Hotel Booking BANNER

ऑनलाईन हॉटेल बुक करताना ‘हे’ लक्षात ठेवा!

परिक्षा संपून सुट्टी लागताच, सारेजण भटकंतीचे बेत तडीस नेण्याच्या तयारीला लागतील. काही थेट स्वत:चे गाव गाठतील, तर काही अनोळखी शहर पहाण्याचा ठराव मांडतील. अशा नव्या ठिकाणी जाताना टिकीट बुक करण्यासोबत छानसे हॉटेलही बुक करावे लागेल. कारण, अनोळखी ठिकाणी प्रथम रहाण्याची सोय होणे महत्त्वाचे, यासाठी ऑनलाईन हॉटेल बुक करणे अगदी सोयीचे! घरबसल्या दूर कुठेतरी वसलेल्या हॉटेल्सचे फोटोज, आजूबाजूचे वातावरण, तेथील सोयी सुविधा व किंमती पहाता येतात.

मुक्काम

हॉटेलच्या साईटवर त्या हॉटेलचे शहरातील स्थान ऑनलाईन मॅपद्वारे दाखवलेले असते, त्याआधारे रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा इतर सुविधा हॉटेलपासून जास्त दूर नसतील याची खात्री करुन घ्यावी. विविध हॉटेल्सच्या साईट्सवरील असे मॅप पाहून मगच हॉटेल बुक करावे, नाहितर शहरापासून दूर आडनिठ्या ठिकाणी हॉटेल असल्याचे तिथे पोहोचल्यावर समजते.

नियम व अटी

हॉटेल कंपनीच्या नियमावलीवरुन न कंटाळता एक नजर टाकावी. चेक इन किंवा चेक आऊटच्या वेळा समजून घ्याव्यात व त्यानुसार बुकिंग करावे. बरेचदा ठरल्यावेळेपेक्षा एखाद तासात अधिक चेकआऊट करण्यास लागला, तरी जास्तीचे एका दिवसाचे बिल भरावे लागते. हॉटेलचे असे नियम ऐनवेळी समोर येतात आणि पिकनिक मोडवर विरझण पडायला इतके कारण पुरते.

ऑनलाईन बुकिंगमध्ये पेमेंट करताना एकाचवेळी संपूर्ण पैसे भरण्यापेक्षा, थोडी रक्कम आधी व उरलेली हॉटेलमध्ये पोहोचल्यावर भरणे उचित ठरेल. पेमेंटबाबत अशा सुविधा देणारी हॉटेल्स उपलब्ध असून, फोनद्वारे तशी चौकशी करुन घ्यावी.

तुलना

हॉटेल्सना त्यांच्या साईट्सवर सविस्तर माहिती देणे भाग असते. तेव्हा, वेगवेगळ्या हॉटेल्सच्या किंमतींची नीट तुलना करता येईल. अशी तुलना पैशाची बचत करण्यास सहाय्यक ठरते. परवडणा-या दरात योग्य हॉटेल निवडता येते.

लोकांचे फिडबॅक्स

काही हॉटेलच्या साईट्सवर त्या हॉटेलमध्ये आधी जाऊन आलेल्या प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविलेल्या असतात. तिथले वातावरण किंवा सुविधांविषयी लिहिलेले असते. जे वाचून त्या हॉटेलविषयी आपल्याला थोडे अंदाज बांधता येतील. हॉटेलची निवड निश्चित करता येईल.

अशाप्रकारे, पूर्वनियोजनात हॉटेल बुकिंगबाबात योग्य काळजी घेणे गरजेच असून अनोळखी शहरात किंवा देशात जायचे, तर निष्काळजीपणा करुन चालायचे नाही. ऑनलाईन व्यवहारात होणा-या फसवणूकींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या जाळ्यात न अडकत प्रवास सुखकर पार पडावा यासाठी इतकी खबरदारी बाळगावीच लागेल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares