weight

घरबसल्या वाढतंय वजन!

        सध्या सगळे घरीच आहोत, वेळ कसा घालवायचा याचे नवेनवे मार्ग शोधून काढतोय. पण, एक टाईमपास सतत सोबत करतोय ते म्हणजे खाणं . येताजाता भूक लागतेय , वेळच्यावेळी जेवण तर लागतंच पण तरी सारखं तोंडात टाकायला काहीतरी हवं असतं. बरेच दिवस घरीच आहोत, तर सतत पोळी भाजी, वरण भात  खाऊन कंटाळलेल्या खवय्यांना काहीतरी चमचमीत हॉटेलची चव देणारं खावंसं वाटतं. मग काय एरवी करता येत नाहीत, असे वेळकाढू पदार्थ सध्या घरोघरी बनतायेत.  मंडळींची फेसबुक,  इंस्टाग्रामची स्टेटस अशाच स्वादिष्ट पदार्थांच्या फोटोंनी बहरली आहेत.  रोजच्यारोज असं मन भरेस्तोवर खायचं आणि फारच जेवले आज असं म्हणत ताणून द्यायची,  मग वजन वाढेल नाहीतर काय होईल?  आता तर,  लॉकडाऊन थेट ३ मे पर्यंत वाढवला आहे.  तोवर शरीराचं काय होईल याचा विचारही करवत नाही.  वाढत्या वजनावर वेळीच आळा घालायचा असेल, तर आजपासून रोजच्या वेळापत्रकात योग्यसे बदल करा.  लॉकडाऊनचा नियम तोंडालाही लागू होतो.  आवश्यक तितकंच पोटात जायला हवं व अतिरिक्त भुकेच्या वेळी किमान पौष्टिक तितकंच खाल्लं जाईल याकडे लक्ष्य द्यायला हवं.

        टोमॅटो ज्यूस घ्यायला हरकत नाही. वयवर्ष तीसपेक्षा अधिक असणाऱ्या स्त्रियांनी, तर हा ज्यूस नियमित घ्यावा,  त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळून,  तिशीनंतर येणारा अशक्तपणा भरून निघतो. तसेच बीट किंवा कोबीच्या ज्यूसचाही पर्याय आहे.  बीट शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतं,  तर कोबीमध्ये भरपूर फायबर असल्याने पोट छान भरतं व सारखी भूक लागत नाही.

        स्नॅक्स म्हणून अरबट चरबट,  रेडिमेड तेलकट पदार्थ न खाता, विविध फळं किंवा काकडी, गाजरचे काप खावेत तसेच, घरीच आहोत म्हंटल्यावर सतत चहा कॉफीचे दोनदोन घोट घेऊ नयेत. यामुळे,  अतिरिक्त साखर पोटात जाते , त्यावर नियंत्रण  राहत नाही. पास्ता , पिझ्झा , चीज सँडविच किंवा कुठल्याही प्रकारचा ब्रेड खाणे शक्यतो टाळा.  मैद्यामुळे पोट सुटतं, मग वजनही  झपाट्याने वाढत. खाण्यावरील नियंत्रांसोबत रोज किमान अर्धा तास व्यायाम वा योग करण्याचा प्रयत्न करावा.  संचारबंदी असल्यामुळे रोज सकाळी जॉगिंगला, वॉकला जाणं शक्य नाहीये.  तेव्हा घरीच थोडं स्ट्रेचिंग करावं,  मुख्यत्वे पोट कमी करण्यासाठी सहाय्यक ठरतील असे व्यायाम प्रकार करावेत.

        शारीरिक वजनावर नियंत्रण मिळ्वण्यासोबत मानसिक ताणही नियंत्रणात रहायला हवा. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा,  न्यूज चॅनलवर त्याविषयीची होणारी चर्चा ऐकून दडपण येतं. किराणा आणण्यासाठी बिल्डिंगच्या गेटपर्यंत जायलाही भीती वाटते. काळजी घेणं गरजेचं आहे, पण या आजाराचा धस्का घेऊन मनानं दुबळं होऊन चालायच नाही.  रोगप्रतिकारशक्तीत मानसिक स्वास्थ्यही महत्वाची भूमिका बजावतं.  सतत अस्वस्थ वाटतंय? घरात बसून राहण्याचा कंटाळा आलाय? चिडचिड होतेय? तर वेळीच सावरा. परिस्थितीचं गांभीर्य समजून मेडिटेशनच्या आधारे मन शांत ठेवूया . कारण, मन शांत असेल तरच वाढत्या वजनाकडे लक्ष जाईल व आहारात योग्यसे बदल करून ते नियंत्रणात ठेवता येईल. मैत्रिणींनो, जितके दिवस घरी आहोत, मुद्दाम स्वतः साठी वेळ राखीव ठेवू. थोडं स्वतः कडे लक्ष देऊ.

       सांगा बरं तुम्ही कमेंटमधून तुम्ही कसा वेळ देणार स्वतःला? काही सख्यांनी स्वतः साठी असा वेळ द्यायला सुरुवात केली असेल, तर तुम्ही त्या स्वतःसाठीच्या वेळात काय करता? ते जागृतीच्या इतर मैत्रिणींसाठी शेअर करा कमेंटमधून!

More Articles
Designed and Developed by SocioSquares