Makeover (1)

गरजेचा आहे देखणा मेकओव्हर!

बरीच वर्ष जपलेली फिगर प्रेगनन्सीनंतर पार बिघडते. तिथूनच ढगळ कपडे घालण्याची सवय जडते. हळूहळू संसाराचा व्याप वाढत जातो, मुलांचं मोठं होणं, त्यांची शाळा, घरची जबाबदारी पार पाडण्याच्या नादात स्वत:ची काही निराळी स्टाईल असावी किंवा होणा-या बदलांनुसार आपणही थोडे बदलावे. असे विचार करायला सवडच नसते.

कपाट उघडताच हाताला येईल ते घालावं. जे सगळ्यांसाठी शिजतंय तेच स्वत:ही खावं. पार्लरमध्ये जाऊन नेहमीचा हेअरकट मारुन निघावं. अनोळखी लोकांत मागे मागे रहावं, उगाच हसं होण्यापेक्षा गप्प बसावं. कित्येक मैत्रिणी आजही हा असा विचार करतात..? पावलोपावली मनाला मुरड घालतात? इथेच गरज आहे मेकओव्हरची. दिसण्यापासून असण्यापर्यंतचा म्हणजेच, स्वत:चं अस्तित्त्व जाणवू देणारा मेकओव्हर करायचायं.

मेकअप:

मेकओव्हर म्हटलं, म्हणून चेह-यावर मेकअपचा थर जमवा असे मुळीच सुचवणार नाही. फक्त, हलकासा टचअप हवा. फेसवॉश किंवा स्क्रबरने चेहरा स्वच्छ करावा. एखादी लिपस्टिक, नाजूकशी काजळाची रेघ, चेह-यावरचे काळसर डाग झाकण्यासाठी थोडं फाऊंडेशन वापरलंत तरी पुरे. या दोन चार गोष्टी एका पाऊचमध्ये ठेवून, ते पर्समध्ये नियमित कॅरी करावं. ज्यामुळे, छान दिसण्याची आवड व सवयही लागेल.

हेअर स्टाईल:

“थोडी लेंथ कमी करा फक्त!” असं सांगण्यापलिकडे सध्याच्या ट्रेंडी हेअरस्टाईल्सपैकी एखादा चेह-याला शोभून दिसेलसा हेअर कट कधीतरी निवडून पाहा. नुसत्या निराळ्या हेअर कटमुळे लूक लगेच बदलतो. पार्लरवालीस गि-हाईक गमवायचे नाहीय. त्यामुळे, ती तुम्हाला नक्कीच योग्य तो हेअर कट सुचवेलच. आणि दोन चार महिन्यातून एकदा फेशिअल, मेनिक्युअर, पेडीक्युअर अशीही स्वत:ची हौस पुरवावी.

फॅशन:

इंटरनेट सर्फिंग करताना, नाहितर अगदी टिव्ही मालिका, सिनेमांमधून नव्या फॅशनचे दर्शन आपल्याला घडते. कुणी काय घातलंय, ते तिला कसं दिसतंय, हे ज्ञान बाईची चाणाक्ष नजर लगेच टिपते. आता अशी माहिती फक्त जमवून ठेवायची नाही, तर त्यानुसार स्वत:च्या स्टाईलमध्ये बदल करायचेत. आपल्याला काय शोभून दिसेल याचा अंदाज घेऊन शॉपिंग करावी.

त्यावर मॅचिंग कानातले, छानसं गळ्यातलं, क्वचित नेलपॉलिश, हिल्सची सवय नसेल, तर फ्लॅट प्रकारातले रंगती संगीत नक्षीदार, बारीक वादींचे सॅण्डल्स, नव्या त-हेच्या पर्सेस, अशी सर्व प्रकारांत नेहमीची पठडीबाज निवड करण्यापेक्षा, चॉईसमध्ये थोडा बदल करावा. नेहमीपेक्षा जरा वेगळं निवडावं. हे असं नियमित केलंत, तर तुमच्याच नकळत तुमचा मेकओव्हर झाला असेल हे नक्की!

आरोग्य:

अशाप्रकारे, दिसण्याराहण्यावर काम झाल्यानंतर आता जरा स्वत:च्या आत डोकावून पाहायला हवं. आपल्याला फक्त बाहेरनं चकचकीत बनविणारा मेकओव्हर अपेक्षित नाही. तर, शरीराची सृदढताही अग्र स्थानावर आहे. जीम, योगा, झुंबा किंवा अगदीच वेळ मिळत नसेल, तर घरीच सूर्यनमस्कार घालावेत, अर्धा तास तरी चालायला जावे. इतक तर करुच शकतो. नोकरी करणा-या महिलांनी किमान सुट्टीच्या दिवशी फिटनेससाठी अर्धा द्यावा. महिनोमहिने काहिहि न करण्यापेक्षा, कधीतरी का होईना पण आरोग्याचा विचार करणे चांगले आहे.

मेकओव्हरचा श्रीगणेशा करु, रोजच्या छोट्या छोट्या सवयींतून आणि विचारांतून! ज्याप्रमाणे, “आज भाजी कुठली करायची?”, “ऑफिसला वेळेवर पोहोचायचंय?”, अशा विचारांनी आपल्या दिवसाची सुरुवात होते, त्याऐवजी उठल्यावर प्रथम साखर व मधाच्या मिश्रणाने चेह-यावर ५ मिनिटे मसाज करुन स्वत:ला गुड मॉर्निंग म्हटलं तर…? नेहमीच्या कंटाळवाण्या दिनक्रमात असेच हलके हलके बदल करायला सुरुवात करुया. आहात ना तयार?

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares