vitthal (2)

आषाढ वारीचे नवे पैलू!

झपझप रस्ता कापत विठ्ठल ओढीने पंढरपुरी निघालेल्या भक्तांचा लोंढा आज कळस नजरेस पडताच थक्क होणार, भारावून जाणार आणि सुफळ संपन्न झालेली आणखी एक वारी विठू चरणी अर्पण करत परतीची वाट धरणार. संत परंपरेतून जन्मलेला वारकरी पंथ एका पिढीकडून पुढील पिढीत खोलवर रुजतोय, बहरतोय.

ग्रामीण तसेच, शहराकडील नोकरदार मंडळी वारीत सामील होताना दिसतात. वेळातवेळ काढून वारक-यांसोबत काही अंतर पार करतात आणि त्यांच्या भक्तीपथावर स्वत:जवळील सेवाधर्माची रांगोळी रेखाटण्याचा प्रयत्न करतात. कधी पाणपोई, कधी नाश्त्याची, जेवणाची सोय करत किंवा आरोग्य केंद्रे उभारुन वारक-यांची सेवा करण्याचा हा नवा पायंडा!

पांडुरंगाला भेटण्याचा उत्साह मनात असतोच, पण वयानूसार शरीर चालून चालून थकतेच. अशावेळी, वारक-यांच्या पायाला मॉलिश करुन देणारे, ठेचाळल्या बोट्यांना औषध लावणारे, तब्येतीची मोफत तपासणी करणारे डॉक्टर्स, स्वयंसेवक मोठ्या संख्येनं दिसू लागलेत. विविध स्वयंसेवी संस्था यासाठी पुठाकार घेतात. त्याशिवाय लहान मोठी कुटुंबं एकत्र येऊन स्वत:च असे उपक्रम राबवतात. फक्त स्वच्छतेचे व्रत घेऊन वारीमागून प्रवास करणारेही अनेक आहेत आणि काहिनाही तर किमान वाटेशेजारी दोन क्षण बसून केलेल्या गप्पागोष्टीही सुखावतात वारक-यांना! कारण, इथे कुणीच अनोळखी नसतं. एकमेकांना स्वत:त छान सामावून घेणारी माऊलीची लेकरेच ही सारी!

सुरेख आहे ना?. नोकरी, मुलांच्या शाळा, घर-संसाराचं रहाट गाडगं सांभाळताना, इच्छा असूनही कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करणं कित्येकांना शक्य नसतं, अशावेळी वारकरी नाही किमान सेवेकरी होणं छान आहे की! काय वाटतं तुम्हाला? जरुर लिहा तुमच्या प्रतिक्रिया…

More Articles
Designed and Developed by SocioSquares