थोडं घरचं, जमले ते विकतचं’ या सूत्राने सणाचे लाड पुरवले जातात. या नव्या फंड्यातून आता कुठलाही सोहळा सुटलेला नाही.

लग्नातलं रुखवत, दिवाळीचा फराळ, होळीच्या पुरणपोळ्या आणि भर थंडीत येणा-या मकरसंक्रातीचे तिळगूळ आणि हलव्याचे दागिने कधी रास्त, तर कधी जास्त दरात बाजारात उपलब्ध असतात. सणासुदीला अशा रेडीमेड वस्तूंच्या वाढत्या मागणीने कित्येक मैत्रिणींना स्वउद्योगाचे साधन दिले.

कलाकुसरीच्या प्रत्येक वस्तूमागे मेहनत असतेच, त्यातही हलव्याच्या दागिन्यांचे काम भारीच नाजूक. पहिली मकरसंक्रांत असणा-या नवजोडप्यासाठी हौसेने हलव्याचे दागिने बनवले जातात. सोने, चांदी, हिरे, प्लॅटीनमचे दागिन्यांचे कोण कौतुक! पै पै जमपून बनवून घेतलेले महागडे दागिने बाई जितक्या कौतुकाने मिरवते, तितक्यात उत्साहाने एक दिवसीय महत्त्व असणा-या हलव्याच्या दागिन्यांतही रुबाबात वावरते.

स्त्रियांसाठी बांगड्या, मंगळसूत्र, कुड्या, नथ, तन्मणी, कंबरपट्टा, बिंदी, बाजुबंद, अंगठी तर पुरुषांसाठी हार, घड्याळ, नारळ व लहान मुलांसाठी मुकुट, बाजुबंद, हार अशा देखण्या दागिन्यांचे पर्याय असतात. हलव्याच्या दागिन्यांचे तयार सेट विकत घेऊ शकता किंवा साहित्य आणून घरीच हे दागिने बनवू शकता.

MAKAR (3)

बांगड्या बनवताना घरच्याच साध्या बांगड्यांना सोनेरी कागद लावून त्यावर गोंदच्या साहय्याने हलवा चिटकवावा. कानतल्यांचेही तसेच, बिंदी बनवताना सॅटिनची पट्टी वापरता येईल किंवा हाराच्या दो-याने हलव्याला गाठ मारत बिंदीची चेन तयार करता येईल. मुकूट बनवताना पातळ पुठ्ठ्यावर सोनेरी कागद लावून त्याला हवा तसा आकार देत, रंगीबेरंगी टिकल्यांनी मुकूट सजवणे सोप्पे जाईल. अशाप्रकारे, हलव्याच्या दागिन्यांनी नव्याजोडप्यास किंवा तुमच्या घरातील तान्ह्याचा तयार झालेला मकरसंक्रांत स्पेशल लूक एकदम शोभून दिसेल.

Image source – Pinterest

More Articles
Designed and Developed by SocioSquares