TB Banner

‘क्षयरोग’ वेळीच ओळखा!

क्षयरोग (टीबी) म्हणजे काय? सर्वसाधारणपणे जर सांगायचं झाल तर १५ दिवस किंवा ३ आठवडयाहून जास्त खोकला हा टीबी असू शकतो इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वाना आहे. पण त्याही पलीकडे जाऊन टीबी काय आहे याची फारशी माहिती आपल्यापैकी ब-याच जणांना नाहीये. अर्थात क्षयरोग म्हटलं की आपल्याला धडकीच भरते. कारण एकेकाळी या आजारावर कोणतीही औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे हा आजार अतिशय दुर्धर तसेच असाध्य आजारांपैकी एक गणला जायचा आणि भरपूर माणसे दगावली जायची. पण आत्ताच्या घडीला, टीबी झाला म्हणजे आयुष्य काही संपत नाही. कारण आता यावर अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.

सततचा खोकला आणि वारंवार येणारा ताप, हा ताप येण्याचे प्रमाण संध्याकाळी जास्त प्रमाणात असते. तसेच अचानक कमी होणारे वजन, भूक मंदावणं, रात्री घाम येणं, अशक्तपणा, खोकताना छातीत किंवा पोटात दुखणं, जोडीला मळमळणं किंवा उलटया होणं, खोकल्यातून कफ पड़णं अशी अनेक लक्षणं असू शकतात. रक्त चाचणी, क्ष-किरण चाचणी तसेच थुंकीच्या तपासणीतून टीबी आहे की नाही याचे निदान डॉक्टरांना होऊ शकते. सहसा जास्त प्रमाणात आढळणारा क्षयरोग हा फुफ्फुसांचा असतो. पण त्या व्यतिरिक्त डोक्याचा, पोटाचा क्षयरोग, हाडे, सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग असे क्षयरोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. क्षयरोग हा ह्वेमार्फ़त पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. तो मायकोबक्टेरिया या विशिष्ट प्रकारच्या जीवाणूमुळे होतो.

एकदा फुफ्फुसाच्या टीबीचे निदान झाले की त्यानंतर साधारण ६ ते ९ महिने टीबी बरा होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. सरकारी रुग्णालयात डॉटस मार्फत टीबीवर मोफत उपचार होतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत. पण ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारानंतर साधारण एक महिन्यातच रुग्णास गुण येऊ लागतो. खोकला पूर्णपणे बंद होतो, ताप येणे थांबते, वजन वाढू लागते पण मध्येच औषधे बंद करू नयेत कारण एकदा औषधे बंद घेणे थांबविली की मग पुन्हा नव्याने क्षयरोगाचे जिवाणू तिथे तयार होतात आणि मग औषधोपचारांना दाद न देणारा घातक स्वरूपाचा रेसिस्टेंट क्षयरोग होतो. ही औषधे प्रतिजैविके म्हणजे तात्काळ गुणकारी ठरणारी असल्याने साहजिकच त्याचे काही दुष्परिणाम दिसून येतात जसे की लघवीस लाल रंग, मळमळ, उलटी, बधीरता, सांधेदुखी, दृष्टीदोष, हातपायांना जळजळ इ. पण सहसा रुग्ण औषधाला सरावतो आणि फारसे दुष्परिणाम न होता उपचार घेऊ शकतो. काही दुष्परिणाम जाणवले तरी वैदयकीय सल्ल्याशिवाय स्वत:च उपचार बंद करू नयेत. नीट आणि योग्य उपचार घेतले तर ६ ते ९ महिन्याच्या कालावधीतच रुग्ण पूर्णपणे बरा होतो. या प्रक्रियेअंतर्गत जात असताना रुग्णाने अजिबात घाबरून जाऊ नये. खोकताना रुमाल धरणे, कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक घालून त्यातच थुंकावे, इतरत्र कोठेही थूंकू नये, तसेच लहान मुलांच्या संपर्कात येणे रुग्णाने टाळावे. या काळात रुग्णाला वैफल्य येणे हे स्वाभाविक असते पण जर कुटुंबीयांच भक्कम पाठबळ असेल तर मानसिक स्तरावर या आजारातून बाहेर पड़ण रुग्णाला जास्त सोप्पे जाते.

जगात सर्वात जास्त क्षयरोगाचे रुग्ण हे भारतात आढ़ळतात आणि मुंबई शहर हे प्रामुख्याने ह्या रोगाचा हॉटस्पॉट बनलं आहे. वर्ल्ड हेल्थ आर्गेनाईजेशनने २०१७ साली प्रकाशित केलेल्या अह्वालानुसार जगभरात क्षयरोग हे मृत्यूचे नऊ क्रमांकाचे सर्वात मोठे कारण आहे. एकाच जीवाणू आणि विषाणूने होणा-या संसर्गामुळे होणा-या मृत्युंमध्ये टीबीने होणा-या मृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares