Banner 1 (1)

टिफीन बॉक्ससाठी रेसिपीज्!

शाळांसोबत तुम्हा आई मंडळींची ड्युटी देखील नियमित सुरु झालीय. पोळी भाजी नेणारी गुणी बाळं, मर्जी फिरल्यावर म्हणतात, “आई पोळी भाजीच कंटाळा आलाय, काहितरी टेस्टी दे ना टिफिनला!” अशावेळी,  टेस्टी व हेल्दी अशा दोन्ही गुणांचा समावेश असणा-या पुढील रेसिपी ट्राय करुन पाहाच…

पालक पराठा –

साहित्य – २ कप स्वच्छ धुतलेला पालक, १ कप गव्हाचे पीठ, १/४ टिस्पू. ओवा, १/२ इंच आलं, १ हिरवी मिरची, १ टिस्पू. तेल, मीठ, पाणी(वाटणासाठी)

पाककृती – प्रथम पालक, आलं, मिरची थोड्यापाण्याने वाटून घ्यावे. त्यानंतर, गव्हाच्या पीठात, ओवा, चवीपुरते मीठ व तयार केलेली पालक पेस्ट मिसळावी. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करावे. मिश्रण व्यवस्थित मळून घेतल्यावर त्यात १ टिस्पू. तेल मिसळावे व पीठ १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवून द्यावे. नंतर, पीठाचे लहान लहान गोळे करुन घ्यावेत व जाडसर लाटून घ्यावे. वरुन हलकेसे पीठ व तेल लावावे. व त्याची त्रिकोणी घडी करुन पराठा लाटून घ्यावा. आता, पराठा भाजून घ्यावा. पराठ्याच्या दोन्ही बाजूने तूप लावावे.

व्हेजिटेबल इडली –

साहित्य- १/२ कप रवा, २ टेस्पू किसलेले गाजर, २ टेस्पू. वाफवलेले मटार, १ टिस्पू. मोहरी, १ टिस्पू. चणा डाळ, १ टिस्पू. तेल, दही, ७ ते ८ कडीपत्त्याची पाने, १/२ कप दही, कोथिंबीर, हिरवी मिरची, १/२ टिस्पू.  इनो पावडर, मीठ

पाककृती – प्रथम पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे. त्यामध्ये, मोहरी टाकून ती छान तडतडली, की त्यात चणा डाळ व कडीपत्त्याची पाने टाकावीत. सर्व जिन्नस परतून घेतल्यावर त्यात रवा टाकून ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. हे रव्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्यात दही मिसळावे. यात २ किसलेले गाजर, वाफवलेले मटार, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची व चवीपुरते मीठ घालावे. सर्व जिन्नस थोडे पाणी वापरुन एकजीव करुन घ्यावेत. १५ मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवावे. त्यानंतर, त्यामध्ये. इनो पावडर व १ टिस्पू. पाणी मिसळावे.

आता, नेहमीप्रमाणे इडली पात्रास तेल लावून, हे मिश्रण त्या साच्यात भरावे. अर्धा कप रव्याच्या साधारण ८ ते ९ इडल्या तयार होतात.

लेमन राईस –

साहित्य – १ कप शिजलेला भात, १ मोठा चमचा लिंबाचा रस, शेंगदाणे(आवडीनुसार), मोहरी, १ टेस्पू. चणा डाळ, १ टेस्पू. उडद डाळ, कडीपत्ता, २ टेस्पू. तेल, १/४ टिस्पू. हळद, १ मिरची, कोथिंबीर, मीठ.

पाककृती – प्रथम पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे. त्यात आवडीनुसार कमी जास्त शेंगदाणे घालावेत. त्यांना छान क्रिस्पी करुन घ्यावे. त्यात थोडी मोहरी टाकावी ती तडतडली की, त्यात चणा डाळ, उडद डाळ टाकून व्यवस्थित परतून घ्यावे. नंतर, त्यात कडीपत्ता, हळद व हिरवी मिरची चिरुन टाकावी.

आता, त्यामध्ये शिजलेला भात, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ मिसळून मिश्रण हलक्या हाताने ढवळून घ्यावे. अशाप्रकारे, तयार झालेला लेमन राईस त्यावर चिरलेली कोथिंबीर पेरत गार्निश करता येईल.

पौष्टिक मुगाचे धिरडे –

साहित्य – १/२ कप मोड आलेले मूग, १/२ इंच आलं, १/४ टिस्पू. जिरं, २ टेस्पू. तांदळाचे पीठ, १ हिरवी मिरची, मीठ चवीनुसार व १/२ कप पाणी, तेल

पाककृती – मोड आलेले मूग, तांदळाचे पीठ, आलं, जिरं, हिरवी मिरची, मीठ, पाणी हे जिन्नस मिक्सरमध्ये एकजीव करुन घ्यावेत. आता, तव्यावर थोडे तेल सोडून त्यावर पळीभर मिश्रण पसरवावे. धिरड्याला थोडेसे वरुन तेल लावून दोन्ही बाजूने धिरडे लालसर भाजून घ्यावेत. आणि मुलांच्या आवडीनुसार सॉस किंवा चटणीसोबत टिफिनमध्ये द्यावेत.

सुगरणींनो, कशा वाटल्या आजच्या रेसिपीज् नक्की लिहा तुमच्या प्रतिक्रिया comment box मध्ये व हे पदार्थ करुन देखील पाहा, बच्चेकंपनी नक्की खूष होईल आणि टिफिन बॉक्स हसत खेळत फस्त होईल.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares