food delivery boy banner

सुविधा घरपोच अन्न पोहोचवणारी!

जेवण बनवण्याचा कंटाळा आला किंवा आयतं खाण्याचा मूड झाला की रेस्टॉरंटपर्यंत न जाता घरबसल्या फूड डिलिव्हरी मागवण्याची परंपरा जुनी असली, तरी हल्ली, या सुविधेचा उपभोग घेणा-यांची संख्या प्रचंड वाढली आहे. घरी वा ऑफीसमध्ये असताना असे अन्नपदार्थ मागवून घेणं सोप्प व सोयीचं ठरतं असलं, तरी त्याचे जीवनशैलीवर होणारे घातक परिणाम ध्यानात घ्यायला हवेत.

हॉटेलमधील अन्नपदार्थांची नावं, त्यांची छायाचित्र इतकी आकर्षक असतात, ते वाचून पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. दर दिवशी नवनव्या रेस्टॉरंटमधून विविध डिश मागवण्याची सवयच जडते आणि मग कधी भूक नसेल तरी अनोख्या डिशची चव घेऊन पाहावी वाटतं. इथेच अतिरिक्त खाण्याला सुरुवात होते. बैठ काम, वाढतं वजन, लठ्ठपणामुळे कमी वयात बळावणारे आजार, मानसिक व्याधींनी आजची तरुणाई त्रस्त झालेली दिसते.

हॉटेलमधील किचमनध्ये मूळात स्वच्छतेचा अभाव असतो. तसेच, जेवण बनवताना विचार न करता विरुद्ध पदार्थ एकत्र केले जातात, तर विविध सॉसेस, अजिनोमोटो सारख्या हानिकारक जिन्नसांचा वापर केला जातो. असे तयार पदार्थ रुचकर लागत असले, तरी त्यांच्या सततच्या सेवनाने शरीराचे होणारे नुकसान दुर्लक्षित करुन चालायचे नाही.

रेस्टॉरंटच्या मेनूकार्डवर इतके पदार्थ दिलेले असतात, की खवय्यांना हे खाऊ, की ते खाऊ अशी निवड करणेही मुश्किल होते. मग एकावरएक कुठलीही डिश खाल्ली जाते. ज्याने पचनक्रिया विस्कळीत होते. रोज घरी शिजणा-या अन्नात ब-याचदा सिझनल भाज्या, चपाती, भाजी आणि सणावारनिमित्त बनणा-या पदार्थांचा समावेश असतो. यापैकी प्रत्येक पदार्थ हॉटेलमधील पदार्थांइतका रुचकर नसला, तरी त्याच्यापेक्षा कित्येकपटींनी पौष्टिक नक्कीच आहे. तसेच, फूड डिलिव्हर करताना प्लॅस्टिकचे डबे, फॉईलचा वापर केला जातो. ज्यामुळे, त्यातील घातक घटक त्या पदार्थांवाटे पोटात जातात. कधी हे पदार्थ साठवून ठेवलेले असतात, तर कधी शिळ्या जिन्नसांच्या वापरातून तयार केलेले असतात. ज्यामुळे, फूड पॉईझनिंग, फूड एलर्जी सारखे आजार बळावतात. हे विघातक चक्र समजून घ्यायला हवे, प्रथम पालकांनी! एका क्लिकवर काही मिनिटांत घरपोच पोहोचणा-या फूड डिलिव्हरीचे बच्चेकंपनीला प्रचंड आकर्षण वाटतं. आजच्या लहानग्यांवर टेक्नोलॉजीचा इतका प्रभाव आहे, की पालकांकडे असे घरपोच अन्न मागवण्याचा ते हट्टच धरतात.

घरच्या किचनला आणि त्या किचनमध्ये सतत काम करणा-या व्यक्तिलाही आराम मिळावा या हेतूने, कधीतरी ऑनलाईन फूड ऑर्डन करणं ठिक आहे. पण, रोजच्यारोज बाहेरचं खाणं, ऑफिसमध्ये आयतं जेवण मागवणं सध्या रुचकर लागतं असलं, तरी भविष्यात शरीर याबाबत तक्रार करु लागेल यात शंका नाही. तेव्हा वेळीच सावध व्हा व सर्रास ऑनलाईन फूड मागवून खाणा-या ओळखीतील मंडळींनाही सतर्क करा. घरी कुणी डबा करुन देणारं नसेल किंवा व्यस्त दिनक्रमामुळे जेवण बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल, तर पोळी भाजी केंद्रांना प्राधान्य द्यावं. अशाने किमान घरचे अन्न तरी पोटात जाईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares