कोशिंबीरीचे प्रकार (2)

कोशिंबीरीचे प्रकार..!

सण सोहळ्यांनी परिपूर्ण असणारा ‘श्रावणमास’ सुरु झाला, की मन अगदी आनंदून जात. देवपूजा, पारायणे, उपवास करताना साग्रसंगीत नैवेद्याच्या जय्यत तयारीने स्वयंपाकघरही सजते. भरपूर पदार्थ बनवताना सुगरणींची तारांबळ उडते आणि नवीन काहीतरी करुन पाहाण्यासाठी रेसिपी शोधायची राहूनच जाते. म्हणूनच, यंदाच्या ब्लॉगमध्ये नैवेद्याच्या पानावर महत्त्वाचे स्थान असणा-या कोशिंबीरीचे प्रकार तुमच्यासाठी घेऊन आलोय….

कोबीची कोशिंबीर –
साहित्य – १ वाटी कोबी(चिरुन), १हिरवी मिरची, १ चमचा दाण्याचा कूट, लिंबाचा रस, साखर, मीठ, कोथिंबीर, फोडणीसाठी १ चमचा तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद
पाककृती – एका पसरट बाऊलमध्ये कोबी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. नंतर, त्यावर फोडणी घालावी व पुन्हा एकदा मिश्रण नीट मिसळून घ्यावे. लिंबाच्या रसाऐवजी दही वापरेल, तरी कोशिंबीर चविष्ट होईल.

मुळ्याची कोशिंबीर-
साहित्य- १ पांढरा मुळा(किसून), १/४ वाटी नारळ खवणून, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मीठ व साखर चवीनुसार
पाककृती- खिसलेला मुळा, खोबरे, कोथिंबीर एकत्र करुन घ्यावी. त्यामध्ये चवीनुसार मीठ व साखर घालावी. फोडणी तयार करुन त्यावर घालावी व पुन्हा मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे.

टॉमेटोची कोशिंबीर-
साहित्य – १ वाटी पिकलेल्या टॉमेटोच्या फोडी, १/२ वाटी दही, २ चमचे साखर, मीठ, २ चमचे दाण्याचा कूट, १ ते २ हिरव्या मिरच्या, कांदा (आवडीनुसार), फोडणीसाठी तूप, हिंग, मोहरी, हळद
पाककृती- टॉमेटोच्या फोडींमध्ये दही, साखर, मीठ, मिरची(बारीक चिरुन), दाण्याचा कूट सर्व पदार्थ मिसळून घ्यावे. तूप, हिंग, हळद, मोहरी अशी फोडणी त्या मिश्रणामध्ये मिसळावी.

कारल्याची कोशिंबीर-
साहित्य – कारली, कांदा, ओले खोबरे, कोथिंबीर, हिरवी मिरची व मीठ चवीनुसार
पाककृती – कारल्याच्या उभ्या व बारीक फोडी कराव्यात व त्याला थोडे मीठ चोळून ठेवावे. तासाभराने या फोडी घट्ट पिळून तेलात चांगल्या कुरकुरीत तळून घ्याव्यात. २ वाट्या फोडी असतील, तर एत वाटी कांद्याच्या उभ्या फोडी करुन त्याही तेलात छान परतून घ्याव्यात. आता, त्यामध्ये ओले खोबरे, कोथिंबीर व हिरवी मिरची घालून सर्व मिश्रण नीट मिसळूव घ्यावे.

मैत्रिणींनो, कोशिंबीरीचे हे विविध प्रकार तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा व तुमच्याकडे कोशिंबीरीच्या आणखी रेसिपीज् असतील, तर त्याही लिहा खालील झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींसाठी…

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares