Inspiration > गोल्डन गर्ल हिमा दासविषयी हे ठाऊक हवेच!
hima

गोल्डन गर्ल हिमा दासविषयी हे ठाऊक हवेच!

वा-याच्या वेगाने सुरु असलेली १९ वर्षीय हिमा दासची सुवर्ण दौड पहाता, तिने प्रत्येक भारतीयास तिची दखल घेण्यास भाग पाडलंय. अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर विविध स्पर्धांमध्ये तब्बल ५ सुपर्ण पदकांची कमाई करणा-या हिमाच्या आंतरराष्ट्रीय धावपटू पर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घेण्याची तिच्या प्रत्येक चाहत्यास असणार आणि खरेच तिचा इथवरची दौड खडतरच होती.

आसाममधील एका लहानश्या खेडेगावातील तिचा जन्म. वडील शेती करतात, तर आई घरकाम करुन मिळणा-या उत्पन्नातून कुटुंबाची खर्च भागवतात. तीन बहिणी व एक भाऊ असा हिमाचा एकूण परिवार!

हिमाची पहिली ओढ फुटबॉल या खेळाकडे. तिने धावपटू होण्याचं स्वप्न कधीही पाहिलं नव्हतं. खरंतर तिच्या गावी खेळाडूंना सोयीस्कर असं मैदानदेखील नाही. मोकळ्या रानातच तिथली मूलं फूटबॉल खेळतात. पावसाळ्यात त्यांच्या याच मैदानात पाणी भरतं. तितके दिवस पुन्हा खेळ बंद. फूटबॉल खेळणा-या मुलींची संख्या कमी असल्याने मुलांच्या गराड्यातच हिमा फूटबॉल खेळायची. या खेळामुळेच हिमाचा स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. हिमाचे कौशल्य पाहता तिचे वडील तिला इतर मैदानी खेळांमध्येही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. शाळेतील शिक्षकांनीही हिमाची हिच चुणूक हेरुन गुवाहाटी येथील निपोन दास यांच्या ऍथलॅटिक्स प्रशिक्षकांच्या शिबीरात सहभागी होण्याचा सल्ला दिला. इथूनच हिमाचा धावपटू बनवण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

धावपटू हिमा दासचं कर्तृत्त्व लख्खपणे निदर्शनासं आलं, २०१८ साली फिनलॅंड येथे पार पडलेल्या ज्युनिअर एथलॅटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी हिमा पहिली वहिली खेळाडू ठरली. याचवर्षी जकार्ता येथील आशियाई क्रिडा स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले, सोबत ५०.७९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. अर्जुन पुरस्काराने सन्मानित हिमा दासने २०१९च्या या जुलै महिन्यात थेट ५ सुवर्णपदकांची कमाई करत जगभरातील क्रिडाप्रेमीच्या भुवया उंचावल्या आहेत.

पूर्वीची धावपटू हिमा दास, आता ढिंग एक्सप्रेस, उडनपरी, गोल्डन गर्ल अशा विविध नावांनी भारतीयांकडून गौरवली जाते आहे. देशातील असंख्यांची प्रेरणा ठरलेली हिमा दासची सुवर्णदौड अशीच निरंतर सुरु राहो. आज भारतीयांच्या मनात एक अस्सल धावपटू गवसल्याचा अभिमान दाटून आहे, यात तिळमात्र शंका नाही.

 

Designed and Developed by SocioSquares