money money (1)

घरगुती व्यवसायासाठी भांडवल उभारताना!

वर्षभरात एकही सुट्टी न घेता कार्यरत असणारा ‘गृहिणी वर्ग’ घराचे व्यवस्थापन अगदी चोख ठेवतात. घराची जबाबदारी पार पाडताना फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून घरगुती व्यवसाय करण्याची अनेक महिलांची इच्छा असते. छंदालाच छोटेखानी उद्योगाचे रुप देऊन तुमच्या व्यवसायाची मोट बांधता येईल. यामुळे, घरातील खर्चाला हातभार लागेल तसेच स्वखर्चासाठी काही रक्कम जवळ राहील.

• घरगुती व्यवसायाची सुरुवात करताना इच्छेप्रमाणे व तुमच्या बजेटनुसार पैशाची गुंतवणूक करावी.

• पाचशे रुपयाच्या नाममात्र रकमेपासूनही घरगुती व्यवसायाचा आरंभ करता येईल.

• सुरुवातीलाच माहिती देणारी पत्रके छापणे परवडणारे नसते, तेव्हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.

• तुमच्या जनसंपर्काचा इथे फायदा होईल, नव्या व्यवसायाबद्दल तोंडी माहिती देणेही फायद्याचे ठरेल.

• कलाकुसरीच्या वस्तू, शिवणकाम, विणकामातून तयार केलेल्या वस्तूंचा स्टॉल लावता येईल, विविध प्रदर्शनांमध्ये महिलांसाठी काही स्टॉल राखीव असतात.

• भिशीसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी असणा-या महिलांना भेटून व्यवसायाची माहिती त्यांना देता येईल, ज्यामुळे एकाचवेळी मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

• कच्चा माल खरेदी करण्यासाठी लागणा-या खर्चात मार्केटींगचा खर्च वाढू नये, म्हणून अशाप्रकारे घरगुती व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर भर द्यावा.

• कच्चा माल आणण्याचा वाहतूकीचा खर्च, मूळ वस्तूंच्या किमती, ग्राहकांचे बार्गेनिंग व विक्रेत्याला होणारा फायदा याचा ताळमेळ बांधून वस्तूची विक्री किंमत ठरवावी.

ठराविक कालावधीत रकमेचा परतावा मिळाला नाही, म्हणजे व्यवसाय अयशस्वी झाला असा निष्कर्ष न काढता; नफ्या तोट्याचा अचूक अभ्यास करायला हवा. कारण, कुठलाही व्यवसाय म्हटलं, की ‘पैसा’ या भांडवलासोबत गरजेचा असतो धीर व स्वत:वरील आत्मविश्वास!

More Articles
Designed and Developed by SocioSquares