Monsoon picnic (2)

इथे नाही गेलात, मग पावसाळा काय अनुभवलात!

उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरु झाल्यात. थोडी विश्रांती घेऊन नोकरदारवर्गही कामावर रुजू झालाय. मे महिन्याच्या सुट्टीत कुणी मामाच्या गावी, तर कुणी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आले असेल, तरी पावसाळ्यात एक ट्रिप हवीच! ऑफीस टू घर, घर टू ऑफीस अशा नियमित सुरु असणा-या दिनक्रमला जरा पावसाळी ब्रेक द्यावा व ऑफीसमधून सुट्टी मिळण्याची अडचण असल्यास विकेंडला वन डे ट्रेकचा प्लॅन करता येईल. ट्रेकींग म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर येतात डोंगररांगा आणि त्यावर वसलेले गड किंवा किल्ले. मुरलेले ट्रेकर्स मोठ्या पर्वतरांगाही सराईपणे पार करतात. नवख्यांनाही या पायवाटेवर यायचे असेल, तर सुरुवात कुठून करावी या प्रश्नाचे उत्तर देणारी भटकंतीची पुढील ठिकाणे जाणून घ्या.

कलावंतीण दुर्ग –
पनवेलच्या पूर्व भागात माथेरानच्या रांगेत वसलेला ‘कलावंतीण दुर्ग’! साधारणत: २३०० फूट उंचांवर असणारा हा किल्ला शेडुंग गावापासून सुरु होतो. चढण, आडवाटेची वळणे, लहान मोठ्या धबधब्यांची सोबत प्रवास अधिक रंगतदार करते. खडकांतून बनवलेल्या पाय-या दुर्ग सर करण्यास सहाय्यक ठरतात. कलावंतीणला जाण्यासाठी पनवेल ते ठाकुरवाडी अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन शेडुंग फाट्यावरुन गडाकडे जाता येते.

सोनगिरी –
महाराष्ट्रातील अनेक सोनगिरी किल्ल्यांपैकी एक पुण्यातील कर्जत जवळ वसलेला दिसतो. या किल्ल्याला ‘आवळसचा किल्ला’ असेही म्हणतात. या किल्ल्याचा माथ चिंचोळा असला, तरी गडावरुन दिसणारे बोरघाटाचे सुंदर दृश्य मन मोहविणारे व सारा थकवा दूर करणारे आहे. या सोनगिरी गडापर्यंत जाण्यासाठी मुंबई ते कर्जत रेल्वेचा प्रवास केल्यावर पुढे ३ कि.मी. अंतरावर असणा-या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरावे. त्या स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो.

कोरीगड-
लोणावळ्याच्या पुर्वेला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा कोरीगड सुमारे ३०५० फूट उंचांवर आहे. किल्ल्याचा माथा एक विस्तृत पठार असून त्यास चौफेर तटबंदी आहे. कोराई देवीचे मंदीर व गणेश टाके गडावरील पाहाण्यासारखी ठिकाणे आहेत. आंबवणे हे या किल्ल्याजवळील गाव असून लोणावळ्याहून खाजगी वाहनाने जाता येईल.

रतनगड –
साधारण चारशे वर्ष जुना असणारा अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड! गडावरील गणेश दरवाजा, रत्ना देवीची गुहा, कडेलोट पॉईंट, कल्याण दरवाजा, नेढ हे गडावरील सर्वांत उंच ठिकाण पाहाण्यासोबत पावसाळ्यातील नयनरम्य निसर्गाचा आस्वाद घ्यायचा तर रतनगड ट्रेक एक उत्तम पर्याय आहे. रतनवाडीला पोहोचण्यासाठी अकोले – रतनवाडी अशी बससुविधा उपलब्ध आहे. तिथपासून गडावर पोहोचण्यासाठी साधारण ३ तास लागतात.

हिरवागार निसर्ग जवळून अनुभवायचा तर, पावसाळी ट्रेकिंगला जायला हवेच. रिमझिम सरी, हवेतील गारवा व पायवेटेने जाणारा चढणीचा रस्ता पार केल्यावर जरा दमछाक होते, पण उंचावर पोहोचून डोळे दिपवणारे हिरवेगार सौंदर्य पाहिले, की तासनतास चालण्याचे चीज होते. नवख्या ट्रेकर्सनों, तुम्ही कुठलाही पर्याय निवडा, फक्त भटकंतीचा मोह व आत्मविश्वासाची शिदोरी सोबत ठेवाल, तर ट्रेक लहान असो किंवा मोठा तुम्ही तो सर करालच!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares