ज्ञानाई ‘सावित्रीबाई फुले’! (१८३२-१८९७)

ज्ञानाई ‘सावित्रीबाई फुले’! (१८३२-१८९७)

सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावची पाटीलकी सांभाळणा-या लक्ष्मीबाई व खंडोजी नवसे पाटील या दांपत्याच्या पोटी ३ जानेवारी १८३२ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. चूल व मुल अशा मर्यादित चौकटीत जगणा-या व स्त्री स्वातंत्र्याचा मागमूसही नसलेल्या त्या काळात वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई, तेरा वर्षीय ज्योतिरावांशी विवाहबद्ध झाल्या.  लहानपणापासून आईच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या ज्योतिरावांचा सांभाळ त्यांच्या मावस बहिणीने म्हणजेच सगुणाआऊ यांनी केला. त्या एका इंग्रज अधिका-याकडे मुलाच्या दाई म्हणून काम करत, त्यांना इंग्रजी भाषा चांगली अवगत होती. त्यांच्याजवळील या ज्ञानाच्या संस्कारांनी ज्योतिरावांना प्रगल्भ विचारसरणी प्राप्त झाली, ज्यातून तत्कालीन संकुचित समाजाचा पगडा न जुमानता आपल्या पत्नीस साक्षर करण्याचा निर्णय ज्योतिरावांनी घेतला.

ज्योतिबांनी दिलेले ज्ञानाचे धडे सावित्रीबाईंनी मन लावून गिरवले. या दोघांनाही सगुणाआऊचा खंबीर पाठींबा होताच. विस्तारीत पातळीवर हे ‘स्त्री शिक्षण’ रुजविण्याचे व त्याचे महत्त्व समाजाला पटवून देण्याच्या विचारांतून त्यांनी पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. प्रचंड विरोध, अपमान, टिकास्त्रांचा मारा सहन करीत सावित्रीबाई पहिली शिक्षिका म्हणून न डगमगता कार्य करीत राहिल्या.

स्त्री शिक्षणाच्या प्रसारासोबत समाजातील क्रूर परंपरांचा व अंधश्रेद्धला आळा घालण्याचे प्रबोधनात्मक कार्यही फुले यांनी केले. सती, केशवपन सारख्या प्रथांना विरोध करीत विधवा पुनर्विवाहाचा कायदा यावा यासाठी आग्रह धरला, तर बालहत्या रोखण्यासाठी ज्योतिरांवानी सुरु केलेले ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ पुढे सावित्रीबाईंनी समर्थपणे सांभाळले. येथील अनाथ बालकांना त्या फार माया करीत, तर विधवा स्त्रीयांना आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असत. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यासोबत ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या काव्यसंग्रहांच्या माध्यमातून आपल्या विचारांची मांडणी केली. ज्योतिबांच्या उदार दृष्टिकोनातून सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्त्व घडले, ज्यामधून स्त्री शिक्षणासोबत स्त्री स्वातंत्र्याची चळवळ जन्मास आली. सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात ज्योतिबा फुलेंसोबत सिंहाचा वाटा उचलणा-या त्यांच्या धर्मपत्नी समस्त स्त्री वर्गासाठी आदर्श ठरल्या.

इ.स. १८९६-९७ दरम्यान पुण्यात प्लेगच्या साथीने त्रस्त झालेल्या रोग्यांची सेवा करण्याचे कार्य पार पाडताना सावित्रीबाईंनाही प्लेगने ग्रासले. या असह्य रोगाशी झुंज देत १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाई या ज्ञानयोगीनीचे निधन झाले. स्त्रीयांना शिक्षणाचा महामंत्र देणा-या सावित्रीबाई फुले या आदर्श व्यक्तिमत्त्वास शतश: प्रणाम!

Designed and Developed by SocioSquares