defence banner

मैत्रिणींसाठी नववर्षी स्वसंरक्षणाचा संकल्प….

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी !’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे आणि याच पार्श्वभूमीवर बोलायचे झाले तर जी जगाचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे ती स्त्री स्वतःच रक्षण करण्यासाठी सक्षम नक्कीच आहे. ‘स्त्री जन्मा, तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी ! नयनी पाणी ? हो,पण हे पाणी तिच्या हळव्या भावना आणि आनंदाश्रू यांमुळे आहे. दुबळेपणामुळे नक्कीच नाही . हं , हे मात्र खरं की, आजूबाजूला किंवा बातम्यांमधून समोर येणा-या घटना पाहिल्यानंतर हतबल व्हायला होतं ; पण त्यामुळे आपण स्त्रिया कमजोर आहोत किंवा स्वतःच रक्षण करण्यासाठी असमर्थ आहोत असा अर्थ अजिबात नाही; किंबहुना अशी हतबलता आलीच तर ती तात्काळ झटकून द्यायला हवी आणि त्याच दृष्टीने तुमचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘झी मराठी जागृती’ कायमच तत्पर आहे. आजकाल रुटीनमध्ये आपण इतकं व्यग्र असतो की धावपळीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित होतात. सगळ्याच बाबतीत आपण पुढारत आहोत पण हो आता त्या पुढारलेपणामध्ये स्वसंरक्षणाची बाब देखील अधोरेखित व्हायला हवी. होय ! प्रत्येकीनेच स्वसंरक्षणाची कास धरायला हवी.

त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

सावधगिरी :
स्वसंरक्षणाची पाहिली पायरी म्हणजे सावधगिरी. छोट्यामोठ्या गोष्टीतला हलगर्जीपणा आपल्याला चांगलाच महागात पडू शकतो . उदा: अज्ञात वस्तुला हात लावणे, कोणी आपला पाठलाग तर करत नाही ना यावर लक्ष ठेवणे.

पेपर स्प्रे :
रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी शक्यतो जाणे टाळा आणि तशी परिस्थिती असल्यास तर सोबत पेपर स्प्रे बाळगा. आपल्यावर जर कोणी हल्ला करायला आलं तर पेपर स्प्रे आपल्याला उपयोगी पडू शकतो कारण पेपर स्प्रेच्या फवाऱ्यामुळे हल्लेखोराचे डोळे झोंबतात आणि खोकला येउन श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला सुटका करून घ्यायला वेळ मिळू शकतो.

पर्स नाइफ़ :
बाजारात छोटी सुरी मिळते जी आपण पर्समध्ये सहज बाळगू शकतो. सुरीचा धाक दाखवण्यासाठी उपयोग केला तर आपण आपली सुटका करून घेऊ शकतो.

स्पीड डायलींग :
आजकाल सगळ्यांकडेच स्मार्ट फोन असतात. त्यामुळे तुम्ही कुठेही अडकलात किंवा तुम्हाला मदतीची गरज असेल तर मोबाइलमध्ये स्पीड डायलींगचा पर्याय असतो. तुमच्या जवळच्या व्यक्तींचा नंबर नेहमी अशा लिस्टमध्ये असू द्यावा. तसेच मोबाइलमुळे आपले नंबर पाठ नसतात पण स्पीड डायल सोबत काही व्यक्तींचे नंबर देखील पाठ असायला हवेत. एम इंडीकेटर मधील उपलब्धता : एम इंडिकेटर या अॅपचा उपयोग साधारणतः ट्रेनचे वेळापत्रक बघण्यासाठी केला जातो ; पण त्यातही काही इमर्जन्सी नंबर आहेत हे लक्षात असू द्या. एम इंडिकेटर अॅप वेळोवेळी अपडेट करा.

फिजिकल डिफेन्स :
स्वसंरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक स्त्रीला काही गोष्टी माहित असायला हव्यात जसे की कुणी शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या नाकाला दोन बोटांनी जोरात खेचणे, मानेला तसेच छाती आणि पोट यांच्या मध्ये जो एक छोटा खड्डा असतो त्या जागी बुक्की मारणे. अशा प्रकारच्या काही ट्रिक्सचा अवलंब करता येऊ शकतो. या सगळ्या डिफेन्सच्या टेक्निक्स शिकवण्याच्या कार्यशाळा देखील घेतल्या जातात. जर तुमच्या परिसरात अशा प्रकारच्या कार्यशाळा असतील तर त्याला नक्की उपस्थिती लावा.

वुमेन डिफेन्स स्टिक (बेटन ):
ही एक प्रकारची लाठी असते जी आपण सहज आपल्या सोबत बाळगू शकतो. या लाठीच्या सहाय्याने कुठेही वार केले तर मुका मार लागतो. अशा काही बाबींबद्दल आपल्याला माहिती असणे आणि त्याबद्दल जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares