Inspiration > कविता राऊत, क्रीडा
kavita-raut

कविता राऊत, क्रीडा

भारताची ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून जी ओळखली जाते त्या ‘कविता राऊत’ चा सन्मान झी मराठी ने ‘उंच माझा झोका’ पुरस्कार देऊन केला. प्रतिकूल परिस्थिती विरुध्द लढून नवी वाट चोखाळणाऱ्या कविताचा खडतर प्रवास आपल्यासाठी खरोखर प्रेरणादायी आहे.

नाशिकमधल्या सावरखेडा नावाच्या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या कविताच्या धावपट्टीचा प्रवास हा याच छोट्याशा गावातून झाला. २००१ मध्ये फक्त १५ दिवसांचे प्रशिक्षण करून ती १५०० मीटर ३००० मीटर धावली आणि पहिले राष्ट्रीय रौप्य पदक पटकावले. ”यानंतर मला आत्मविश्वास आला आणि मी यामध्ये आणखी प्रयत्न करू शकते याची मला जाणीव झाली. माझे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी माझी १० हजार मीटर धावण्याची क्षमता पाहिली आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी इथंवर पोचू शकले” अशा भावना कविताने व्यक्त केल्या.

सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रवास हा तिच्या धावण्याप्रमाणेच वेगवान होता. नुकतच तिने १० किलो मीटर धावून भारतीय राष्ट्रीय विक्रम नोंदवला त्याचबरोबर हाफ मेरेथॉनमध्ये देखील भारतीय राष्ट्रीय विक्रमाची ती मानकरी ठरली. २०१०च्या कॉमन वेल्थ खेळात १० हजार मीटरच्या शर्यतीमध्ये कांस्य पदक मिळवणारी कविता हि पहिली भारतीय महिला धावपटू आहे. १८ मे २०१० रोजी कोची येथे झालेल्या ५०व्या ‘नॅशनल ओपन ऑलिम्पिक मीट’ मध्ये १० हजार मीटरच्या शर्यतीमध्ये कविताने प्रीजा श्रीधरन हिचा आधीचा विक्रम मोडून नवीन विक्रम नोंदवला. ८ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ खेळातील १० हजार मीटर अंतर केवळ ३३:०५:२८ वेळेत पार करून कांस्य पदक पटकावले. १९५८ च्या कार्डिफ राष्ट्रकुल खेळामध्ये ४४० यार्ड धावण्याच्या स्पर्धेत भारतीय धावपटू मिल्खासिंगने वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले होते. त्यानंतर भारतीय धावपटूने गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळात मिळवलेले हे राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक ठरले आहे. त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेच्या भारतीय महिला महिला धावपटूने वैयक्तिक पदक मिळवण्याची इतिहासात पण हि पहिलीच वेळ आहे. सर्वात शेवटची पण महत्वाची गोष्ट म्हणजे कविताला २०१५ साली प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार ; क्रीडा प्रकारातील ‘सुवर्णरत्न’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Designed and Developed by SocioSquares