joint family (1)

छोट्या मोठ्या कुटुंबाच्या गंमतगोष्टी!

समूहात राहणे माणूस प्राण्यास भयंकर आवडते. यातमधूनच जन्माला आलेली एकत्र कुटुंब पद्धती त्यानं स्विकारली, जी शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदली. सख्या नात्यांसोबत चुलतेही एकमेकाला धरुन राहीले, मात्र गरजा वाढल्या तशी तरुण मंडळी नोकरी धंद्यासाठी घरापासून दूर गेली. एका कुटुंबातून दहा लहान कुटुंब जन्मली, ती सर्वत्र विखुरली व सोयीनूसार हवी तिथे विसावली. अगदी उड्डाण करीत देशाबाहेरही स्थिरावली. पण, माणसाचा मूळ स्वभावधर्म कसा बदलेल? त्याला माणसं हवीत, नाती हवीत. मित्र मैत्रिणी ढिगभर असले, तरी रक्ताच्या नात्यांची ओढ बदलत्या जीवनशैलीसोबत थोडीच बदलणार आहे?

या छोट्या-मोठ्या कुटुंबाचे फायदे तोटे आज पाहाणार आहोत. कदाचित त्यात तुम्हाला तुमची एखादी कौटुंबिक आठवण नक्की गवसेल.

एकत्र कुटुंब:

अवलंबित्व- मोठ्या कुटुंबात इतकी माणसं असतात, की कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रत्येकाची प्रत्येकाला सवय झालेली असते. त्यामुळे, घरातील विविध जबाबदा-या सुरळीत पार पाडताना सगळेच एकमेकांवर अवलंबून असतात.

सोहळे: लहानशा आनंदाचेही इथे सोहळ्यात रुपांतर होते. क्षण साजरे करण्याचे बस फक्त निमित्त हवे सगळ्यांना.

पिढी: अनेक पिढ्या एकत्र नांदत असल्याने मुलांना नात्यांची ओळख होते. मोठ्या कुटुंबाविषयीची ओढ त्यांच्यात नकळत रुजवली जाते.

एकोपा: अनेक डोकी एका छताखाली आल्यावर, वादविवाद होणं साहजिक आहे. मोठ्या कुटुंबात या ना कारणाने ते होतात, कधी दहा तोंड दहा दिशेला असतात मात्र अडीअडचणीला त्यांची एकजूटही पाहाण्यासारखी असते. परक्या व्यक्तिकडून आपल्या माणसाविषयी एक उणादुणा शब्द ऐकून घ्यायचे नाहीत.

सासू-सून: या नात्याचे किस्से जगभर प्रसिद्ध असले, तरी कुटुंब व्यवस्थेचा पाय भक्कम करण्याची ताकद देखील याच नात्यात आहे. सकाळी झालेला वाद विसरुन, सायंकाळी पुन्हा जेवणाच्या तयारीला पदर खोचून एकत्र येतात. पुरुषांपेक्षा बहुतांशा बायकांचे स्वभाव तिरकस असतात. हे आपण महिलांनी मोठ्या मनानं कबुल करायला हवं. असे असूनही तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचूनही करमेना असं साधारण सासू सूनेचा बंध घरोघरी पाहायला मिळतो.

नातवंड: आजी आजोबांच्या सहवासात मुलं लहानाची मोठी होतात, तेव्हा नातवंड ही भावना ख-या अर्थानं सार्थ होते. संस्कारांपासून सणवारी पाळायच्या रुढींपर्यंत सारं काही आत्मसात करण्यासाठी घरातील प्रत्येक पिढीला ही सुरकुतलेली अनुभवाची पोतडीच तर मार्गदर्शन करते.

विभक्त कुटुंब:

स्वातंत्र्य: या कुटुंबशैलीत स्वातंत्र्य भरपूर आहे. घरातले काय म्हणतील याचा विचार नाही, कोणी ओरडेल अशी भितीही नाही. मनाजोक्ते वागण्याची पूर्ण सूट मिळाल्याने मुलं बिघडतात तशीच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजावून सांगितला, तर आपली मर्यादाही जाणून वागतात. छोट्यांसोबत मोठ्यांनाही हे स्वातंत्र्य हवेसे वाटते.

घरकाम: माणसं कमी, त्यामुळे घरातील कामेही कमी. मुख्यत्वे किचनमधील जेवणाचा व्याप आटपता असल्याने स्त्रियांचा भरपूर वेळ वाचतो. त्यांना नोकरी करुन घरकाम सांभाळता येते.

तंट्याला थारा नाही: माणसं कमी त्यामुळे वादही कमी. घरात इनमिन सदस्य चार, तेही वैयक्तिक कामांत व्यस्त असल्यावर तंटा घडण्याच्या शक्यताही कमी असतात.

छोटी मंडळी: घरातील बच्चेकंपनी लवकर जबाबदार होते. घरातील काही कामे त्यांच्यावरही सोपवली जातात. आई वडीलांसोबत

दोन्ही कुटुंबपद्धतींत काही फायदे काही तोटे आहेत. सोयीनूसार आपल्याला हवी ती आपण निवडली, पण इतकं खरं की प्रत्येक जण आतूरतेने सणसोहळ्यांची वाट पाहात असतो. नात्यांच्या ओढीने सोशल तर झालोय, पण माणसांना प्रत्यक्ष न भेटण्याचा उणीव मात्र सोसवत नाही. हो ना? कळवा तुमचे मत खालील comment box मध्ये,

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares