Medicines (1)

औषधांच्या गोळ्यांची संगत…!

धकाधकीची जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देते. घरकामाच्या जबाबदा-या, ऑफिसमधील कामाचा व्याप, प्रवासाचा ताण सा-याचा ताळमेळ साधताना मानसिक आणि शारीरिक दगदग होणं सहाजिक आहे. त्यातून, अनेक छोटी मोठी दुखणी अधनंमधनं उद्भवतात. जसे की, डोकेदुखी, बैठ्याकामाने येणारी पाठदुखी, कधी सांधे किंवा संपूर्ण अंगही दुखू लागते. तर कधी, ताप, सर्दी, खोकला असे झटकन संसर्ग होणारे आजार जडतात.

अशा नानात-हेच्या दुखण्यांवर बहुतांश व्यक्ती, डॉक्टरकडे जाण्यापेक्षा स्वत:चं डोकं वापरुन औषधाची एखादी गोळी घेतात. कारण, व्यस्त दिनक्रमामुळे आधीच वेळेची कमतरता असते. इथे आठवड्याची एक सुट्टी मिळताना मारामार, त्यात डॉक्टरांकडे कधी जाणार आणि सुट्टीच्या दिवशी बिलकूल घराबाहेर पडावेसे वाटत नाही. अशावेळी, गेल्यावेळेला डॉक्टरांनी समान आजारावर लिहून दिलेली गोळी किंवा मग कुणी सुचवेल तशा औषधाच्या गोळ्या घेण्यावर भर दिला जातो. शक्यतो वेदनाशामक गोळी घेऊन, तेवढ्यापुरतं बरं वाटू लागलं, की आपणही काम पुन्हा सुरु करतो. परत त्रास होऊ लागला की, तीच गोळी परत एकदा…हे सत्र सुरुच राहते.

या सा-यात शरीर, मन थकल्याचे संकेत देतेय याकडे दुर्लक्षच करतो आपण! प्रतिकारशक्ती कमी झाली, की आजार जडतात. अस्वस्थ, अशक्त वाटते. काम करुन मेंदू थकतो आणि मानसिक ताण सहन न झाल्याने कामात मन लागत नाही, आळस, चिडचिड, नैराश्य बळावते. यावर उपाय म्हणून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्यास टाळाटाळ करुन, मनाला रुचेल त्या गोळ्या घेत राहण्याचे दुष्परिणाम शरीराला भोगावेच लागतात.

डॉक्टरांच्या सल्ल्याविना काही औषधांच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्याने ह्दय तसेच, मेंदूंकडे जाणा-या रक्त वाहिन्यांत ब्लॉकेजस होण्याची शक्यता असते. जठरावर ओरखडे उठून रक्तस्त्राव होऊ शकतो. आतड्यांवर अल्सर होण्याचा धोका संभवतो. असे विकार बळावू नयेत, कुठल्याही आजारावर किंवा दुखण्यावर स्वत:च्या मर्जीने गोळ्या घेण्याची चूक बिलकूल करु नये. वेदनाशामक गोळ्यांची शरीराला सवय लावू नये. शक्यतो, घरगुती औषधोपचार करावेत. अशा उपचारांचे कुठलेही दुष्पपरिणाम होत नसल्याने ते सर्व वयोगटासाठी फायदेशीर ठरतात. त्यानंतरही दुखणे बळावत असल्याचे जाणवल्यास आणि डॉक्टरांकडे जाणे शक्य नसल्यास, डॉक्टरांशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसारच ते सांगतील त्या व तितक्याच गोळ्या घ्याव्यात. कुठल्याही गोळीचा प्रभाव जाणवण्यासाठी साधारण १५ ते ३० मिनिटांचा अवधी जावा लागतो, त्यामुळे तितका धीर आपण धरायला हवा.

सणसोहळ्यानिमित्त महिला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतात. त्यांचाही अतिरेक शरीरासाठी हानिकारक ठरतो. यामुळे, गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. भविष्यकाळात बाळात व्यंग उद्भवण्याची शक्यता वाढते. तेव्हा, कुठल्याही प्रकारची औषधाची गोळी घेताना, प्रथम त्याचे फायदे व तोटे डॉक्टरांकडून समजून घेणे अत्यावश्यक आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares