home rent (1)

मालक भाडेकरुंमधील कायद्याचे नाते…

माणसांची संख्या वाढली आणि राहाण्यासाठी घरांची कमतरता भासू लागली. घराच्या किंमतीही गगनाला भिडल्यामुळे घर विकत घेणेही अवघड होऊन बसले अशावेळी भाड्यावर राहणे अधिक परवडणारे ठरले. शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त ठिकाण बदलल्यावर नवीन जागी घर विकत न घेता, भाड्याने घर किंवा एखादी खोली घेण्याला पसंती मिळाली यातून ज्याच्या मालकीचे घर त्याला देखील आर्थिक फायदा होऊ लागला. सध्याच्या काळात भाडोत्री ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. असे भाड्याने घर देण्याची प्रक्रिया नियमानुसार व्हायला हवी. मालक व परवानाधारक दोघांनी या नियमावलीचा अवलंब करायला हवा.

1. भाडेकरु ठेवताना प्रथम महाराष्ट्र भाडेनियंत्रण कायद्याविषयी माहिती करुन घ्यावी.

2. भाडेकरु ठेवताना त्या व्यक्तिची संपूर्ण चौकशी करावी, आधारकार्ड व ओळखपत्र याची मुख्य प्रत तपासून घ्यावी.

3. त्याचे कुटुंब, सध्याचे राहते घर(मूळ निवास स्थान) याची देखील फेरतपासणी करुन व्यक्तीने दिलेली माहिती खरी आहे की खोटी, याची खात्री करुन घ्यावी.

4. भाडेकरु नोकरी करणारा असल्यास त्याच्या कंपनीचे ओळखपत्र, पेमेंट स्लीप, कार्यालयाचे पत्र व त्याचे नोकरीवर रुजू असल्याचे प्रमाणपत्राची झेरॉक्स तपासावी.

5. विद्यार्थी असल्यास महाविद्यालयातील ओळखपत्राची झेरॉक्स प्रत घ्यावी.

6. मिळालेल्या माहितीद्वारे त्याचे निवासाचे कारण म्हणजेच, भाडेकरु कोणत्या कारणासाठी राहणार आहे त्याबाबतची माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

7. घरमालक व भाडेकरु यांमध्ये झालेला करार व त्याची नोंद जवळच्या पोलिस स्टेशनला करणे आवश्यक आहे.

8.भाडेकरुसोबत करार करताना मर्यादित वेळेपर्यंतच करावा. करार संपल्यावर नवीन कागदपत्रे बनवण्याकडे लक्ष द्यावे.

वरील, माहिती मालकाने कशी सावधगिरी बाळगावी हे सांगते तसेच, ज्यांना असे भाड्याने घर घ्यायचे आहे त्या व्यक्तिने देखील काही गोष्टींबाबत सतर्क राहायला हवे.

1. घरमालकीची कागदपात्रे तपासून घ्यावीत, तुम्ही ज्या घरासाठी पैसे देणार आहात ते अधिकृत आहे की नाही हे जबाबदारीने पडताळावे.

2. करार नीट तपासून पाहावा, काही शंका किंवा न समजलेला मुद्द्याचे वेळीच निरसन करुन घ्यावे.

3. सर्वांत महत्त्वाचे कर भरल्याची पावती देखील तपासावी.

4. मालकाची समाजातील ओळख, स्वभाव असा एकूण अंदाज घ्यावा.

अशाप्रकारे, भाडेकरुने देखील जागरुक असणे आवश्यक आहे. तसेच, भाडेनियंत्रण कायद्यामध्ये काही बदल झाल्यास त्यानुसार करारात देखील बदल करणे, मालक व परवानादार दोघांच्याही फायद्याचे आहे.

घडलेल्या घटनांचा मागोवा घेतला असता लक्षात येते की, सध्याच्या काळात सतत सतर्क असणे आवश्यक आहे. कुठलेही व्यवहार करताना थोडी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares