vacatio0ns (2)

उन्हाळी सुट्टीसाठी गंमतीशीर गोष्टींची यादी!

परिक्षा संपली, की मुलांहून अधिक पालकच सुटकेचा नि:श्वास सोडतात. वर्षभराचा अभ्यास, गृहपाठ, वाचन, पाठांतर, उजळणी, जागरणाच्या अनंत रात्रीनंतर मोठ्ठाली विश्रांती घेऊन येणा-या वार्षिक परिक्षेनंतरच्या सुट्टीत करायचं काय? हा भयंकर प्रश्न आ वासून उभा रहातो. कारण, रोजचं वेळापत्रक पुढचे काही आठवडे विस्कळीत होणार असतं आणि काही करायला नसल्यामुळे दोन चार दिवसातच मुलं कंटाळतात. पुन्हा आईमागे भुणभुण सुरु. “मी काय करु?”, “बाहेर फार ऊन आहे”, “कुणी खेळायलाही नाही”, अशा कंटाळ्यावर उपाय म्हणून मुलांना समर कॅप्स, एक्टिव्हिटी क्लासेस किंवा कच्चा विषय पक्का करुन घेणा-या समर ट्युशन्सना दाखल केलं जातं.

मज्जा, मस्ती धांगडधिंगा करायला मिळणार असेल, तर मुलं उड्या मारत जातात मात्र अभ्यासाशी निगडीत काही असेल, तर मात्र त्यांचा हिरमोड होतो. वर्षभर अभ्यास केल्यावर पुन्हा सुट्टीत, तेच डोक्याचं काम करण्याची इच्छा कुणाला असेल बरं? म्हणूनच घेऊन आलोय आजचा हलकाफुलका लेख ज्यात देत आहोत, सुट्टीत दंगा करण्याच्या मजेशीर पद्धती!

काहींच्या परिक्षा संपल्यात, तर काहींच्या संपण्याच्या वाटेवर आहेत. तेव्हा, आपण जरा पूर्वतयारी केलेली बरी. म्हणजे, छोटे टेशन्स फ्री होताच त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात सज्ज राहू. लहान मुलांना नेहमीपेक्षा काही नवं, कलात्मक करण्याची संधी देताच, त्यांचा उत्साह पहाण्याजोगा असतो. हीच निरागसता नजरेसमोर ठेवून पुढील पर्याय सुचवत आहोत.

  • चित्र काढण्यास, रंगरंगोटी करण्यास नापसंती दर्शवणारं क्वचित एखादं मुल असेल. अंग तोंड रंगाने बरबट्याइतपत ते चित्रकलेत गुंतून जात असतील, तर यंदा अंगठ्याचे, हाताचे, पायाचे छापे काढत त्यातून तयार होणारी विविध चित्रे त्यांना शिकवा. हे नेहमीपेक्षा काहितरी वेगळं आहे नं? त्यांना नक्की आवडेल.
  • घरातील बच्चेकंपनी तुम्हाला किचनमध्ये मदत करत असेलही, पण सुट्टीत खास त्यांना आवडेल असं आईस्क्रिम, केक, कुकीज्, जेली, पुडींग हे असे पदार्थ खास त्यांना बनवायला शिकवा, अर्थात तुमच्या मार्गदर्शनाखाली. हे गंमत मुख्यत्वे मुलांकडून करुन घ्या, म्हणजे किचनमधील कामे फक्त मुलींची हा गैरसमज त्यांच्या मनातून हसत खेळत दूर करण्यास मदत होईल.
  • घराभोवताली जागेची कमतरता असल्यामुळे मैदानी खेळ खेळणे मुश्किल होते. अशावेळी, त्यांना हुला हूप, दोरीच्या उड्या, जादूचे प्रयोग शिकवता येतील. यामध्ये त्यांच्या मित्रमंडळींसना सहभागी करुन घेऊ शकता.
  • सुदैवाने जागेची कमतरता नसेल, तर जुने खेळांशी त्यांची ओळख करुन द्यायला विसरु नका. लगोरी, विटीदांडू, ठिकरीचा खेळ त्यांना शिकवता येईल.
  • आणखी एक गंमतीशीर गोष्ट, जितके दिवस सुट्टी तितक्या दिवसांसाठी काहीतरी मजेदार बाबी शोधून काढायच्या. पालकांनी पहिल्याच दिवशी त्याची यादी बनवून त्यासमोर तारीख लिहावी. अशी यादी एकदा तयार झाली, की रोज सकाळी उठल्यावर तारखेसमोर आज काय बरे वाट्याला आले आहे, ते मुलांनी वाचायचे आणि त्यानुसार दिवसभरात ती नवी गोष्ट उरकायचीच. उदा. एक रोप लावणं, कागदाची फुलं बनवायला शिकणं, सायकलवरुन किमान अंतर पार करणं, किचनमध्ये स्वत:हून पदार्थ बनवणं इ.इ. या ना अशा अनेक लई मजेदार गोष्टींचा त्यात समावेश करता येईल. यामुळे, सुट्टीचा प्रत्येक दिवस मुलांना काहितरी नवं सरप्राईज मिळेल.

सुट्टीचा काळ जर का इतका उल्हासात गेला, तर सुरु होणारं नवं शालेय वर्ष दणक्यात सुरु होईल आणि ‘आठवणीतील सुट्टी’ या निंबधांतर्गत लहानग्यांकडे लिहायला भरपूर अविस्मरणीय गोष्टींचा साठा जमा झाला असेल.

 

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares