‘जागृक ग्राहक’ घडविणारा ‘कायदा’!

‘जागृक ग्राहक’ घडविणारा ‘कायदा’!

आपण सारेच ‘ग्राहक’ ही भूमिका रोज बजावत असतो, वाण्याकडून सामान घेणे असो किंवा घरासाठी जागेची खरेदी करणे असो, कुठल्याही लहान मोठ्या व्यवहारांमुळे आपण ‘ग्राहक’ बनतो आणि व्यवहारात कुठलीही फसवणूक होऊ नये यासाठी कायम सतर्क राहाण्याचाही प्रयत्न करतो. असाच, ग्राहकांना त्यांच्या हक्कांचे स्मरण करुन देणारा ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा केला जातो १५ मार्च रोजी!

१९६२ सालच्या १५ मार्च या दिवशी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी तेथील संसदेपुढे केलेल्या भाषणातून ग्राहकांना सुरक्षिततेचा, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्वाचा असे चार हक्क दिले. पुढे ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने अथक प्रयत्नांतून मुलभूत गरजा पुरविण्याचा, तक्रार निवारण्याचा, ग्राहक शिक्षणाचा व स्वच्छ पर्यावरणाचा अशा आणखी चार हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. असा, एकूण आठ हक्कांचा समावेश असणारा ‘ग्राहक संरक्षण कायदा’ कुठलेही आर्थिक नुकसान होण्यापासून ग्राहकाला वाचवू शकतो. याच कायद्याच्या आधारावर देशोदेशी ग्राहक हिताय संस्था निर्माण झाल्या, त्यापैकी ‘मुंबई ग्राहक पंचायत’ भारतातील सर्वांत मोठी ग्राहक संस्था म्हणून ओळखली जाते.

रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करताना देखील दुधात पाणी मिसळणारा दुधवाला, वजन काट्यात बिघाड करणारा भाजीवाला नशीबी येतो व साधासुधा ग्राहकही सहज फसवला जातो. कधी वस्तू वापरण्याची मर्यादा संपलेली असूनही ती विक्रीस ठेवलेली असते, टि.व्ही., फ्रिज, ओव्हन, कॉम्प्युटर, स्कूटर अशी कुठलीही वस्तू विकत घेताच ताबडतोब बिघडते किंवा दुरुस्त करुन मिळत नाही, एखाद्या वस्तूसोबत बिनगरजेची वस्तूही विकत घ्यावी लागते किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना विक्रेत नियमांनुसार सुविधा देणे नाकारतात, अशा समस्या समोर आल्यास ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यास पुढाकार घ्यायला हवा, या प्रक्रियेत ग्राहक संस्था योग्य मार्गदर्शनही करतात, ज्यामुळे फसवणूक करणा-या विक्रेत्यास शासन होऊ शकते व ग्राहकास नुकसान भरपाई मिळू शकते.

पैसे कमविण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेतो व कमी किंमतीत जास्त फायदा करुन घेण्यास प्राधान्य देतो. विकणारा व खरेदी करणारा दोघांनी आपापला नफा पाहाणे साहाजिक असले, तरी यासाठी फसवणूकीचा मार्ग स्विकारणे गुन्हाच आहे. म्हणूनच, मोठ्या मेहनतीने कमवलेल्या पैशातून वस्तू खरेदी करताना ग्राहकाने चौकस वृत्ती बाळगल्यास ख-या अर्थाने त्याच्या कष्टास मोल प्राप्त होईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares