SINGLE (1)

एकलं पालकत्व स्विकारताना!

लहान मुलांना आई किंवा बाबा यातील सर्वाधिक कोण आवडतं तुला, असं विचारल्यावर ते बालमन पार गोंधळून जातं. उत्तर देणं जमत नाहीच त्यांना. कारण, दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात, लाड करतात, हट्ट पुरवतात. त्या वयात लहानग्यांना दोघांपैकी एकाचं नाव घेणं जितकं कठीण जातं. त्याहून कित्येक पटींनी आव्हानात्मक असतं आई-बाबा या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तिनं निभावणं. कारण, आई बाळाचा श्वास असेल, तर बाबा त्या बाळाचं ह्रदय असतो. या दोन्ही व्यक्तिंवर पाल्याच्या वेगवेगळ्या जबाबदा-या असतात आणि त्या जेव्हा आई किंवा बाबा यापैकी एकावर येतात, तेव्हा त्या व्यक्तिस मानसिक, सामाजिक व ब-याचदा आर्थिक दडपणाखालूनही जावं लागतं.

एकाच्या अकाली निधनाने किंवा नोकरी करिअर घरापासून आई किंवा वडील दूर असेल तर दुस-यावर पालकत्वाची जबाबदारी येते. तसेच घटस्फोटानंतर मुल ज्याकडे असेल, त्याकडे एकलं पालकत्व येतं. अशावेळी, आर्थिक परिस्थितीचे संतुलन साधत घर, नोकरी, मुलाचं शिक्षण, संगोपन सारंच पाहावं लागतं. स्वबळावर पैशाचा प्रश्न सोडवता येईलही, पण त्याआधी स्वत:चा स्वत:ला मानसिक आधार असणं जास्त गरजेचं आहे.

पुन्हा लग्न न करता जीवनातील पुढील वर्ष जोडीदाराच्या आठवणीत व बाळाच्या साथीनं घालवण्याचा निर्णय घेण्यासही वाघाचं काळीज लागतं. माणूस समूहात रहाणारा प्राणी, त्याला कायम कुणाच्यातरी आधाराची गरज लागते. इथे शारीरिक गरजेकडे दुर्लक्ष करुन नाही चालायचे.  या सा-यावर पाणी सोडत, वाट्याला आलेल्या किंवा स्वइच्छेने स्विकारलेल्या एकट्या जगण्यासमोर खचून न जाता, खंबीरपणे आई-बाबा या दोन्ही भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला तयार करावं लागतं. समाजातील कुजबूज, संशयी नजरा, शाब्दिक चटक्यांकडे दुर्लक्ष करण्याची कला अवगत करायला हवी.

जास्तीत जास्त व्यस्त रहावं. म्हणजे, फक्त नोकरी किंवा घरकाम नाही तर त्यापलिकडे काही छंद जापासावेत. गायन, नृत्य अथवा एखादं वाद्य शिकावं, वाचन, लिखाणासारख्या कुठल्याही कलेशी मैत्री करावी म्हणजे नकळतपणे स्वत:ला वेळ देता येतो.

शाळा, ऑफीसच्या डब्यासाठीचे पदार्थ आणि घरच्या जेवणाचं आठवडाभराचं वेळापत्रक एकदाच सुट्टीच्या दिवशी तयार करावं. अशाने आवश्यक जिन्नस खरेदी करण्यात सारखा वेळ जात नाही. किचनमधील कामं पटपट आवरतात. दैनंदिन वेळापत्रकात आलेला तोचतोचपणा घालवण्यासाठी आठवड्यातून एकदा फिरायला जाणं तर सवयीचं व्हायला हवं.

घरातील सगळ्या जबाबदा-या एकट्यानं पार पाडाव्या लागल्यानं, कधीकधी चिडचिड होते. तो राग मुलांवर निघतो. अशावेळी, गरज असते संयमाची. नियमित मेडीटेशन करण्याचा फायदा इथे जाणवेल.

तुम्ही उत्कृष्टरित्या एकट्यानं बाळाला सांभाळताय. तेव्हा या चोख कामाचं कौतुक तर व्हायलाच हवं. कोण बरं पाठीवर शाब्बासकची थाप देणार? उत्तर सोप्पय. आपण स्वत:! बाळ झोपी गेल्यावर छानसं गाणं ऐकत, गरमागरम चहाचे घोट घेत, शांत बसून रहा केव्हातरी. हा एकटेपणा नसतो, असतो एकांत जो आपल्याला बळ देतो उद्याच्या नव्या जबाबदा-यांसमोर निर्भिडपणे उभं रहाण्याचं!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares