ganesha banner (1)

गणेशोत्सवाचा उत्साह ‘ती’!

सण आले की लहानांपासून थोरांपर्यंत सा-यांच्यात भरुन वाहतो तो उत्साह. नोकरवर्ग सुट्ट्यांसाठी अर्ज करतो तर, शाळेला सुट्टी असल्याने लहानगेही खुष असतात, मात्र कधीही सुट्टीवर न जाणारी ‘ती’ नेहमीच्याच उमेदीने प्रत्येक सोहळा पूर्णत्वास नेण्यासाठी अखंड कार्यरत असते व प्रत्येक लहान सहान गोष्टीतही तिचा सहभाग अत्यावश्यक भासतो. मग, गणेशोत्सव तरी त्याला अपवाद कसा ठरेल! कारण, ‘गणेशोत्सव’ म्हटलं की तिच्या आनंदाला पारावार राहात नाही व किचनपासून मिरवणूकीच्या सरावापर्यंत सा-याच तयारीत ती दंग होऊन जाते. साधारण सामानाच्या यादीपासून तयारीला झालेली सुरुवात बाप्पाला सजवण्यापासून ते घराला सजवण्यापर्यंतच्या अशा प्रत्येक कामात तिचा सहभाग असतो.

शिवणकलेच्या माध्यमातून सजावटीसाठीचे पडदे तयार करणे, विणकामातून दारासाठी तोरण, मखरासाठी लोकरीचे गोंडे या तयारीला महिनाभर आधीपासूनच सुरुवात होते यात नवल नाही, घराच्या साफसफाईपासून ‘चौरंगाला पॉलिश करायचे आहे’ अशी आठवण करुन देणारीही तीच आणि येणा-या पाहूण्यांच्या संख्येचा अंदाज घेत पदर खोचून कीचनचा कारभार सांभाळणारीही तीच. प्रत्येकाच्या आवडी निवडी बाबतचा तिचा अभ्यास तसा चोख असतो, पण सोबत पारंपारीकता जपण्याचा तिचा अट्टहासही स्वागतार्ह वाटतो. रीती पद्धती याबाबत चोंखदळ राहून वेळेला ‘आमच्याकडे पूर्वीपासून अशी पद्धत आहे’ असे इतरांना सांगताना तिच्या मनातला संस्कृतीविषयीचा आपलेपणा दिसतो. सामान्यत: घरी आलेल्या पाहूण्यांचा पाहूणचार ती जर इतक्या आपुलकीने करते, मग इथे तर खुद्द ‘बाप्पा’. गणराजाचा मुक्काम असलेला प्रत्येक दिवस तिला बनवायचा असतो खास आणि त्यासाठी तिचं वेळापत्रकही असतं तयार. रोज कुठले पदार्थ बनवायचे यापासून घरातील इतर व्यवस्था कशी असेल याबाबतची तिची व्यवस्था चोख असते. घरातील इतर सदस्यांना देखील कामे वाटून देण्याचा प्रयत्न ती करुन पाहाते, पण बरीचशी कामे तिच्याच वाट्याला येतात कारण तिने केलं की ते उत्तमच असणार हा तिच्यावरील असलेला विश्वास सोबत तिचा प्रत्येक कामात आनंद घेण्याचा स्वभाव सारेच जाणून असतात.

गणरायाच्या कौतुकात व्यग्र असणारी ती सोहळा यथायोग्य संपन्न करते आणि पुन्हा घर लावण्यापासून खर्चाचा हिशोब बांधण्यापर्यंतचे कामही तिच्याकडे येते. इथ पासून इतिपर्यंत गणेशोत्सवाच्या प्रत्येक कामाला आपला खास टच देत कुटुंब व भक्ती असी सांगड घालत घरात उत्साह निर्माण करणारी ‘ती’च असते घराचा उत्साह.

More Articles
Designed and Developed by SocioSquares