Taxi (1)

कॅबमधून एकटीनं प्रवास करताना, लक्षात ठेवा!

भाडे रक्कम –

ऑनलाईल कॅब बुक करताना भाडे रक्कम त्या कंपनीच्या ऍपवरच दर्शवली जाते. मात्र, इतरवेळी टॅक्सीचे किती भाडे होईल याचा प्रथम अंदाज घ्यायला हवा. यामुळे, अवाच्यासवा भाडे देऊन होणारा नुकसान टाळता येईल.

नंबर प्लेट-

वाहनाचा नंबर टिपून ठेवावा व किमान दोन जणांना तरी तो नंबर मेसेज करावा. प्रवास लांब पल्ल्याचा असो किंवा कमी, हल्लीच्या दिवसांत आधी गाडीचा नंबर पाहावा, मगच त्यामध्ये बसावे.

चालकाचे ओळखपत्र-

चालकाला त्याचे ओळखपत्र गाडीच्या आतील बाजूने लावणे सक्तीचे असून, ते प्रवाशाच्या सहज नजरेस पडेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. तेव्हा, टॅक्सीच्या आतील बाजूस असे ओळखपत्र असल्याची खात्री करुन घ्यावी. सहज एक नजर फिरवलीत तरी हे लक्षात येईल. अशी सतर्कता बाळगण्याचा कंटाळा करु नये.

सीट निवडताना-

टॅक्सीमध्ये एकट्याने प्रवास करताना शक्यतो मागच्याच सीटवर बसावे. थोडे खिडकीजवळ बसणे उचीत ठरेल. यामुळे तुम्ही ड्रायव्हरच्या सहज नजरेस पडणार नाही व तुम्हालाही अवघडल्यासारखे वाटणार नाही.

मौल्यवान वस्तू –

तुम्ही महागडे दागदागिने घातले असतील तर, ते ओढणी किंवा पदराने जरा झाकून नीट सावरुन बसावे. तसेच, तुमच्याजवळील बॅग शक्य असल्यास सीटवरच स्वत:जवळ ठेवावी.

मोबाईल ऍप्स –

साधारण घरी पोहोचायला लागणारा वेळ तुम्हाला ठाऊक हवा. स्मार्टफोनवर तुम्ही हे सहज शोधू शकता. तसेच, रात्रीच्यावेळी रस्ते नीट लक्षात येत नाहीत यासाठी गुगल मॅपची मदत घ्यावी. आपल्या सोयीसाठी सेफ्टी ऍप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन ठेवावे. त्यांचा वापर देखील नीट समजून घ्यावा.

ड्रायव्हरसोबत गप्पा-

तुम्ही कितीही बोलक्या स्वभावाच्या असलात, तरी अनोळखी व्यक्तिशी मोजकेच बोलणे फायदेशीर ठरते. ड्रायव्हरशी बोलताना गरजेचे तितकेच बोला. वेळ जावा म्हणून मित्र नातेवाईक यांच्याशी फोनवर बोलण्याचा पर्याय उपलब्ध आहेच. तसेच, फोनवर बोलताना पैशांचे व्यवहार किंवा इतर महत्त्वाच्या विषयांवर बोलत असाल, तर ड्रायव्हरला तुमचे बोलणे ऐकू जाणार नाही याची खबरदारी बाळगा.

महिलांनी स्वत:च्या सुरक्षितेसाठी अशी सतर्कता बाळगायलाच हवी. कधी कुठले संकट समोर उभे ठाकेल, सांगता येत नाही. किमान एकटीने कॅबने प्रवास करताना वरील टिप्स नक्की लक्षात ठेवा व त्यानुसार स्वसंरक्षणाची पुर्वतयारी देखील करता येईल. नोकरी करणा-या तरुणी, त्यांच्या कामाच्या वेळा पाहाता रात्री अपरात्री असा एकटीने प्रवास करण्याची वेळ येते, तेव्हा बावरुन न जाता, आत्मविश्वासाने प्रवास करा.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares