Book Corner Banner

घरातील वाचनीय जागा….!

पुस्तकवेड्या मंडळींच्या घरात पुस्तकांचं कपाट किंवा बुकशेल्फ तर हमखास असतं, जमवलेल्या पुस्तकांच्या खजिन्यास मनापासून जपण्याची धडपड वर्षानुवर्ष सुरु असते. पुस्तक वाचनाच्या सवयीसोबत पुस्तक वाचण्यासाठी घरातील एखाद्या जागेचीही सवय जडते. आरामखुर्ची, ऐसपैस सोफा, गॅलरीतला झोपाळा किंवा खिडकी जवळचा दिवाण अशा घरातल्या अनेक जागा आपण वाचानासाठी निवडतो, हळूहळू त्यापैकी एखादी खास बनून जाते.

वाचन करणे आवडत असले, तरी घरातील त्या ठराविक जागेवर बसून पुस्तक वाचण्याची मज्जा काही औरच असते. बरेचदा पुस्तकप्रेमी अशा पंसतीच्या जागेस छान रुपड बहाल करतात. लॅंम्प किंवा दिव्यांचं तोरण, वॉलपेपर, रंगीबेरंगी क्राफ्टचे आकार उकार, पक्षी प्राणी चिटकवत जागेला अधिक शोभिवंत बनवतात. ज्यामुळे, घरातील त्या जागेकडे पाहाताच प्रसन्न वाटते. तुम्हीही तुमच्या घरातील वाचनीय कोपरा असाच सुरेख सजवू शकता. यासाठीच्या काही कल्पक युक्त्या पुढे देत आहोत.
Book lover (3)

कमी जागेतही या कल्पना नक्कीच आजमावता येतील. पुस्तकांच्या ढिगा-याचीच खोली बनवून त्यात आतून बाहेरुन लाईटिंग किंवा एखादा लॅम्प लावला तरी काम फत्ते होईल. तसेच, दुस-या चित्रात दाखवल्याप्रमाणे, छोटासा दिवाण व त्याच्या बाजूलाच पुस्तकांची शेल्फ अशी मोकळी ढाकळी रचना करणेही शोभून दिसेल. तसेच, भारतीय बैठकीला साजेशी मऊशार गाद्यांवर रंगीतसंगीत उशांची मांडणी व बाजूच्या भिंतीला लागूनच पुस्तकांची छतापर्यंत बुकशेल्फ करणेही शोभून दिसेल.

Book lover (2)

वरीलप्रमाणे सजावट करताना खोलीचा अधिक भाग व्यापला जाईल, पण हीच रचना खोलीचा शोभा वाढवण्यासाठी महत्तम ठरेल. यासाठी घरातील हवेशीर कोपरा निवडा, जिथे भरपूर नैसर्गिक प्रवास देखील असेल. स्विंग चेअरचा मस्त वापर करता येईल किंवा त-हेत-हेच्या आकर्षक खुर्च्या, दिवाण वापरुनही मोकळी बैठक तयार होईल.

Book lover (1)

लहान मुलांना चांगल्या सवयी लावताना, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही कारणं लागतातच. जसं अवांतर वाचनाचं वेड लागावं म्हणून सुरुवातीला आपण त्यांना चित्रकथा, रंगीबेरंगी कॉमिक्स वाचायला देतो, पुस्तकासोबत खेळणही विकत घेऊन देतो. त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी घरात छोट्यांच्या पुस्तकाचं बुकशेल्फ तयार करुन त्या भोवतीच्या जागेला सुंदर सजवता येईल. जेणेकरुन त्या जोगेसोबत पुस्तकांचीही त्यांना आपसूक भुरळ पडेल.

पुस्तकांच्या सहवासात तासनतास सहज निघून जातात. मात्र, पुस्तक, वाचक आणि वाचनासाठीची आवडती जागा हे त्रिकूट जुळून आलं की हेच तास अधिक बहूमुल्य होतात हेही तितकंच खरं!

Image Source – Pinterest

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares