pickle (1)

चविष्ट बेगमीची लोणची!

कैरी पहाताच तोंडाला पाणी सुटतं आणि त्या कैरीचं चटपटीत लोणचं ताटात असेल तर झपझप जेवणं फस्त होतं. कुठल्याही चविष्ट लोणच्यास हे छान जमतं! यंदा पहाणार आहोत, जरा निराळ्या चवीची व वेगळ्या धाटणीची लोणची!

गाजराचे लोणचे

साहित्य – १/४ किलो गाजरं, ३ चमचे मोहरीची डाळ, २ चमचे लाल मिरची पावडर, १ चमचा बडीशेप, गूळाचा लहान खडा, १ चमचा हिंग, मीठ, तिळाचे तेल.

पाककृती – सर्वप्रथम फोडणी तयार करुन घ्यावी. त्यासाठी फोडणी पात्रात तेल तापवून त्यामध्ये हिंग, लाल मिरचीची फोडणी तयार करुन ती गार होण्यास ठेवावी. आता, गाज-याच्या सळ्यांसारख्या बारीक फोडी करुन घ्याव्यात. त्यांना मीठ चोळून १० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. आता, तर सर्व जिन्नसांची मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्यावी आणि त्यात मीठ लावलेल्या गारजच्या फोडी व गार झालेली फोडणी घालावी. आबंड चव हवी असल्यास आवडीनुसार तुम्ही गाजराच्या लोणच्यात लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर घालू शकता.

अशात-हेने तयार झालेले गाजराचे लोणचे, किमान एक दोन दिवस कडक उन्हान ठेवावे व त्यानंतर, हवाबंद बरणीत भरावे.

आवळ्याचे लोणचे

साहित्य – १/२ किलो आवळे, १/२ वाटी तेल, १ टि.स्पू. राई. १/४ टि.स्पू. हिंग, १ टे.स्पू. मोहरीची डाळ, ३ टे.स्पू लाल मिरची पावडर, १/२ टि.स्पू. हळद, १ टे.स्पू. मीठ

पाककृती – प्रथम पॅनमध्ये आवळे उकळवून घ्यावेत. त्यानंतर शिजलेले आवळे गार व्हावेत यासाठी ते थंड पाण्यात बुडवून ठेवावेत. आवळे थंड झाल्यावर त्यातील बी काढून टाकावी व फोडी विलग कराव्यात. आता, पॅनमध्ये प्रथम तेल घालून, ते तापल्यावर त्यात राई, हिंग, आवळ्याच्या फोडी, मोहरीची डाळ, लाल मिरची पावडर, हळदी पावडर व मीठ असे जिन्नस घालावेत. सर्व मिश्रण छान एकजीव करुन घ्यावं. अशाप्रकारे, तयार होईल आपलं आवळ्याच लोणचं गुणकारी व पौष्टिक! पोळी किंवा खिचडीसोबत जे छान चवीन खाता येतं.

उपवासाचे लिंबू लोणचे

साहित्य- मध्यम आकाराची १० लिंबं, ४०० ग्रॅ. साखर, ३ टे.स्पू. लाल मिरची पावडर, ३ टे.स्पू. मीठ.

पाककृती – प्रथम एका लिंबाच्या आठ फोडी याप्रमाणे, सर्व लिंब नीट कापून घ्यावीत. त्यानंतर एका भांड्यात लिंबाच्या सर्व फोडी घेऊन, त्यात साखर, मीठ व लाल मिरची पावडर मिसळावी. सर्व जिन्नस चमच्याच्या सहाय्याने ढवळून घ्यावे. तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीनूसार वाढवू शकता. अशाप्रकारे, तयार झालेले लोणचे काचेच्या हवाबंद बरणीत भरुन ठेवावे. हे लोणचे पाच ते सहा महिने छान टिकते. साबुदाणा वडा, साबुदाणा थालिपीठ किंवा इतर दिवशीही खिचडीसोबत हे लिंबू लोणचे चविष्ट लागते.

चिकूचे लोणचे

साहित्य- सुकवलेले चिकू चिप्स, साखर, लिंबाचा रस, लाल तिखट, लवंग पूड, किळी मिरी, सुंठ पावडर, मीठ.

पाककृती – प्रथम लिंबाच्या रसात साखर मिसळून घ्यावी. जेवढा लिंबाचा रस घ्याल त्याच्या दुप्पट साखर घ्यावी. हे मिश्रण थोडे ढवळून, मग मंद आचेवर गरम करत ठेवावे. साखर संपूर्ण वितळल्यावर त्यामध्ये, एक चमचा मीठ मिसळावे व मिश्रण गार होण्यास ठेवून द्यावे.

त्यानंतर, एका बाऊलमध्ये गार झालेले हे मिश्रण घेऊन त्या सुंठ पावडर, काळी मिरी पूड, लवंग पूड, लाल तिखट घालून सर्व जिन्नस नीट एकजीव करुन घ्यावेत व त्यामध्ये चिकूचे सुकवलेले चिप्स घालून पुन्हा नीट ढवळून घ्या. अशाप्रकारे, तयार झालेले चिकूचे लोणचे साधारण सहा सात महिने हमखास टिकते.

सुगरणींनो, कशा वाटल्या रेसिपीज्? जरुर कळवा आणि तुमच्याकडे काही निराळ्या चविष्ट रेसिपीज् असतील तर त्या आम्हाला साहित्याचे प्रमाण, पाककृतीसहित लिहून पाठवा, सोबत रेसिपीचा फोटो पाठवायला विसरू नका बरं.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares