Career (1)

गृहिणींसाठी फराळी व्यवसाय!

तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल आणि स्वत:चा गृहद्योग सुरु करण्याच्या विचारात असाल, तर सख्यांनो थोडं इथे लक्ष द्या. तुम्ही बनवलेला फराळ मोठ्या चवीनं फस्त करणा-या खवय्यांनी केलेल्या कौतुकाच्या बळावरच, आत्मविश्वासाने स्वत:च्या स्वादिष्ट लघुद्योगाची निर्मिती करायची आहे. तेव्हा, थोडा गृहपाठ हवाच! करंजी, लाडू, चकल्या, चिवडा, शेव, अनारसे, शंकरपाळी अशा सर्व पदार्थांचे बाजारात सुरु असणारे भाव जाणून घ्या. विविध घरगुती विक्रेते किंवा दुकानदारांजवळील फराळाच्या किंमती, ऑफर्स यांच्या नोंदी करा. ह्या अभ्यासासाठी समोर असलेली दिवाळीसारखी उत्तम संधी हातची सोडायची नाही.

घरासाठी फराळ बनवालच, तेव्हा सर्व पदार्थ थोडे जास्तच बनवा. कारण, पाककलेतील नव्या व्यवसायात ग्राहकांपर्यंत चवीसहित पोहोचाव लागतं. त्यासाठी ओळखीतील व्यक्तिंना तुम्ही बनवलेला फराळ चाखायला द्या. सोबत त्यांना तुमच्या नव्या व्यवसायाचीही माहिती द्या. असे केल्याने, त्यांच्यामार्फत आणखी चार जणांपर्यंत फराळाचे कौतुक, व्यवसायाच्या माहितीसहित पोहोचेल.

तसेच, व्यवसायाची माहिती पोस्ट करत सोशल मिडीआचा अचूक वापर इथे करुन घेता येईल. जाहिरात करताना साधी सोप्पी, पण आकर्षक पत्रके छापून मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामध्ये वाटावीत. त्यावर लघुद्योगाचे नाव, पदार्थाचे नाव, नगानुरुप त्यांचे भाव, संपर्क क्रमांक अशी सविस्तर माहिती दिली, की ग्राहकांना इतर विक्रेत्यांजवळील किंमतीशी व्यवस्थित तुलना करता येईल. तसेही, हे फराळी पदार्थ दिवाळी स्पेशल असले, तरी कमी अधिक प्रमाणात त्यांना वर्षभर मागणी असतेच. भाजणीची चकली, चिवडा, शंकरपाळी विकत घेणा-यांचा ओघ सुरुच असतो. त्यात घरगुती पदार्थांना ग्राहक प्रथम पसंती देतो. घरची अनोखी चव, पदार्थांचा ताजेपणा, स्वच्छता या गुणांबाबतच ग्राहक चोखंदळ असतात. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहीलं, की विक्रेत्यापर्यंत ग्राहक आपसूक पोहोचलाच म्हणून समजा.

फराळी पदार्थ बनवून विकण्याचा घरगुती व्यवसाय दिवाळीचे निमित्त साधून सुरु केला, तरी तो वर्षभर सुरु राहीलच. फक्त दिवाळीच्या दिवसांत फराळाला असणा-या मागणीचा विचार करता, ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोप्पे जाईल. व्यवसायाचे शिवधनुष्य पलायचे, तर अशा संधीचा फायदा करुन घ्यायलाच हवा. व्यस्त मंडळींमुळे रेडीमेड पदार्थांची मागणी दिवसागणिक वाढतेच आहे. हॉटेल व्यवसायांची त्यामुळे चलती आहे. पण, त्यातही बहुतांश ग्राहक पुन्हा घरगुती पदार्थांकडे वळतायत. हे लक्षात घ्यायला हवे.

ब-याचदा व्यवसाय या शब्दाचीच भिती वाटते. कारण व्यवसायाचा विचार मनात आली, की प्रथम भांडवलासाठी पैसे मोजावे लागतात. सोबत, नुकसान होण्याची शंका देखील मनात घर करुन बसलेली असते. अशावेळी, मनगटात ताकद असूनही, ती आजमावण्याची जोखीम मात्र आपण घेत नाही. पण, एकदा उडी मारुन पाहायला काय हरकत आहे? तुमच्याजवळील पाककलेला घराच्या चार भिंतीबाहेरील जगही पाहू द्या. सखी तू करु शकतेस, गरज आहे फक्त स्वत:वर विश्वास दाखवण्याची. कदाचित सुरुवातीला घरातल्यांनी साथ दिली नाही, तरी मागे हटायचं नाही. तुम्ही एकदा धीर केलात, की तुमच्या हिंमतीला दाद देत तेही आपसूक तुम्हाला येऊन मिळतील. माझी मुलगी, माझी पत्नी, माझी सून स्वत:चा व्यवसाय करु शकतेहा विश्वास त्यांनाही वाटेल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares