Food photo (1)

झटपट पौष्टिक टिफीन बॉक्स

रोज टिफीन बॉक्समध्ये पोळी भाजी खाऊन लहान मुलंही कंटाळतात, अशावेळी आठवड्यातून एखाद दिवस काहितरी निराळा पदार्थ बनवून त्यांनाही चकीत करा. म्हणूनच देत आहोत, पुढील रेसिपीज् ज्या तुम्हाला व तुमच्या लहानग्यांनाही हमखास आवडतील.

ओट्सचे धिरडे

साहित्य – १ कप कच्चे ओट्स, १/४ चमचा हळदा, १/२ चमचा धणे पूड, १/४ चमचा लाल तिखट, मीठ, १/४ कप बारीक रवा, पाणी, गाजर, लाल, पिवळी, हिरवी शिमला मिरची, पातीचा कांदा, तेल.

पाककृती- प्रथम ओट्सची मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्यावी. मग हळद, धणे पूड, लाल तिखट, मीठ, बारीक रवा घालावी. पाण्याच्या सहाय्याने सर्व जिन्नस एकजीव करुन घ्यावेत.

त्यानंतर, त्यामध्ये गाजर, रंगीत शिमला मिरच्या, पातीचा कांदा बारीक चिरुन घालावा. पुन्हा मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे व पळीभर मिश्रण गरम पॅनवर पसरवावे. त्याच्या भोवती हलकेच तेल सोडावे, जेणेकरुन खालच्या बाजूनेही धिरडे छान खरपूस होईल. असेच दुस-याबाजूनेही भाजून घ्यावे. तयार ओट्सचे धिरडे टॉमेटो केचअप किंवा चटणीसोबत टिफीन बॉक्समध्ये द्यावेत.

रवा पॉकेट्स

साहित्य – १ कप रवा, १/२ कप दही, १/२ टि.स्पू. काळीमिरी पूड, पाणी, १ चमचा तेल,  १/२ टि.स्पू. मोहरी, १/२ टि.स्पू. जिरे, चिमूटभर हिंग, सात-आठ पाने कडीपत्ता, १ कांदा, १/२ कप ओले वाटाणे, १ टॉमेटो, लाल तिखट, हळद, १/२ टि.स्पू. आलं लसूण पेस्ट, ३ उकडलेले बटाटे, कोथिंबीर, लिंबू रस, टॉमेटो केचअप मीठ.

पाककृती – प्रथम बाऊलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये दही, काळीमिरी पूड, मीठ घालून पाण्याच्या सहाय्याने मिश्रण एकजीव कराव व थोडावेळ झाकून ठेवावं.

त्यानंतर, पॉकेट्समधील सारण बनवायला घ्यावे. एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेऊन ते तापल्यावर त्यामध्ये राई, जिरे, हिंग, कडीपत्ता घालून छान परतून घ्यावा. मग, त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, ओला वाटाणा घालावा. कांदा गुलाबी होईस्तोवर छान परतुन घ्यावा. आता, बारीक कापलेला टॉमेटो, मीठ व लाल तिखट, हळद व आलं लसूण पेस्ट घालावी. सर्व मिश्रण मिळून यावेत यासाठी ढवळत रहावे, ५ ते ७ मिनिटं वाफवत ठेवावे.

त्यानंतर, उकडलेले बटाटे कुस्करुन त्यात घालावीत वरुन चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी व अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळावा. सारणरुपी भाजी छान तयार करुन घ्यावी.

आधी तयार केलेल्या रव्याच्या मिश्रणात चरलेली कोथिंबीर व थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. पीठ पोळे तयार करता येतील इतकेच जाडसर ठेवावे.

तेलाचा वापर न करता, ह्या पिठाचे छान पातळ पोळे करुन घ्यावेत. पोळ्याच्या मध्यभागी टॉमेटो केचअप किंवा चिजचा स्लाईज ठेवावा, त्यावर तयार भाजी ठेवून, तोच पोळा भोवताली लपेटून घ्यावा. अशा रवा पॉकेट्सच्या आत कुठलीही सुकू भाजी घेऊ शकता. जेणेकरुन सर्व प्रकारच्या भाज्या मुलांच्या पोटात जातील.

डाळवडे

साहित्य- १ वाटी हरभरा डाळ, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, ८ ते १० लसूण पाकळ्या, १ इंच आले, कढीपत्ता पाने, १/२  टि.स्पू. हळद, १ टि.स्पू. जिरे, १ टि.स्पू. तीळ, १/२ कप कोथिंबीर, तेल, मीठ

पाककृती- प्रथम डाळ धुवून ती २ ते ३ तास भिजवावी. भिजल्यावर चाळणीत ओतावी, ज्यामुळे त्यातील पाणी निथळून जाईल.

आता मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कढीपत्ता व मीठ घालून जाडसर बारीक वाटून घ्यावे. डाळ देखील अशीच जाडसर वाटावी.

एका बाऊलमध्ये वाटलेली डाळ घ्यावी. चवीनूसार त्यात मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, हळद, जिरे व गरज वाटल्यास मीठ घालावे.

त्यानंतपर कढईत तेल गरम करुन बोटांना थोडे तेल लावून जाडसर वडा थापावा. मध्यम आचेवर लालसर तळून घ्यावा.

टिफीन बॉक्समध्ये हे वडे आंबट गोड चटणीसोबत खाण्यास द्यावेत.

पुदीना पराठा

साहित्य- १/२ कप बारीक चिरलेली पुदीन्याची पाने, १ गव्हाचे पीठ, १ टे.स्पू. तेल, १ टीस्पू. ओवा, १/४ टीस्पू लाल तिखट, मीठ.

पाककृती-  परातीत वरील सर्व जिन्नस घेऊन, थोड्या पाण्याच्या सहाय्याने ते एकजीव करुन घ्यावेत. साधारण इतर पराठ्यांसाठी जितके घट्ट पीठ मळता, तितकेच मळावे. या पीठाचे चपाती लाटता येतील इतके गोळे घेऊन. जाडसर लाटून घ्यावेत. वरुन थोडे चिरलेला पुदीने भुरभुरावा, लाटण्याने ती पाने हलकीशी पराठ्यावर दाबावीत. जेणेकरुन पराठा भाजताना त्या पानांनाही भाजल्याचा स्वाद येईल. तेलाच्या सहाय्याने पराठे छान भाजून घ्यावेत. तयार झालेले पुदीना पराठे दह्यासोबत टिफीन बॉक्समध्ये देता येतील.

मैत्रिणींनो, कशा वाटल्या रेसिपीज् जरुर कळवा, लिहा तुमच्या प्रतिक्रिया ब्लॉग खालील कमेन्टबॉक्समध्ये! तुमच्याजवळ अशा काही खास टिफीन रेसिपीज् असतील तर त्यासुद्धा तुम्ही शेअर करु शकता आमच्यासोबत, ज्या तुमच्या नावासहित आम्ही पोस्ट करु झी मराठी जागृतीच्या फेसबुकपेजवर!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares