sunscreen (1)

उन्हामुळे टॅन होणा-या त्वचेसाठी!

सुखकारक थंड वारा अनुभवला, आता त्रासदायक उन्हाच्या धारा सुरु होणार, तेव्हा त्वचा काळी पडू नये म्हणून घरात बसून रहायचा किंवा ऊन पाहून घराबाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. कॉलेजला जाणा-या, नोकरी करणा-या महिलांना ठरल्यावेळी घरातून निघावेच लागते. सनग्लासेस, सनस्क्रीम, स्कार्फ, सनकोट अशा चिजवस्तू वापरत शस्त्रधारी होऊन बाहेर पडलो तरी त्वचा टॅन होतेच आणि कित्येत महिने ती तशीच रहाते. त्वचेवरील हा काळसरपणा काढून टाकण्यासाठी पुढील घरगुती उपाय करुन पाहा. यामुळे त्वचेवर काळसरपणा चढणार नाही व कडाक्याच्या उन्हातही ती पुन्हा स्वत:चा रंग सोडणार नाही.

  • घरच्याघरी टॅन स्क्रबर तयार करताना, त्वचेला थंडावा देणारी काकडी प्रथम किसून घ्यावी. त्यामध्ये, कोरफडीचा गर, साखर व दोन थेंब ऑलिव्ह ऑईल मिसळून तयार झालेले स्क्रबर १५ ते २० मिनिटे टॅन झालेल्या त्वचेवर लावावे. आठवड्यातून तीन ते चार वेळा असे नियमित स्क्रबिंग करावे.

 

  • लहानश्या एक वाटी गुलाब पाण्यात दोन टिस्पून बेसन, थोडे दूध व चिमूटभर हळद मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. ही पेस्ट टॅन झालेल्या त्वचेवर लावून पूर्ण सुकू द्यावी व नंतर थंड पाण्याने त्वचा धुवावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा.

 

  • सध्या अननसाचा सीझन सुरु असून, या फळाचाही टॅनिंग कमी करण्यात वापर केला जातो. यासाठी अननसाच्या गरात दोन चमचे मध मिसळून त्याची पेस्ट बनवावी. तयार पेस्ट १० ते १५ मिनिटे टॅन झालेल्या त्वचेवर लावावी व नंतर धुवून टाकावी. आठवड्यातून साधारण तीनदा हा उपाय करावा.

 

  • बेकींग सोड्यात थोडे पाणी घालून त्याचा लेप तयार करुन घ्यावा. तो काळवंडलेल्या त्वचेवर लावावा. साधारण तीन ते चार मिनिटांनी थंड पाण्याने त्वचा धुवून घ्यावी.

 

  • ताकात थोडा दलिया मिसळून त्याचा लेप तयार करावा. टॅन झालेल्या त्वचेवर हा लेप लावून हलक्या हाताने त्वचेला मसाज करावा. दिवसाआड हा उपाय केल्यास उत्तम फरक जाणवू लागेल.

 

  • करायला सहज सोप्पा असा फळांचा लेपही टॅनिंग कमी करण्यास उपयुक्त ठरतो. यामध्ये, केळी, सफरचंद, संत्र्याच्या सालांचे चुर्ण मिसळून जाडसर लेप तयार करावा. २० ते ३० मिनिटे टॅन झालेल्या त्वचेवर लावून नंतर पाण्याने धुवून टाकावा.

तसे उन्हाचे चटके बसू लागलेच आहेत. सहन न होणारा गरम वाफारा नाजूक त्वचेस पार नकोसे करुन सोडतो. हा उष्मा त्वचेला सहन होत नाही, म्हणून ती जळजळते, लालसर होते, आर्द्रतारहित होऊन रखरखीत व कळसर पडू लागते. अशी त्वचा दिसायला रुक्ष व मृत दिसू लागते. म्हणून, वेळीच तिच्यापर्यंत योग्य पोषकतत्वे पोहोचायला हवीत आणि त्यासाठी, करायला हवेत तिला तजेलदार ठेवणारे वरील घरगुती उपाय!

More Articles
Designed and Developed by SocioSquares