tattoo banner

गोंदण नवलाईचं!

सभोवताली आठवणींचा पसारा करुन त्यात रममाण होणं, हा मानव जातीचा स्थायी भाव! म्हणूनच घडून गेलेल्या कित्येक गोष्टी त्याला वर्तमानकाळातही लख्ख आठवतात. एकाकडून दुस-याला, दुस-याकडून तिस-याला अशा मौखिक पद्धतीने या आठवणींचा प्रसार होऊ लागला. ज्यात रुढी, परंपरा महत्तम स्थानी होत्या. यापैकीच एक प्रचलित प्रथा बनली गोंदवून घेण्याची.

आज याच गोंदवून घेण्याचे, टॅटू नावेचे नवे रुपडे जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. जीवनातील प्रसंगाशी, आठवणींशी निगडीत विविध आकार उकार किंवा अक्षरं शरीराच्या विविध भागांवर गोंदवून घेणारे आपल्या आसपास सर्रास दिसतात. पूर्वी परंपरेचा भाग बनलेलं गोंदण आणि आता फॅशन म्हणून आरुढ झालेलं टॅटूचं फॅड, या दोन्ही बाबी दिसायला समान आहेत, तरी प्रचंड भिन्नही आहेत. कारण, आता टॅटू काढण्यासाठी वापरलं जाणारं मशीन, त्याला लावलेली सुई, विविध केमिकल्सयुक्त रंगांमुळे त्वचा विघातक परिणामांना सामोरी जाते.

लहान सहान गाळ्यांमध्ये चालवले जाणारे, स्वस्त व मस्तसे टॅटू स्टुडीओज अधिक धोकादायक असतात. छोटेखानी टॅटू आर्टिस्ट्सना प्रत्येक नव्या टॅटूसाठी नवी सुई वापरणे परवडणारे नसते. एकाहून अधिक ग्राहकांसाठी एकच सुई वापरल्याने हिपोटायटीस, एचआयव्ही सारख्या रोगांना आमंत्रण दिले जाते. टॅटू काढताना त्या त्वचेखाली एखादी महत्त्वाची शीर अथवा रक्तवाहिनी असल्यास, तिला ईजा पोहोचून पांगळेपणा येऊ शकतो. तसेच, थेट रक्तवाहिनीतून संसर्ग झाल्याने गॅंगरीन होण्याची शक्यताही तन्ज्ञ वर्तवतात.

मोठ्या उत्साहाने टॅटू काढून घेणारे भरपूर दिसतात, तसेच काढलेल्या टॅटूला काहीच महिन्यांत, वा वर्षात कंटाळणारेही तितकेच आहेत. ज्यात प्रेयसी किंवा प्रियकराच्या नावाचा टॅटू ब्रेकअपनंतर पुसून टाकणारे आहेत, तर कधी काढलेल्या डिझाईनचा कंटाळा येणारे. अशावेळी, लेझर पद्धतीने टॅटू काढून टाकण्याची धडपड सुरु होते. याचा खर्चही अधिक आहे व त्वचेला त्रासही होतो. पण इतके करुनही कुठलाही टॅटू पुर्णपणे नष्ट होत नाही. तो पुसटसा दिसत राहतोच. गोंदवून घेतलेला टॅटू कमी दर्जाचा असेल, तर एकवेळ निघेलही पण, दर्जेदार टॅटू स्टुडीओमधून गोंदवून घेतला असेल, तर तो निघता निघणार नाही. कारण, त्याचे वापरलेले केमिकल्सही तितकेच पक्के असतात.

अशाप्रकारे, ‘इथे आड तिथे विहीर’ असा प्रकार टॅटू जगतात पहायला मिळेल. त्यामुळे, टॅटू काढण्याच्या विचारात असाल, तर टॅटू गोंदवून घेण्याची शरीरावरील जागा योग्य असू द्या, विचारपूर्वक डिझाईन निवडा आणि काही काळानंतर काढलेला टॅटू नकोसा होईल, अशी शंका तुमची तुम्हालाच सतावत असेल, तर वेळीच गोंदवून न घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करा. यापेक्षा, तात्पुरता टॅटू किंवा मग पारंपरिक मेहंदी बरी! काय वाटतं तुम्हाला? आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जरुर लिहा तुमची प्रतिक्रिया खालील comments मध्ये!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares