FearInKids (1)

छोट्यांच्या मनातली भित्रीभागूबाई!

“मॉं केहती है बच्चे सो जा, वरना गब्बर आ जाएगा|” इथपासून ते “बुवा येईल हा…!” पर्यंतचे विविध भितीदायक प्राणी प्रत्येकाला लहानपणीच ओळखीचे होतात. यांच्या भितीपोटी आईबाबांचं म्हणणं किती निमुटपणे ऐकायचो आपण. गुपचूप बसायचो, जेवण संपवायचो, पटकन झोपायचो. ही युक्ती पालकांच्या पिढ्यानंपिढ्या वापरतायत. त्याव्यतिरिक्त माऊची, काऊची, शेजा-यांच्या कुत्र्याची, काळोखाची, भयपटांची, भूताखेतांच्या गोष्टींची भिती आपसूक मनात बसते. काही लहानमुलांच्या मनात ही भिती फार खोलवर रुजते आणि छोट्या मुलांची घाबरगुंडी उडते.

लहान मुलांच्या मनात दडलेली भिती काढण्यासाठी पालकांनी योग्ससे प्रयत्न करायला हवेत. ते घाबरतात अशा ठिकाणी जाण्याची किंवा त्यांना भितीदायक वाटणारी गोष्ट करण्याची त्यांना सक्ती करु नये. मुलांनी ऐकलं नाही, की बिचा-यांना बरेचदा ओरडा बसतो. उलट त्यांना कसली भिती वाटतेय, हे प्रथम जाणून घ्यावे. कारण बालिश वाटले, तरी पालकांमध्ये ते ऐकूण घेण्याची तयारी हवी. ब-याचदा न आवडणारी गोष्ट सारखी करायला सांगितल्याने त्या विषयीची मनातली भिती जाते. खरंतर हा गैरसमज आहे, हा मार्ग छोट्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार नाही. ते अधिक दडपणाखाली जाऊन, त्यांचा स्वत:वरील विश्वास कमी होऊ शकतो. यावर उपाय म्हणून, पालकांनी आपल्या मुलांशी वेळोवेळी संवाद साधायला हवा.

  1. खेळांत किंवा स्पर्धापरिक्षांत सहभागी होण्याची भिती वाटणा-या लहान मुलांचे मूळात सहभाग घेतल्याबद्दल प्रथम कौतुक करावे. अपयश आले तरी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना शाब्बासकी द्यावी.
  2. सामूहिक किंवा वैयक्तिक कला स्पर्धांत भाग न घेण्यामागे ब-याचदा स्टेज फिअरचे कारण दडलेले असते. गर्दीला भिणा-या लाजाळू मुलांमुलींना एखाद्या कला कार्यशाळेत दाखल करावे. जेणेकरुन थोडे वेगळे कारण साधत, ते मुल समवयीन मित्रमंडळींमध्ये मिसळेल.
  3. त्यांना अनोळखी व्यक्तिंपासून चार हात दूर रहायला आपणच शिकवतो. पण, किमान अनोळखी नातेवाईक समोर येताच किमान गरजेपुरता संवाद साधण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये यावा म्हणून वेगवेगळ्या कौटुंबिक सोहळ्यांत मुलांना नियमित घेऊन जावे. गप्पाटप्पांमधून त्यांना चारचौघांत बोलण्याचा आत्मविश्वास मिळू शकतो.
  4. हॉरर सिनेमा पाहाणे म्हणजे काही शौर्याचे काम नाही, तरी जर किशोरवयीन मुले असे चित्रपट पाहून फार घाबरुन जात असतील. तर, त्यांना यामागील कलात्मक चित्रीकरणाविषयी सांगावे. वास्तवाची जाणिव करुन द्यावी.

प्रत्येक भितीमागे एखादा गैरसमज किंवा पुर्वानुभव असतो. ज्यामुळे, भित्रेपणा हा स्वभावगुण बनतो. चिमुकली मने भित्री होऊ नयेत म्हणून वेळीच पालकांनी आपल्या मुलांशी विश्वासपूर्ण संवाद साधायला हवा. भितीची बाब लहानशी वाटते, पण अतिरिक्त दडपणामुळे मुलं एकलकोंडी बनून त्यातून मानसिक आजारही बळावू शकतात, हे ध्यानात घ्यायला हवे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares