Pet Banner

उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांचे आरोग्य कसे जपाल?

पाळीव प्राणी पालकांसाठी अत्यंत काळजीचा आणि प्राण्यांची देखरेख करण्याचा ऋतु म्हणजे उन्हाळा. जशी माणसांना उन्हाळ्याची झळ बसते त्याचप्रमाणे प्राणी सुद्धा उष्णतेच्या तडाख्यात येतात. उष्माघाताच्या अतिरेकाने काही प्राणी जीव सुध्दा गमावतात. हा बदल जरी साहजिक असला तरी आपण काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर प्राण्यांना होणारा त्रास हा थोडया प्रमाणात कमी होऊ शकतो.

वाढत्या उन्हाळ्याच्या तापमानानुसार आपसूकच प्राण्यांच्या शरीराच्या तापमानात सुध्दा फरक पडतो. त्याचा परिणाम म्हणजे केस गळणे किंवा विरणे, भूक न लागणे किंवा कमी खाणे, प्राणी आळसावलेले असणे. ही लक्षणे ब-याच प्राण्यांच्या बाबतीत दिसून येतात. मात्र जर त्यात अधिकच बदल जाणवू लागले तर मग वैदयकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असते. उन्हामुळे त्वचा होरपळणे, उष्माघात, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, कफ होणे श्वास घ्यायला त्रास होणे. वेळच्या वेळी काळजी घेतल्यास हा होणारा त्रास टाळता येऊ शकतो.

प्राण्यांचे आरोग्य आणि त्यांना होणारे त्रास जाणून त्या दृष्टीने उपाय करणे हे अत्यंत गरजेचे असते. काही प्राणीपालक हे उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून प्राण्यांना रोज आंघोळ घालतात तसेच केस गळतात म्हणून ते कापून टाकतात. पण रोज आंघोळ घातल्याने प्राण्यांची त्वचा शुष्क पड़ते आणि केस कापल्याने त्यांची त्वचा उष्माघाताने होरपळते. म्हणून 2 ते 3 दिवसांच्या फरकाने आंघोळ घालावी आणि अगदीच गरज वाटली तर ओल्या फड़क्याने अंग पुसून घ्यावे. तसेच केस बारीक कापून टाकण्याऐवजी त्याची लांबी थोड़ी कमी करावी. पक्षी असेल तर त्यांच्या पिंज-यात मुबलक प्रमाणात पाणी असावे आणि ते दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी बदलावे. तसेच त्यांचा पिंजरा हा उन्हापासून दूर सावलीत ठेवावा.

उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी अनेक नवनवीन उत्पादने ही सध्या ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध आहेत. जसे की वॉटर फ़ाउंटन. ज्यामुळे प्राण्यांना कायम स्वच्छ, थंड आणि वाहते पाणी मिळते आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे पाणी वाया जात नाही. तसेच त्यांच्या त्वचेसाठी सुती, तलम शर्ट, स्प्रे, पावडर आणि खाण्याची नवीन उत्पादने ही बाजारात उपलब्ध आहेत.

तसेच जर तुम्ही कुठला प्राणी पाळला नसेल तरी सुध्दा भटक्या प्राण्यांसाठी त्यांच्या नेहमीच्या वास्तव्याच्या ठिकाणी जमल्यास रोज थोड़े पाणी ठेवावे. तसेच तुम्ही राहत असलेल्या सोसायटीच्या गच्चीत किंवा घराच्या खिड़कीत कावळे, कबूतर किंवा तिथे विसाव्याला येणा-या अन्य पक्षांसाठी रोज थोड़े पाणी ठेऊ शकता. म्हणजे जेणेकरून ऐन गर्मीच्या मौसमात ते सुध्दा पाणी पिऊन संतुष्ट व तृप्त होतील आणि त्यांचे जीवन काही प्रमाणात सुखकर होईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares