bappa (2)

गणराज विराजलेले देशोदेशी!!

बाप्पाचे आगमन होणार म्हणून लहान थोर सारेच मोठ्या उत्साहाने लाडक्या पाहूण्याच्या स्वागताची तयारी करण्यात दंग झालेत. सजावटीचे मखर, रोषणाई, हारतुरे व विविध स्वाद-रंगांतील मोदकांनी बाजार भरगच्च सजलेत. गि-हाईकांच्या मागण्यांना हे दूकानदार पुरुन उरतायेत. लवकरच महाराष्ट्रातील गल्लोगल्ली बाप्पाच्या मिरवणूकींचा जल्लोष घुमू लागेल. भक्तीमय गुलाल दाही दिशा उधळला जाईल. गणनायकाच्या प्रस्थानाने प्रसन्न झालेल्या वातावरणात भरुन राहील धूप कापूराचा गंध! आ..हा…!!
विनायकाच्या भक्ती रंगात महाराष्ट्रासोबत, देशोदेशीचे भक्तगण रंगून जातात, हे असेच….

न्युयॉर्क
न्युयॉर्कमधील बॉन स्टेट येथे महावल्लभ गणपती मंदिर आहे. १९७७ साली हे मंदिर भक्तांसाठी खुले झाले, असून साधारण संपूर्ण अमेरिका खंडातील हे पहिले भारतीय मंदिर असावे. या देवस्थानात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.

बर्लिन
बर्लिनमध्येही गणेश मंदिराची स्थापना केली असून, ‘श्री गणेश हिंदू टेंपल’ ही संस्था येथे कार्यरत आहे. या मंदिराचा परिसर, प्रवेशद्वार, पार्कींगची जागा अशा बाबींचा सारासार विचार करुन या देवस्थानाची उभारणी केली आहे. बर्लिन स्थायिक भारतीयही मोठ्या श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करतात.

श्रीलंका
भारताच्या दक्षिणेकडे वसलेल्या श्रीलंकेशी जडलेला भारताचा दैवकालीन इतिहास सर्वांनाच परिचित आहे. या देशात मोठ्या प्रमाणात भारतीय स्थायिक आहेत. श्रीलंकेच्या राजधानीतच कॅप्टेन गार्डन परिसरात हिंदू टेंपल असून, इथे भगवान शंकर व गणपतीच्या मूर्तीची स्थापना केलेली दिसते. येथील गणेश भक्त मनोभावे गणेशोत्सवाचा सण साजरा करतात व पार पडणारे पूजेचे विधीही भारतीयांप्रमाणेच केले जातात.

नेपाळ
भारताच्या कुशीत वसलेल्या नेपाळ देशाची अधिकतर सीमा भारताला लागून आहे. हिंदू संस्कृतीचे जतन करणा-या देशात गणेशाची एकूण चार मुख्य मंदिरे आहेत. नेपाळची दहा महिंन्यांची राष्ट्रीय दिनदर्शिका असून ‘माघ’ महिना गणपतीचा म्हणून ओळखला जातो. येथील महिलाही उपवास, व्रतवैकल्ये तितक्याच हौशेने करतात. बाप्पाचा इतका मोठा भक्तगण असणा-या या देशामध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारच!!
थायलंड
जगभरातील पर्यटक थायलंडला भेट देतात, ज्यामध्ये भारतीयांची संख्यांही मोठी असते. सर्वश्रुत असणा-या बाप्पाच्या भक्तांना आकर्षिक करण्यासाठी साधारण ५ मजली भव्य गणेश मूर्ती उभारली आहे. तेथील रहिवासी गणेशभक्तही मोठ्या भक्तीभावे धार्मिक कार्यक्रम पार पाडतात. गणेश मूर्तीचे पूजन करुन गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा थायलंडमध्ये रुढ होऊ लागली आहे.

विविध देशांमध्ये विसावलेल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची ओढ नवचैतन्य घेऊन येते. संपूर्ण वर्ष या शुभंकरास वेळोवेळी आळवले, तरी गणेश उत्सव काही निराळाच उल्हास देतो. पुन्हा एकदा भक्तगण बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होतोय, “गणपती बाप्पा… मोरया!!!” हा जयघोष सतत अंतरी घुमूतोय!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares