fortycareer 1

करिअरच्या ‘वय’ वाटा!

संसाराचा डोलारा सांभाळताना व्यस्त झालेल्या महिलांना सरत्या वयात साक्षात्कार झाल्यागत अचानक जाणवतं, आपले छंद, आपलं करिअर फार मागे राहून गेलं. मुलांची स्वप्नच भरभरुन जगलो, दिवसरात्र एक करुन त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं आणि आज घर खर्चापासून स्वखर्चापर्यंत सा-यासाठीच नवरा किंवा कमवत्या पाल्ल्यावर अवलंबून रहावं लागतंय.

हातात कितीही रक्कम असली, तरी स्वकष्टाने कमवलेले पैसे दडपणाशिवाय खर्च करता येतात. क्वचित हिशोब लागला नाही, तरी चालून जातं. तरुणपणी नोकरी करणा-या स्त्रिया आधी लग्नामुळे, मग बाळंतपण, कुटुंब, मुलांच्या शाळा, क्लासेसच्या वेळा सांभाळताना पूर्णवेळ गृहिणी होण्याचा निर्णय घेतात. मुल शाळेत जायला लागलं, की पुन्हा नोकरी धरण्याचा मार्ग वाढलेल्या जबाबदा-यांपुढे पुसट होत जातो. 

पण मैत्रिणींनो, वय वाढलं म्हणून स्वप्न पहाणं थांबवायचं नाही. गृहिणी चाळीशी वा पन्नाशी नंतरही स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करु शकते. पुन्हा नव्याने करिअरची वाट धरु शकते, तिही स्वत:च्या हिंमतीवर! फक्त जबरदस्त इच्छाशक्ती हवी… मग, आहात ना तयार? पुन्हाएकवार स्वत:समोर संधींच दालन खुलं करण्यासाठी, अपूर्ण राहिलेलं स्वप्नपूर्ण  करण्यासाठी. किमान अडीअडचणीला स्वत:जवळ स्वत:ची अशी पुरेशी रक्कम हवी यासाठी तरी प्रत्येक स्त्रीने कमवतं असायलाच हवं. 

बरेचदा असं होतं, की मनाची तयारी असते, कुटुंबातील व्यक्तिंचा पाठींबा असतो पण नेमकी सुरुवात सापडत नाही. श्रीगणेशा कसा व कुठून करावा या विचारातच काही महिने वर्ष निघून जातात आणि नोकरी किंवा घरगुती व्यवसाय करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरत नाही. कधी मन तयार असतं, मार्ग समोर असतो पण घरच्या मंडळींची संमत्ती नसते. पण,  या व अशा अनेक समस्यांवर उपाय शोधत स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीच तर आम्ही हा लेखप्रपंच सुरु केलाय. 

हा संकल्प एकतर्फी व्हायला नको, म्हणूनच तुम्ही comment box मध्ये तुमची मतं, विचार, समस्या, प्रश्ना दिलखुलासपणे लिहायचे आहेत. तरच यास संवादाचे रुप मिळेल आणि हा उपक्रम सार्थकी लागेल. तेव्हा, भेटूया दर शनिवारी ‘करिअरच्या ‘वय’ वाटा’ या लेख मालिकेद्वारे इथेच आपल्या झी मराठी जागृतीवर! 

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares