winter hair 1

केसांच्या कोरडेपणावर घरगुती उपाय…

हिवाळ्यात वातावरणात होणा-या बदलांनुसार आरोग्याची काळजी घेण्याची पद्धतही बदलावी लागते. जसं की, थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे वापरतो. अंघोळीसाठी थंड पाण्याऐवजी गरम पाणी घेऊ लागतो. फ्रिजमधील गारेगार पाणी पिणे टाळतो. हिवाळ्यात ही अशीच, खास काळजी केसांचीही घ्यावी लागते. कारण, या दिवसांत हेवेतील कोरडेपणामुळे रुष्क व रखरखीत होतात. केसात कोंडा होऊन खाज येते. केसांना तेलकटी येऊन, केसांना धूळ व केरकचरा चिकटतो. वेळीच काळजी न घेतल्यास केसांचा गुंता होऊन, ते विंचरताना तुटतात. 

केसांची काळजी घेणारा महत्तम घटक म्हणजे, तेल. तेलामुळे डोक्यावरील त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन, केस गुंतण्याचे प्रमाणही कमी होते. तेल हलकेसे गरम करुन, मग केसांना चोळावे. कुठल्याही सेन्टेड आणि आकर्षक, महागड्या तेलांपेक्षा साधे खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल केव्हाही उत्तम! केस धुण्याच्या आदल्या रात्री किंवा अंघोळीच्या अर्ध्या तास आधी केसांना तेल लावावे. म्हणजे, योग्य प्रमाणात तेल त्वचेमध्ये मुरते. 

थंडीला घाबरुन केस धुण्यासाठी अगदी कडकडीत गरम पाणी वापरु नये. अशा गरम पाण्याने केस जास्त राठ होऊन, त्यांची टोकं दुभंगतात, यामुळे केस तुटतात. म्हणून, केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे. नंतर, कंडीशनरचा वापर तर आवर्जून करावा. कंडीशनरमुळे केसांची चमक परत येऊन, ते तजेलदार दिसू लागतात. नारळाचं दूध एक सर्वोत्तम कंडीशनर आहे. एकदा वापरुन पहा, तुम्हालाही आवडेल. 

केस ओले असताना विंचरु नयेत. हा नियम फक्त हिवाळ्यासाठी नसून वर्षभरासाठी आहे. कारण, ओले केस विंचरताना तुटतात. थंडीच्या दिवसांत फक्त डोक्यावरची त्वचा लवकर सुकते. केस मात्र ओलेच रहातात. त्यामुळे, केसांभोवती टॉवेल गुंडाळून त्यातील पाणी शोषून घ्यावे. बोटांनीच गुंतं सोडवावीत. थंडीत केस सुकवण्यासाठी चुकूनही ड्रायरचा वापर करु नये. ड्रायरमुळे, केसांना लगेचच पुन्हा कोरडेपणा येतो. 

या सा-या बाह्यतम काळजीनंतर, केसांना आतंरिक पोषणही मिळायला हवे. त्यासाठी, हिवाळ्यातही भरपूर पाणी प्या. थंडीत फार तहान लागत नाह. त्यामुळे जमल्यास रिमांयडर लावा, पण पाणी प्याच. रोड एक अक्रोड व पाच बदाम असा खुराक नियमित घ्या. तेल, तूप योग्य प्रमाणात आहारात असू द्या, जेणेकरुन केसांना आहारातून आवश्यक अशी पोषकद्रव्ये मिळत रहातील आणि केस जाहिरातींमध्ये दाखवतात, अगदी तसे छान तंदुरुस्त दिसू लागतील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares