Pregancy YOGA (1)

‘गर्भसंस्कार’ व्हावेत तर असे!

घरी नवा पाहुणा येण्याची चाहूल लागताच ताई, माई, आक्का जमतील तितक्या बायका त्या गरोदर स्त्रीला हजारो सल्ले देऊ लागतात. स्वानुभवावरुन तयार झालेल्या या सल्ल्यानुक्रम सोहळ्यात ‘गर्भसंस्कार’ हा विशेष भाग असतो. मग, बाळाच्या निकोप वाढीसाठी डॉक्टरांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला, गर्भसंस्कारांची भावनिक नाळ घराघरांतून जोडली जाते. यासाठी, मग पुस्तके, गर्भ संस्काराच्या सी.डीज्, कार्यशाळांसारखे अनेक मार्ग सुचविले जातात. “यातून नेमकं काय निवडावं?” हे ठरवताना घडणा-या सावळ्या गोंधळात गर्भातील बाळच अधिक धास्तावत असेल.

झपाट्याने बदलणारी जीवनशैली, सततचा कामाचा ताण, बिघडते मानसिक स्वास्थ्य, बैठी कामे, आहारातून गायब झालेला ताजेपणा, वाढते प्रदुषण व अखंड तंत्रज्ञानाच्या विळख्यात जखडले गेलेलो आपण! या बेभान वागण्याचा परिणाम म्हणजे नवनव्या आजारांना दिले जाणारे आमंत्रण! ही जीवनपद्धती धडपुस्ट माणसाचेही आरोग्य बिघडवते, तर गर्भातील तान्हे बाळ यासमोर कसा टिकाव धरणार?

जन्माला येणारे बाळ शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असावे, यासाठी ‘परिपक्व गर्भसंस्कार’ तर गरजेचेच आहेत. बाळ गर्भात असताना मुख्यत्वे गरोदर स्त्रीने तिच्या भोवतालची वातावरणाची व विचारांची सुरक्षितता जपायला हवी. आई वडीलांच्या रुपाचा अंश बाळामध्येही दिसतो, तसे स्वभावाचेही आपसूक होते. प्रेमळ, मनमिळावू, चिडका, रागीट, हेकेखोर अशा स्वभारंगातील सदगुण तितकेच बाळाने ग्रहण करावेत, यासाठी प्रथम गरोदर स्त्रीच्याही स्वभावगुणात ते अधिक प्रमाणात असायला हवेत.

गर्भसंस्कारांनी कितीही आधुनिकतेचे रुप घेतले, तरी गर्भाला सदविचारांची कास धरण्यास सांगण्याचा मूळ उद्देश आजही कायम आहे. सोबत योग्य आहाराची जोड तर द्यायलाच हवी. नवी पिढी बुद्धीने ‘सुपर स्मार्ट’ होतेय, पण शारीरिकदृष्ट्या कमकवुत ठरतेय. यामागचे कारण, तरुणाईच्या बदललेल्या आहारात व वाढत्या प्रदषित वातावरणात दडलेय असे म्हणायला हरकत नाही.

नऊ महिने गर्भावर प्रत्यक्ष संस्कार होत असले, तरी गर्भधारणेच्या आधीपासूनच स्त्री किंवा पुरुषाचे सर्वांगीण स्वास्थ्य निरोगी असणेही आवश्यक आहे. मूळ स्वभाव वैशिष्ट्ये दिर्घकाळात व्यक्तिमत्त्वाचा महत्तम भाग ठरलेली असतात, त्याचे सहजासहजी परिवर्तन होणे कठीण! यासाठी, योग्य आहार, विचार व प्रदुषणमुक्त जीवनपद्धतीला आपलसं करण्यावर भर दिला, तर परिपक्व संस्कारांनी परिपूर्णसे सुदृढ बाळ जन्मास येईल, यात शंकाच नाही!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares