hair fall banner

केसांचे आरोग्य जपणारे ५ हिवाळी उपाय!

पावसाळ्यातील दमट कुबट हवा, तर उन्हाळ्यातील जीवघेणा उकाडा आता सुट्टीवर गेला असून, वातावरणात सुखद गारवा भरुन राहिला आहे. ठेवणीतले लोकरीचे कपडे लवकरच ट्रेंडी फॅशनचा भाग बनतील आणि त्यासोबत चेह-याचा लूकही जपावा लागेल. हातापायांची किंवा चेह-याची त्वचा कोरडी पडल्यास कोल्ड क्रिमचा पर्याय आहे, पण शुष्क होणा-या केसांचे काय? सततचे तेल लावून वावरणे शक्य नाही. म्हणूनच, हिवाळ्यात केसांची काळजी घेताना पुढील उपाय नियमित करुन पाहा.

  1. केस धुण्याच्या आदल्या दिवशी किंवा किमान तीन ते चार तास आधी केसांना तेलाने मसाज करावा. डोक्यावरील त्वचेसही नीट तेल लागायला हवे. यामुळे, केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होऊन, केसांमधील आर्दता वाढते.
  2. केसांमध्ये भरपूर कोंडा होत असल्यास, आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुणे गरजेचे आहे. नाहीतर कोंडा केसांच्या मुळांशी साचत जाऊन तेथील त्वचेला बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते.
  3. हलक्या हाताने केस धुवायला हवेत. कारण, कोरडे केस जराश्या झटक्यानेही तुटतात.
  4. केस धुतल्यानंतर पुन्हा कोरडे होऊन नयेत, म्हणून केस धुताना ओल्या नारळाचा रस वापरावा. यातून केसांना नैसर्गिक प्रोटिन्स मिळतात.
  5. केस सुकवताना हेअर ड्रायरचा वापर करु नये. तसेच, मुख्यत्वे हिवाळ्यात केसाला आयर्न किंवा कर्ल करु नये. यामुळे, केसांमधील ओलावा संपूर्णपणे नष्ट होते आणि पुन्हा केस पुर्ववत होण्यास वेळ लागतो.

मैत्रिणींनो, हिवाळ्यात केसांची काळजी घेताना या मुख्य पाच टिप्स नीट लक्षात ठेवा. थंडीनंतर थेट विरुद्ध हवामानाचा उन्हाळा येत असल्याने, आत्ताच केसांचे आरोग्य उत्तमरित्या जपलेत, तर ऋतूबदलानंतर केसांचा पोत बिघडणार नाही.

More Articles
Designed and Developed by SocioSquares